
भावाबहीणीचं नातं..!
ओवाळणीच्या ताटात
नोटा टाकून झाल्यावर……..
त्याने तो कागद पुढे केला
आणि लहानशी रिकामी जागा दाखवत म्हणाला…
ताई इथं तुझी सही हवीय फक्त…
तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला
पदराने डोळे पुसत हसत म्हणाली,
आण तो कागद
दादा सही करते
फक्त एक वचन देऊन जा
वर्षभर आला नाहीस तरी चालेल
दर भाऊबिजेला न चुकता येत जा..
माय बाप गेलं
आत्ता माहेरही रुसलं आहे..
मातीतल्या नात्याचं
नावही पुसलं आहे..
मुलांना चांदोमामाची ती
रोज गोष्ट सांगते..
मुलं झोपी जातात तेव्हा..
तिच्या डोळ्यात जत्रा
माहेरची पांगते..
सुखी ठेव देवा भाऊराया माझा
नवस रोज मागते..
किती किती आणि कितीतरी
भावाचं कौतुक सांगते सासरी..
अन तिच्या माहेरात फक्त तिची
वाट पाहते ओसरी…

-नितीन चंदनशिवे
● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र