
ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत . घरादारांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली आहेत .विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे . या पार्श्वभूमीवर आज राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.पण ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय ? ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते ? जाणून घेण्याचा हा प्रयत्न…
खरंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दफ्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. मात्र यात प्रामुख्याने दोन शब्द वापरले गेले आहेत.पहिला अवकर्षण काळ. ज्यात सरासरीपेक्षा १०% कमी पाऊस झाला तर अवकर्षण काळ असं म्हटलं जातं. तर दहा टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी म्हटलं जातं.ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होणे .यात पिके पाण्याखाली जातात .पिकांची मुळे कुजतात. जमिनीची पोषणतत्व धुवून निघतात.
साठवण व घरे उद्ध्वस्त होतात हा दुष्काळ पावसाअभावी नसून पावसाच्या अतिरेकामुळे उद्भवतो परंतु ढोबळमानाने असे मानले जाते की, एखाद्या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यास त्याला अतिवृष्टी म्हणतात. परंतु, जर ही अतिवृष्टी इतकी तीव्र असेल की त्यामुळे ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आणि ३० टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले, तर ती परिस्थिती ओला दुष्काळ म्हणून ओळखली जाते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात सतत किंवा नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे पिकांचे नुकसान, पूर, जीवित आणि वित्तहानी, तसेच पाण्याचा सुकाळ अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला ओला दुष्काळ म्हणतात.
ओला दुष्काळ जाहीर करण्यात निकष :
ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष भारतात सामान्यतः सरकारच्या दुष्काळ व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांवर आणि स्थानिक परिस्थितीवर आधारित असतात. ओला दुष्काळ जाहीर करणे ही फार गुंतागुतींची प्रक्रिया आहे. जिथे पाऊस सामान्य किंवा पुरेसा असतो, पण पाण्याच्या असमान वितरणामुळे किंवा खराब व्यवस्थापनामुळे पिकांना अतीजास्त प्रमाणात पाणी पुरवठा होतो आणि हाती आलेलं पिक गमावावं लागतं अशा परिस्थितीला सामान्यपणे ओला दुष्काळ म्हणतात.
ओला दुष्काळ हा पारंपरिक कोरड्या दुष्काळापेक्षा वेगळा आहे, कारण यात पाऊस पडतो, पण त्याचा फायदा पिकांना होत नाही. भारतात कोणत्याही प्रकाराचा दुष्काळ जाहीर करण्याचे अंतिम अधिकार राज्य सरकारकडे असतात, आणि ते केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्णय घेतात.
ओला दुष्काळ जाहीर करताना सामान्यप्रमाणे खालीलप्रमाणे निकष विचारात घेतले जातात :
पर्जन्यमान:पावसाचे प्रमाण सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त असले तरी, त्याचे वितरण असमान असते. उदा., जर पाऊस कमी कालावधीत खूप पडला आणि नंतर दीर्घकाळ पाऊस नसेल, तर पिकांना गरजेच्या वेळी पाणी मिळत नाही. किंवा दिर्घकाळ पाऊस न पडता ठराविक काळात भरपूर पाऊस पडला तरी पिकांचं नुकसान होतं.
पिकांचे नुकसान : पाण्याच्या असमान वितरणामुळे (उदा., पूर किंवा पाण्याचा निचरा न होणे) पिकांचे नुकसान झाल्यास, हा ओला दुष्काळाचा महत्त्वाचा निकष असतो.
जमिनीतील ओलावा : जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण निश्चित मर्यादेपेक्षा अधिक असल्यास ओला दुष्काळ जाहीर केला जातो. याचे मूल्यांकन माती परीक्षण आणि सेन्सर्सद्वारे केले जाते.
हवामान आणि स्थानिक परिस्थिती: स्थानिक हवामानाचा अभ्यास, जसे की पावसाचा कालावधी, तीव्रता, आणि वितरण. विशिष्ट भागातील शेती पद्धती, मातीचा प्रकार, आणि पिकांचे प्रकार यांचा विचार केला जातो.
सरकारी मूल्यांकन: राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या दुष्काळ व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्थानिक प्रशासन, कृषी विभाग, आणि हवामान खात्याच्या अहवालांच्या आधारे ओला दुष्काळ जाहीर केला जाऊ शकतो. सामान्यतः, ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पिकांच्या नुकसानीचे प्रमाण, पाण्याची पातळी, आणि सामाजिक-आर्थिक परिणाम यांचे सर्वसमावेशक विश्लेषण आवश्यक असते.
ओला दुष्काळ जाहीर केल्याने कोणते फायदे मिळतात?
ओला दुष्काळ जाहीर केल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळतो. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली जीवित हानी भरून काढता येत नाही, परंतु आर्थिक नुकसान काही प्रमाणात भरून काढले जाते. २०१५ च्या नियमावलीनुसार, कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टर १३,००० रुपये आणि बागायती शेतीसाठी प्रति हेक्टर १८,००० रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई दिली जाते. काही वेळा ही मदत ५०,००० रुपये प्रति हेक्टरपर्यंत वाढवली जाऊ शकते.
ओला दुष्काळ जाहीर झाल्यास कर्जवसुली थांबवली जाते, कर्जावरील व्याज माफ केले जाते आणि शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली जाते. काही प्रसंगी कर्जमाफीही मिळू शकते. शेतकऱ्यांची घरे वाहून गेल्यास, पशुखाद्य नष्ट झाल्यास किंवा गुरे-ढोरे वाहून गेल्यास त्यासाठी नुकसानभरपाई दिली जाते.
ओला दुष्काळ जाहीर झाल्यास चारा छावण्या उघडल्या जातात आणि इतर सुविधा पुरवल्या जातात.

-प्रा डॉ सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६
ओला दुष्काळ म्हणजे काय …