
प्रिय वरुण… वसुंधरेचं हृदयस्पर्शी पत्र; पावसाशी संवाद साधणारी धरणीमातेची कहाणी!
प्रिय वरुण,
मी आता इथे आयसीयुमध्ये असताना, श्वास कोंडत असताना, तुला पत्र लिहू कि नको, या विचारात असतानासुद्धा, शेवटी माझ्या मनातल्या भावना तुझ्यापर्यंत पोचवायच्या असतील तर दुसरा पर्याय नाही. या माझ्या लेखनाने तुला काही फरक पडेल कि नाही? माहित नाही. आणि तसेही मी तुला काही सांगत असताना तू कधी काही ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नसतो, तर कधी मला जमत नाही. कधी तू ऐकून न ऐकल्यासारखं करतो. पण असो.
माझ्या प्रिया, मागच्या वर्षी तू दिवाळीत आला होतास. म्हणजे धावपळीत ओझरते दर्शन देऊन गेलास. पण अहाहा! काय रम्य दिवाळी होती ती. तुला बघून मी आणि माझी मुलं किती रे सुखावून गेली. तू आलास ना तर तुझ्या प्रेमळ स्पर्शाने आणि मायेने आम्हांला तसं फील होतंच. परत लवकरच येतो, असं सांगून तू गेलास, नाताळ संपून नवे वर्ष सुरु झाले. कडाक्याची बोचणारी थंडी गायब होऊन उन्हाळ्याचे चटके सुरु झाले. पण तू कुठे गेला होतास? काही पत्ता नव्हता. तू परत येशील, या भरवशावर मी आणि माझी लेकरं तुझी वाट बघत होती. काही दिवस थांबा, तू नक्कीच येणार, हे मी त्यांना समजावून सांगत होते. तुझी वाट बघून मी तर आतल्या आत झुरत होते. कडक उन्हाळ्यात मी तर अगदी रया गेल्यासारखी झाली होते. उन्हाळ्यात चैत्राच्या महिन्यात सगळे जण आनंदात असताना मी मात्र एकली तुझी वाट बघत असते. तुझ्याशिवाय मला आणि माझ्या आयुष्याला खरंच अर्थ नाही रे. मी मनातल्या मनात किती तरी देवांना विनवणी केली असेल, माझा प्रिय वरुण जिथे असेल तिथून सुखरूप मला भेटायला लवकर येऊदे. माझ्या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद पसरू दे.
देवानं माझा धावा ऐकला. आणि एके दिवशी मे महिन्यात भर दुपारी तू खरेच आलास की. माझ्या लेकरांनाच काय, मला आणि तुला ज्यांनी ज्यांनी येताना पाहिलं, त्यांना हे नवलच वाटलं. कि हे असं कसं झालं. कि तू वाट चुकला? न सांगता, चाहूल लागू न देता, तू खरंच आलास. पण आमच्या सर्वांच्यासाठी तुझं येणं महत्वाचं होत. तू आता असा अचानक का आलास? कुठे भांडण केलेस का? कसा आलास? हे प्रश्न विचारायच्या मनःस्थितीत आम्ही नव्हतोच. खरं सांगू का, तू दिसलास ना, कि माझ्या लेकरांना आणि मला सुद्धा तुला काही विचारायचं भानच राहत नाही. पोरांचे चेहरे खुलले. शेवटी तूच ना रे त्यांचा मायबाप. त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आता तू आला आहेस तर, तू आहे तोपर्यंत काय काय करायचे? याच्या विचारात त्यांची रात्र आणि दिवस जायला लागले. माझं तर विचारूच नको. कुणी मला ओळखू शकणार नाही, इतका बदल लगेच माझ्यात झाला. उन्हाने धुपून आणि करपून गेलेली माझी काया तुझ्या स्पर्शाने आतूनबाहेरून मोहरली. तुझ्या स्पर्शाचे अंश माझ्या शरीरात स्थिरावले आणि मी माझ्या जगात हरखून गेले. नव्या नवलाईने मी ल्यावून निघाले. सुकलेली वेल एका रात्रीत बहरून यावी, असा विलक्षण बदल माझ्यामध्ये झाला. आता तू थांबावे, आम्हाला सोडून दूर दूर जाऊ नये. गेलास कुठे गावा-शिवारात, तर चार आठ दिवसांत लगेच परत यावे, असं राहून राहून वाटायचे. माझ्या प्रियकरा, तुझ्या असण्याशिवाय माझ्या असण्याला खरंच अर्थ नाही रे. त्या तप्त मे महिन्याच्या उन्हाळ्यात मी तुला बोलले, “या लेकरांच्या तोंडाकडे बघ. जरा माझ्याकडे बघ. आम्हांला सोडून दूरदेशी जाऊ नकोस. तू नसलास ना कि जीव आतल्या आत नुसता घुसमटतो. मला काय वाटते? हे कुणाला सांगता पण येत नाही. आणि तुझ्याशिवाय आम्ही जास्त काळ राहू पण शकत नाही. आता काही झालं तरी आम्हाला सोडून जाऊ नको आणि आम्ही पण तुला जाऊ देणार नाही.” असं आम्ही तुला कितीदा विनवले. “पुन्हा असं काही करणार नाही आणि तुम्हाला सोडून जाणार नाही,” असं तू आम्हांला तेव्हा वचन दिलेस, आणि स्वर्ग सुख आमच्या हाती आलं, असं वाटून गेलं.
