Sunday, October 26

शिक्षक दिन–समाजाचे शिल्पकार आणि भविष्यवेधी उत्सव

शिक्षक दिन–समाजाचे शिल्पकार आणि भविष्यवेधी उत्सव

दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस भारतभर शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त या उत्सवाला सुरुवात झाली. मात्र शिक्षक दिन हा केवळ औपचारिक सण नाही; तो समाजाच्या प्रगतीचा, संस्कारांचा आणि भविष्यनिर्मितीचा द्योतक आहे. त्यामुळेच आपण त्याकडे भविष्यवेधी उत्सव म्हणून पाहिले पाहिजे.


शिक्षक हे फक्त ज्ञान देणारे नसतात, तर ते विद्यार्थ्यांच्या विचारसरणीला आकार देतात. विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये, चारित्र्य, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, तसेच समाजाभिमुख दृष्टीकोन रुजविण्याचे काम शिक्षक करतात. आजची विद्यार्थी पिढीच उद्याचा समाज आणि राष्ट्र घडवते, त्यामुळे शिक्षक दिन हा भविष्यातील पिढी घडविणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करणारा दिवस ठरतो.

आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञान मिळवणे सोपे झाले आहे. मात्र माहितीच्या महासागरात योग्य आणि अयोग्य यातील फरक विद्यार्थ्यांना कळावा, यासाठी शिक्षकांची प्रेरणा आवश्यक आहे. भविष्यातील आव्हानांना समर्थपणे तोंड द्यायचे असेल, तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नाही तर विचारशक्ती, सर्जनशीलता आणि मानवी मूल्ये यांची जोड द्यावी लागेल. त्यामुळे शिक्षक दिन हा केवळ भूतकाळाच्या गौरवाचा नव्हे, तर भविष्यासाठीची दिशा दाखवणारा उत्सव ठरतो.


या दिवशी शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांची भाषणे असे उपक्रम होतात. पण या सोहळ्याबरोबरच शिक्षक दिन आपल्याला शिक्षण व्यवस्थेतील आव्हाने, शिक्षकांचे योगदान आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य यावर विचार करण्याची संधी देतो. म्हणूनच शिक्षक दिन साजरा करणे म्हणजे भविष्यातील समाजाचे शिल्पकार असलेल्या शिक्षकांचा गौरव करणे होय.

आजच्या काळात शिक्षकांची भूमिका अधिक व्यापक व आव्हानात्मक बनली आहे. पूर्वी शिक्षक ज्ञान देणारे, मार्गदर्शन करणारे आणि आदर्श व्यक्तिमत्त्व घडवणारे मानले जात. आजच्या डिजिटल युगात मात्र विद्यार्थ्यांना माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट, मोबाइल, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारखी साधने सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणारा शिक्षक नव्हे, तर योग्य दिशादर्शन करणारा, मूल्यसंस्कार रुजवणारा व विचारांची चिकित्सकता विकसित करणारा शिक्षक आवश्यक आहे.

आजची विद्यार्थी पिढी प्रगत तंत्रज्ञानाच्या संगतीत वाढत आहे. त्यांची विचारसरणी, कल्पकता आणि आत्मविश्वास नक्कीच कौतुकास्पद आहे. पण त्याचबरोबर त्यांच्यात धीर कमी होणे, स्पर्धेचा वाढता दबाव, मानसिक ताणतणाव यांसारख्या समस्या देखील आहेत.

अशा वेळी शिक्षकांनी केवळ शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या भावनिक व सामाजिक विकासालाही हातभार लावणे आवश्यक आहे.शिक्षक दिन आपल्याला आठवण करून देतो की शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार आहेत. आजची विद्यार्थी पिढी उद्याची राष्ट्रशक्ती आहे. त्यांच्या अंगी नैतिक मूल्ये, समाजाभिमुखता, पर्यावरणाची जाणीव, तसेच ज्ञानासोबत कर्तव्यनिष्ठा विकसित करणे ही खरी वेळेची गरज आहे. हे कार्य फक्त प्रेरणादायी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच शक्य आहे.


यामुळे शिक्षक दिन हा केवळ एक औपचारिक सोहळा नसून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध दृढ करणारा, शिक्षणाचे खरे उद्दिष्ट अधोरेखित करणारा आणि भविष्यकाळाचा पाया रचणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे.
शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी यांचे परस्पर संबंध, संवाद व सहभागाला शिक्षक–विद्यार्थी आंतरक्रिया असे म्हटले जाते.

ही आंतरक्रिया जितकी प्रभावी असेल तितके शिक्षण अधिक परिणामकारक व उपयुक्त ठरते. कारण शिक्षण ही एकतर्फी प्रक्रिया नसून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सक्रिय संवाद व अनुभवांची देवाणघेवाण आहे.पूर्वीच्या काळात शिक्षक हा ज्ञानाचा एकमेव स्रोत मानला जायचा. विद्यार्थी शांतपणे ऐकणारा व शिकणारा असायचा. मात्र आजच्या काळात ही संकल्पना बदलली आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती व स्वतः शोध घेण्याची वृत्ती वाढली आहे. त्यामुळे आज शिक्षकाची भूमिका माहिती देणाऱ्याची नसून मार्गदर्शक, प्रेरणादायी नेता व सह-अध्ययनकर्ता अशी झाली आहे.


