Sunday, October 26

शेगाव हादरलं! गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर वारंवार अत्याचार; आरोपीच्या बहिणीचाही सहभाग

शेगावमध्ये विवाहितेला गुंगीचे औषध पाजून वारंवार अत्याचार, आरोपी व बहिणीवर गुन्हा

शेगाव : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातून संतापजनक व अंगावर काटा आणणारे प्रकरण उघडकीस आले आहे. विवाहित महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले असून या प्रकरणात आरोपीसोबत त्याची बहीणही सामील असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या घटनेमुळे शेगाव शहर हादरले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

फिर्यादी विवाहित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सचिन ज्ञानेश्वर चोपडे याने तिला आपल्या घरी बोलावले. तिला चहा देत त्यामध्ये गुंगी आणणारे औषध मिसळले आणि ती शुद्ध हरपल्यावर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. इतक्यावरच तो थांबला नाही तर पीडितेचे नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीमुळे पीडिता दीर्घकाळ आरोपीच्या अत्याचाराला बळी पडत राहिली.

या गुन्ह्यात आरोपीच्या बहिणीचीही भूमिका समोर आली आहे. संपूर्ण प्रकरण माहिती असूनही तिने हा गुन्हा लपवला आणि भावाला सहकार्य केले, असा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपीसह त्याच्या बहिणीवरही गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी शेगाव शहर पोलिस ठाण्यात अप क्र. 523/2025 नोंदवून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 64(2)(m), 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची धुरा पोलीस उपनिरीक्षक संदीप बारींगे यांच्या हाती असून, शहरात या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे.

अलीकडेच जिल्ह्यात वृद्ध आई-वडिलांचा मुलाकडून खून आणि प्रेमी युगलाचा दुहेरी खून झाल्याच्या घटनांनी धक्का दिला होता. त्यात आता महिलेलाही सुरक्षितता नाही, असे वास्तव अधोरेखित करणारी ही घटना उघड झाल्याने नागरिकांत भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.