तुला अचानक गायब व्हायची, जुनी सवय आहे, म्हणून आम्ही तसं म्हणत होतो. तू असा अचानक निघून गेलास तर आम्ही खायचं काय? कुणाच्या तोंडाकडे बघायचं? अशा वेळी या लेकरांचे चेहरे सुद्धा बघवत नाहीत. हे का तुला सांगायला पाहिजे का? निदान आमची वर्षभराची बेगमी करून तू निघून गेलास तर एकवेळ तू जेव्हा केव्हा परत येशील तेव्हा निदान आम्ही ठीकठाक असू. तसं ही तुझं घर वाऱ्यावर असल्यासारखा तू वागतोस. किती ठिकाणी तू अशी घरे बनवलीस आणि किती ठिकाणी तुझी लेकरं आहेत? तुला आणि देवाला माहित. असो, त्या बाबतीत मी तुला माफ केले आहे.
यावेळी तू जाऊ नये, या आमच्या हट्टाचा तू असा सूड घ्यावास, हि आमची अपेक्षा नव्हती. अरे आमच्यासाठी तू लाखात नंबर एक आहेस. तुझ्याशिवाय मी कधी कुणाचा विचार केला नाही. माहित नाही यावेळी तुझ्या डोक्यात असं काय वेगळे खूळ शिरले? कि अंगात भुताने संचार केला? कि डोक्यात भलताच किडा वळवळ करत होता? तू आल्यावर सुरुवातीचे नवतीचे ते मोहरलेले आणि मंतरलेले दिवस कसे झर्रकन निघून गेले? समजलेच नाही. तुझ्या सोबत असण्याने मी झुल्याविना झुलत होते, आतून बाहेरून फुलत होते. मी माझी राहिलीच नव्हते. तुझ्याशी एकरूप होऊन मी आतून बाहेरून विरघळून गेले होते. पण माझ्या राजा, तू मात्र लगेच बदललास. बाप जन्मी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुला अशा प्रकारे वागताना कधी पाहिलेले आठवत नाही. तसंही तू कितीही त्रास दिला तरी पुन्हा तू माझ्या जवळ आलास कि आईच्या मायेने तुझ्या सगळ्या चुका पदरात घेऊन तुला माफ करायची मला जुनी खोड आहे. तुला धडा शिकवावा, असं कधी माझ्या वेड्या मनात आलंच नाही. म्हणून मला अनेकांनी खरेच वेड्यात काढलं.डी
यावेळी तुझ्या मनात मात्र काही वेगळेच होते. सुरुवातीला तू जसा वागत होता, तो तू राहिलाच नाहीस. तुझ्या मनात काय विचार चालू होते, देव जाणे. हळूहळू तू वेगळेच रूप दाखवायला सुरुवात केलीस. माझ्यावर प्रेमाची पखरण करणारा तू, पण कधी मला मारहाण करू लागला, ओरबाडू लागला, कळू पण दिले नाहीस. हे तात्पुरते दोन चार दिवस असेल असे समजून मी सहन करत राहिले. माझी लेकरं पण घाबरली. तुझा रोज बदलत जाणारा अवतार बघून त्यांच्या पण पायाखालची वाळू सरकायला लागली. इतका का उच्छाद कुणी मांडत असतं का? अंगात राक्षस घुसल्यासारखं. अरे एवढं सोन्यासारखं हे भरलेलं घर. पण तू साऱ्या घरात माती केलीस. हे एवढं सुंदर घर तू पाडून टाकलंस. लेकरांना उघडं पाडलंस. माझ्यावरचा तुझा अत्याचार बघून बोंबा ठोकत आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माझी लेकरं चारीदिशा रानोमाळ धावली. पण तिथं सुद्धा तू त्यांचा पाठलाग केलास. माझी अवस्था बघून किती दिवस झाले, त्यांच्या डोळ्यांतल्या पाण्याला खळ नाही. तुला आता काय म्हणावे? मला कळत नाही. तोच का तू? आमच्यावर जीवापाड प्रेम करणारा. आमच्यासाठी जिथे असशील, तिथून धावत येणारा, अशी मला राहून राहून शंका येते आहे.