शिक्षक–विद्यार्थी आंतरक्रिया वर्गखोल्यात विविध प्रकारे घडते. प्रश्नोत्तर पद्धती, गटचर्चा, प्रात्यक्षिके, प्रकल्प, भूमिकानाट्य, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर या माध्यमांतून ही आंतरक्रिया समृद्ध होते. विद्यार्थी जेव्हा शिक्षकांशी संवाद साधतो तेव्हा त्याच्या शंका दूर होतात, नवीन कल्पना जन्म घेतात व त्याची विचारशक्ती विकसित होते.
ही आंतरक्रिया केवळ ज्ञानार्जनापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या भावनिक, सामाजिक आणि चारित्र्यविकासातही मोलाची भूमिका बजावते.

शिक्षकाचे मार्गदर्शन, प्रोत्साहन व समजूतदार वर्तन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. तर विद्यार्थ्यांची उत्सुकता, प्रश्न विचारण्याची तयारी व सकारात्मक प्रतिसाद शिक्षकांनाही अधिक परिणामकारक अध्यापन करण्यास प्रवृत्त करतात.आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षक–विद्यार्थी आंतरक्रियेला नवे परिमाण लाभले आहे. प्रत्यक्ष उपस्थितीऐवजी तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही संवाद साधला जातो.

मात्र या प्रक्रियेत मानवी स्पर्श, भावनिक नाते व मूल्यसंस्कार टिकवून ठेवणे हे शिक्षकांसाठी मोठे आव्हान आहे.अखेर, शिक्षक–विद्यार्थी आंतरक्रिया हीच शिक्षणाची खरी ताकद आहे. ती जितकी सशक्त, खुली व सकारात्मक असेल तितके विद्यार्थी ज्ञानसंपन्न, जबाबदार व संवेदनशील नागरिक म्हणून घडतील. शिक्षक व विद्यार्थी यांचा परस्पर संवाद हा केवळ शिक्षणाचा पाया नसून भविष्यातील समाजरचनेचा मजबूत दुवा आहे.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

पण यामध्ये शिक्षकांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा हा प्रश्न आज खूप महत्त्वाचा आहे.समाजाच्या घडणीत शिक्षकांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे सांगायलाच नको. शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारा नव्हे, तर संस्कार, मूल्ये व चारित्र्य घडवणारा मार्गदर्शक आहे.

म्हणूनच प्राचीन काळापासून गुरूला अत्युच्च स्थान देण्यात आले. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः” अशी गुरुची महती गातानाच समाजाने शिक्षकाला दैवताचे रूप दिले.मात्र काळानुसार समाजाचा शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. पूर्वी शिक्षकांविषयी आदर, श्रद्धा व निस्सीम विश्वास होता. गुरुकुल पद्धतीत विद्यार्थी गुरूंना सेवाभावाने शिकत असत. समाज त्यांना मार्गदर्शक, तत्त्वज्ञ व न्यायाधीश मानत होता.

आजच्या आधुनिक युगात शिक्षकांविषयीचा दृष्टिकोन काहीसा द्विधा आहे. एका बाजूला समाजात अजूनही शिक्षकांना ‘भविष्याचे शिल्पकार’ मानून गौरवले जाते. विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय शिक्षकांनाही दिले जाते. विविध पुरस्कार, सन्मान व शिक्षक दिनाचे कार्यक्रम यांतून त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. पण दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी शिक्षकांकडे केवळ नोकरी करणारा कर्मचारी म्हणून पाहिले जाते. शिक्षणाला व्यापारीकरणाची जोड मिळाल्याने शिक्षकांची प्रतिमा कमी करण्याचा प्रयत्न होतो.

विद्यार्थ्यांच्या अपयशासाठी, शाळेच्या अडचणींसाठी किंवा शैक्षणिक त्रुटींसाठी समाज सरळसरळ शिक्षकांनाच जबाबदार धरतो. त्यामुळे शिक्षकांवरील विश्वास काही प्रमाणात कमी झाल्याचे जाणवते.तथापि, शिक्षकाचे खरे स्थान समाजाला नेहमीच मान्य करावे लागेल. कारण डॉक्टर शरीर बरे करतो, वकील न्याय मिळवून देतो, अभियंता इमारती उभ्या करतो; पण शिक्षक या सगळ्यांना घडवतो.

समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामागे कुठेतरी एखाद्या शिक्षकाचा हात असतो. म्हणूनच शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी आदरपूर्ण, सकारात्मक व प्रेरणादायी असला पाहिजे.आज गरज आहे ती समाजाने शिक्षकांचा सन्मान करण्याबरोबरच त्यांना पाठबळ देण्याची. शिक्षकांचे कार्य केवळ नोकरी म्हणून न पाहता राष्ट्रनिर्मितीचे साधन म्हणून गौरवले, तरच शिक्षणव्यवस्था मजबूत होईल.

शेवटी असे म्हणता येईल की – शिक्षकांकडे समाजाचा दृष्टिकोन हा केवळ आदराचा नव्हे, तर कृतज्ञतेचा असला पाहिजे. कारण शिक्षक घडवतो ती केवळ पिढी नव्हे, तर संपूर्ण समाजाची मानसिकता आणि संस्कृती.म्हणून अभिमानाने असे म्हणता येईल की – शिक्षक दिन हा फक्त सण नाही, तर भविष्यातील राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे. तो शिक्षक–विद्यार्थी नात्याला दृढ करतो आणि उज्ज्वल उद्यासाठी नवी प्रेरणा देतो. म्हणूनच शिक्षक दिन हा खऱ्या अर्थाने एक भविष्यवेधी उत्सव आहे.

Avinash Ganjiwale

-अविनाश अशोकराव गंजीवाले (स. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजगाव
पं. स. तिवसा जि. अमरावती
मो. नं. 9371733659


• नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

QR 1


Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.