
प्रकाश आंबेडकरांचा घणाघाती आरोप: “विश्वगुरू की चपराशी?
अकोला: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांच्या जागतिक ‘विश्वगुरू’ भूमिकेविरुद्ध तीव्र टीका केली. त्यांनी आरोप केला की, “जागतिक पातळीवरील अनेक देश पंतप्रधानांना मित्र मानत नाहीत, उलट भारतीयांची हकालपट्टी केली जाते. हा सर्व प्रयत्न दाखवण्यासाठी केला जातो की भारत ‘विश्वगुरू’ आहे की फक्त चपराशी?”
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवातील धम्म मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. जी. वानखडे उपस्थित होते. यावेळी वंचित आघाडीच्या प्रा. अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, माजी आमदार नातिकोद्दिन खतिब, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, बालमुकुंद भिरड आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “विश्वगुरू जागतिक व्यासपीठावर गेल्यानंतर इतर नेते त्यांना बाजूला सारतात. पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्पसारख्या नेत्यांना मित्र मानतात, तरी परिस्थिती विपरीत आहे. जगातील बहुतेक देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले आहेत, अमेरिका, इराण, रशिया यांसारखे देश पाकिस्तानला शस्त्र पुरवतात. त्यामुळे भारतासाठी धोका निर्माण होतो.”
या कार्यक्रमात प्रा. अंजली आंबेडकर यांनीही केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. त्यांनी सांगितले, “वंचितांना कायम वंचित ठेवण्यासाठी प्रस्थापित समाजाकडून प्रयत्न सुरू आहेत. शिक्षणाद्वारे अनेक अन्यायकारक बाबी मोडीत काढल्या जात आहेत. मात्र, आता शिक्षणापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. भाजपचे मेंदू बंद करण्याचे राजकारण सुरू आहे.”
विश्वगुरू की चपराशी? हे दाखवण्यासाठीच भारतीयांची हकालपट्टी – ॲड. प्रकाश आंबेडकर कडाडले