अरे इथे मी आयसीयुमध्ये आहे. श्वास घ्यायच्या अवस्थेत तू मला ठेवलं नाहीस. तू काय काय अत्याचार केलेस, जरा आठवून बघ. अंगावर नीट त्वचा ठेवली नाहीस. ज्या माझ्या कायेला आणि रुपाला बघून कुणीही भाळावं, तिला तू ठसठसणाऱ्या जखमांचे रान बनवलेस. येतील रे या अंगावरच्या जखमा चार आठ महिन्यांत भरून. पण माझ्या आणि या लेकरांच्या मनावर ज्या जखमा झाल्या आहेत ना, त्या आयुष्यभर राहणार आहेत. या कधीच विसरणं शक्य नाही. या लेकरांना अन्न-पाणी गोड लागत नाही. आयुष्यावरचा आणि जगण्यावरचा त्यांचा विश्वास उडत चालला आहे. त्यांना कोण समजावून सांगेल. अरे रानावनात फिरायचं त्यांचं धाडस होत नाही. घरात पुन्हा पाऊल टाकायला, घर पहिल्यासारखं राहिलं नाही. तुझ्या वागण्याने भिंतींना आता उभं रहायचं त्राण राहिले नाही. पायाच खचून गेला आहे आता घरांचा, आयुष्याचा आणि मनाचा. मनाच्या भिंती कधी कोलमडतील, सांगता येत नाही. ज्या आईच्या भरवशावर हि लेकरं स्वप्न बघत होती, माणिक मोती पिकवत होती, ती रानाशिवारातील माती पार खरवडून गेली. आता उरले फक्त दगड-गोटे. ज्याला बघून आयुष्यात हेच वाट्याला आले आहे कि काय असं राहून राहून वाटते. आता देवाला एकच विनंती आहे. देवा, आम्हाला यातून सावर, आम्हाला जगण्याचे बळ दे, आमच्या मनाला धीर येईल, असा आधार दे. जगण्याची आणि कुटुंबाला जगवण्याची लढाई फार भयाण आहे. चार दिवस जमलं तर माझ्या लेकरांच्या या पडक्या घरात राहून जा. मग सगळं कळेल. औंदाची दिवाळी हि माझ्या लेकरांच्यासाठी दिवाळी नाही.
प्रिय वरुण, तुझ्यामुळे आम्ही आमची डोळ्यांतली स्वप्ने गमावली. पण असू दे. अजून आमच्यात आशा आहे. आम्ही प्रयत्न करू, पुन्हा नव्याने उभं रहायचा प्रयत्न करू. देवा, भगवंता तोपर्यंत फक्त आमच्या जगण्याला आधार दे. शेवटी तूच कर्ता आणि करविता आहेस. आता फार लिहवत नाही. सारखे लेकरांचे रडवेले चेहरे डोळ्यांपुढे येत आहेत. माझ्या लेकरांसाठी मायबाप व्हा, हीच सर्वांना विनंती आहे.
आणि प्रिय वरुण, आणखी काय लिहू तुझ्यासाठी?
फक्त तुझीच,
वसुंधरा

श्री. विष्णू औटी, (IRS),
आयकर उपायुक्त, छ. संभाजीनगर.
(लेखक- नाना, मी साह्यब झालो.)
(वरूण- पाऊस,
वसुंधरा- धरणीमाता)