
प्रिय वसुंधरा…! निसर्गाच्या वेदनेतून उमटलेले अंत:करणस्पर्शी पत्र
प्रिय वसुंधरा…!
तुझे पत्र मिळाले.वाचून मी खरेच अंतर्मुख झालो.तुझ्यावर आणि तुझ्या लेकरांवर, माझ्याकडून कळत..नकळत झालेल्या अन्यायाबद्दल मी तुझी माफी मागतो…
पण का गं प्रिये…मी हा जो उच्छाद मांडला म्हणतेस त्याला फक्त मी एकटाच जबाबदार आहे का..?तुझं नि माझं नातं तर अगदीच प्राचीन…विश्वाची उत्पत्ती झाल्यापासून आपण एकमेकांचे सहचर…एकमेकांना जिवापाड जपणारे…तुझ्या अस्तित्वाला चैतन्य देण्याचं काम हजारो..लाखो वर्षे करत आलो आहे.!
पण मी का क्रोधित आहे…माहीत आहे…? अगं ज्यांना तू आपली प्रिय लेकरं मानते,त्या तुझ्या दिवट्यांनी विकासाच्या नावाखाली जो हैदोस घातला आहे ना तो मला उघड्या डोळ्यांनी बघवत नाही.पहिल्यांदा त्यांनी कधी शेतीच्या, कधी वस्तीच्या तर कधी औद्योगिकीकरणाच्या नावाखाली तुझे हिरवेगार वस्त्र काढून तुला कुरूप करण्याचा प्रयत्न सुरू केला.तुझा प्रियकर म्हणून तुझे वस्त्रहरण झालेले मी कसा बघू…?हळूहळू यांनी हिरवीगार जंगलं नष्ट करून सिमेंटची जंगलं उभारायला सुरुवात केली. तुझ्या अंगाखांद्यावर खेळणारी तुझी इतर लेकरं उघडी पडली.त्यांचा अधिवास उजाड झाला म्हणून बावरली.काहींची निर्घृण हत्या करण्यात आली. किलबिलणारी तुझी लेकरं दिसेनाशी झाली.
मनुष्य नावाच्या तुझ्या लेकरांनी पशू,पक्षी,कीटक, जलचर सगळ्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला.आता तर त्यांनी डोंगर,टेकड्या, दऱ्या सपाट करायला सुरुवात केली.ज्या तुझ्या रूपावर मी युगानुयुगे भाळलो, तेच तुझे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले रूप मला आता कुठेच दिसत नाही.म्हणून मी दूर कुठे तरी जाऊन एकटाच कुढत बसतो.पण तुझी आठवण मला स्वस्थ बसू देत नाही.मी आवेगाने येतो…तुझ्या विरहाने आसुसलेला मी मग हमसून हमसून रडतो.इतका की तुझी लबाड लेकरं त्याला ढगफुटी म्हणतात…अतिवृष्टी म्हणतात…आमची शेती, माती वाहून गेली म्हणतात.पण आपण केलेल्या वृक्ष तोडीमुळे अगोदरच जमिनीची धूप झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अडत नाही, मुरत नाही, जिरत नाही हे आपलं पाप ते झाकून ठेवतात. सगळं किटाळ माझ्यावर टाकून मोकळे होतात.!
कधी कधी मीही अतिरेक करतो हे मला मान्य आहे..पण पर्यावरणाचा ढासळलेला समतोल मला बघवत नाही हेही तितकेच खरे आहे.वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रचंड प्रमाणात कार्बन उत्सर्जन वाढले आहे. त्यामुळे तापमान वाढत आहे.हिमनग आणि हिमनद्या वितळत आहेत.लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे नैसर्गिक संसाधनांची बेसुमार लूट सुरू आहे.तुला अंग झाकण्यापुरते सुद्धा हिरवे वस्त्र या नालाायक मुलांनी तुझ्या अंगावर ठेवले नाही.कधी काळी तू अंगभर कपड्यात वावरायची तेव्हा मला तुझा प्रेयसी म्हणून सार्थ अभिमान वाटायचा.मग मी तुझ्यावर अखंड प्रेमाचा वर्षाव करायचो…!
परंतु तुझ्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी मी कधी कधी हिंस्र होतो.माणूस नावाच्या स्वार्थी,लबाड, ढोंगी प्राण्याला धडा शिकवायचाच या भावनेने मी बेभान होतो.माझा विवेक सुटतो.दुर्दैव असे की त्याचा त्रास तुलाच सर्वाधिक होतो…!
वसुंधरे मला माफ कर.मी तुझा अपराधी आहे.पण त्याहीपेक्षा जास्त अपराधी तुझी ही बिघडलेली कार्टी आहेत. त्यांची मी कदापीही माफी मागणार नाही.उलट ते सुधारले आणि मायेने त्यांनी तुझी काळजी घेतली,तुला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले तर मला आनंदच होईल!
आपलं युगायुगांचं नातं आणि प्रेम मात्र अबाधित राहील.मी पूर्वीही तुझ्यावर प्रेम करत होतो, आताही करतो आणि भविष्यातही करत राहील.I Love You My Dear Vasundhara!
- सदैव तुझाच
- व… रू… ण.. रा…जा…!
-डॉ.बाळासाहेब शिंगोटे - खडकवाडी, ता.पारनेर,जिल्हा.. अहिल्यानगर