‘पाटा : नव्वदच्या दशकातील ग्रामीण शेतीची आठवण आणि गावरान जीवनशैली‘
आमच्या लहानपणी म्हणजे जवळपास नव्वदचा काळ गृहीत धरू. मीरगाचा पाऊस साजरा पडला म्हणजे प्रत्येकाच्या शेतात तिफनीनं पेरण्या सुरू व्हायच्या. आजच्या सारखी ट्रॅक्टरची तेव्हा उपलब्ध नव्हती. मोठया वावरावाल्यांची तर आठ, दिवस पेरणी चालायची.बैलजोडया, गडी,माणसं कबंरीले बांधायच्या वटया,फशाट वाले असा सारा बारदाना सोबत असायचा. पऱ्याटयाईचा पेरा असो हायब्रीडच्या ज्वारीचा किंवा गावरान हुळळा खाण्यासाठी धुऱ्यावर गावरान ज्वारीची किंवा बाजरीची दहा,बारा तासं तरी हमखास पेरायची जेणेकरून बैलांना पोटभर खायला चारा भेटायचा.
थंडीच्या दिवसात तापावर भाजायला घरच्या लोकांना,लेकराबाकरांना हुळळयाची दाणेदार दुधाच्या चिकानं भरलेली रसरशीत कणसं भेटायची.व तुळशीच्या लग्नाले खोपडीसाठी कोणी चार,पाच धांडे घेतो म्हटलं तरी घरधनी मुळीच नाही नाही म्हणायचा.किंवा मना नाही करायचा. एवढा उदारपणा त्याच्या जवळ होता. संध्याकाळी गावात कडब्याची बैलबंडी गावात आली की लेकरं त्यावर चोरून लपून तूटून पडायची. किंवा बैलांच्या गव्हाणीतलं धांडे घरमालक कल्ला करणार नाही म्हणून चोरून,लपून खायची.कारण ही धांडे उसासारखी गोडगुटूक लागायची. पेरकंडं काढून पोरं खिशात ठेवायची.
सर्व पेरणी संपल्यावर पाटा पेरला की नाही म्हणून चाचपनी व्हायची. आता हा पाटा म्हणजे काय? तर पाटा म्हणजे गावातल्या प्रत्येक कुटुंबाचा जिवन जगण्याचा महत्वाचा भाग होता.कोणालाही सहज दिसू नाही अशा छुप्या ठिकाणी प्रत्येकाच्या शेतात शेताच्या मध्यभागी वा शेतमालाच्या बांधावर हा पाटा पेरल्या जायचा.किंवा हायब्रीडच्या मधात जिथे सहज कोणालाही जाता येणार नाही किंवा तुरीच्या तासांच्या मधोमध पाटाच्या ठिकाणी म्हणजे जेथे जमीनीत थंडावा आहे. अशा ठिकाणी तो पेरायचा.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
म्हणूनच त्याला पाटा म्हटलं असावं. त्याकरिता लागणाऱ्या बियांची व्यवस्था अगोदरच वावराची घरधनीन म्हणजे मालकीन अगोदरच चार घरं हूडकून करून ठेवायची. एखाद्या बाभुळवर कारल्याचा, दोडक्याच्या वेल सोडला जायचा.सुंदर हिरवीगार वायकं,शेरन्या,शेंगा भेंडं,बरबटीच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा,किंवा ताज्या गवाराच्या शेंगा,शेफुची भाजी,अंबाडीची भाजी, किंवा लाल बोंडया ज्याची चटणी मस्त लागायची.टमाटयाची दहा,पंधरा झाडं,हमखास सापडायची. काही वायकांच्या मस्त फुटा सापडायच्या.फक्त सम्पूर्ण पसरलेल्या थंडगार वेलाखाली सापाची भिती मनात रहायची.

काळजीपूर्वक वेल अलगद बाजूला करून तोडल्या जायची. आंबट शेरन्या भेटायच्या. त्या खायला रूचकर लागायच्या व शरीराला आरोग्यदायी असायच्या किंवा कापून मिठ घालून उन्हात वाळवून ठेवायच्या नंतर तेलात तळून खिचडी सोबत सुंदर लागायच्या. किंवा बेसनात घालायच्या व मस्त मनमुराद खायच्या. ह्याच निघालेल्या भाज्या शेजारी , पाजारी वाटायच्या. प्लेटभर नवयीच्या केलेल्या भाजीची निःसंकोचपणे देवाणघेवाण व्हायची.आम्ही तर दुपारच्यावेळी एक चाळीसला शाळा सुटली म्हणजे शाळेतल्या पोरांच्या घरी अंगत पंगत करायचो. रेडीओवर एक चाळीसचे गाणे लागायचे.
शाळेच्या रस्त्यावर एका शिंप्याच्या दुकानात कनोड्यात रेडू होता. त्याचा आवाज दूरवर पसरायचा. घरी दप्तर ठेवलं न्हानीत तमरेट घेउन गंगायातल्या पाण्यानं हातपाय धुतले म्हणजे एकत्रीत सवंगडयासोबत गोपालकाला व्हायचा एखाद्याच्या घरून प्लेटमर भाजी त्याच्या इथून भाकरी किंवा लोणच्याची फोड असं सोबत एकत्र जेवायचो. मज्जा यायची. जेवल्यावर परत दप्तरं पाठीवर टाकून शाळेची वाट धरायची.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
हंगामाच्या दिवसात तर दिवसभर कापूस वेचणी नंतर संध्याकाळी घराकडे जाण्याच्या अगोदर पाटा शोधून त्यामध्ये असलेला ताजा,ताजा भाजीपाला खायला भेटायचा. त्यामध्ये बारक्या टमाटया पासून तर बारक्या चिलाटी वांग्यापासून सर्व पाटयात एकाच ठिकाणी सापडायचं. ताजी टवटवीत वायकं,फुटा खायला जोरदार लागायच्या.खाऊन पोट भरले म्हणजे पाणी संपलेल्या भरण्यात भरून घरी आणून संध्याकाळच्या मिणमिणत्या उजेडात रात्रीच्या भाजीसाठी निवडायची तयारी व्हायची. चुलीवर ताज्या गवाराच्या शेंगांची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून खमंग गावरान ज्वारीच्या भाकरी सोबत मस्त लागायची.
कधीकधी तर फोडणीचा ठसका चार घरच्या लोकांचा लायशेंबुळ एक करायचा.सोबत तोंडी लावायला कच्ची करडूची भाजी,तांदूयजीरा,पाथरवटाची भाजी सुपर लागायची. ताज्या वेलाच्या रसाळ कुयऱ्या तर तोंडाला पाणी सोडायच्या. मला तर शेफूची कच्ची भाजी खायला खुप आवडायची व अजूनही मी बाजारात तीचा शोध आवर्जून घेतो.रसरसीत वालाच्या शेंगा तीळ टाकून सुंदर भाजीचा सुगंध घरादारात दरवळायचा. फक्त काही चोरटे झाकटीतच येऊन किंवा सकाळीच हुसकवासक करून चोरून घेऊन जायची. त्याकरिताच हा पाटा गुप्त ठिकाणी पेरल्या जायचा.जो सर्व आबालवृद्धांना आरोग्यदायी असायचा.
– विजय जयसिंगपुरे, अमरावती
भ्रमणध्वनी – ९८५०४४७६१९
#पाटा#शेतीआठवणी#ग्रामीणजीवन#गावरानभाज्या#मराठीलेख#गावआठवणी#Amravati#ग्रामीणसंस्कृती
• नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन