
नभाला भिडावे निळ्या पाखरांनी : अरुण विघ्ने गझलसंग्रह समीक्षा
“माणसाला माणुसपण बहाल करणार्या प्रज्ञासूर्य महामानवाचे विचार मूल्य पेरणारा ‘नभाला भिडावे निळ्या पाखरांनी’ : विद्रोही कवी साहेबराव मोरेकवी, गझलकार अरूण विघ्ने यांचा “नभाला भिडावे निळ्या पाखरांनी’ हा पहिला गझल संग्रह वाचनात आला .सुरेश भट ते भीमराव पांचाळे यांनी मराठी गझल समृद्ध केली, नावारूपाला आणली,आज अनेक नवागत कवी, गझल लेखनाकडे वळले आहेत.भीमराव पांचाळे यांच्या लोकमत मधील गझल संदराने नवागतांना उर्मी दिली.गझल ही कवितेसारखीच कविता असते.तंत्रबद्ध ,भाषिक व्याकरणाचा आकृतीबंध असलेली . गझल हा तंत्रशुद्ध काव्यप्रकार आहे. सुंदर व योग्य शब्दांचा अचूक वापर गझलेत असावा लागतो.अरबीचा प्रभाव हे एक मूलाधार तत्व असल्याने काफिया रदीफ,मिसरा,शेर ,अलामत असे शब्दप्रयोग यमक, अन्त्ययमक,लघु गुरू स्वर यासाठी आले आहेत.
गझलकार अरूण विघ्ने प्रस्तूत काव्यसंग्रहात गझलेचा आकृतीबंध सांभाळण्यात यशस्वी झालेले आहेत. हा पहिलाच गझल संग्रह असूनही शब्द सौंदर्याचा वापर कौतुकास्पद आहेच आहे पण तांत्रिकदृष्ट्या ही गझल परिपूर्ण आहे वृत्ताचा व लगावली चा उल्लेख हेच अधोरेखित करते. मराठीपण जपणारी, लयबद्ध व सहज समजेल अशा साध्या शब्दांनी श्रृंगारीत ही गझल आहे.
हा संग्रह माणसाला माणूसपण बहाल करणार्या महामानवाचे विचार मूल्य पेरणाराआहे.दलित जाणीवांच्या सोबतच नागरी संवेदनाचा वास्तवदर्शी आलेख मांडणारी विघ्नेंची गझल लक्षवेधी ठरली आहे. ‘नभाला भिडावे निळ्या पाखरांनी’ हे शीर्षक गझलकार अरूण विघ्नेंवर असलेला आंबेडकरराईट विचारांचा पगडा दृढमूल करणारे आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक उन्नयनाचे क्रांतिचक्र भारतवर्षात सर्वत्र पोहचविण्याची जबाबदारी निळ्या पाखरांनी’ स्विकारावी असे कवीला वाटते.प्रज्ञासूर्याचा हा मानवमुक्तिचा लढा न्याय, स्वातंत्र्य,समता,व बंधुता ह्या जीवनमूल्याधारीत ढाच्यावर उभा आहे.हा लढा सम्यक भारताच्या नवनिर्माणासाठी पुढे नेण्यार्या विधायक विद्रोह असलेल्या ५ कविता संग्रहात समाविष्ट आहेत,हा क्रांतिरथ पुढे नेण्यासाठी सुशिक्षित तरुणांनी दिशादर्शकाची भूमिका सशक्तपणे स्विकारावी,
“भिमाच्या रथाला पुढे नेत जावे
दिशादर्श व्हावे निळ्या पाखरांनी‘” (१३)
दुभंगलेल्या चळवळीचे शल्य ” एकाच भाकरीचे “, कवितेत मार्मिक शब्दांत व्यक्त करताना गझलकार म्हणतो,….
“नाही कुणी कुणाचे गेले उडून सारे
अमुच्याच चळवळीचे आम्ही स्मशान केले” (३३)
हा आशयाचा भावगर्भ, वास्तववादी मिसरा, “एकाच भाकरीचे तुकडे समान केले
पक्षास भीमराया तुमच्या गहाण केले “(३३)
रथ चळवळीचा, ही आनंदकणातील गझल बिकाऊ , लंपट नेतृत्वाला सडकून चपराक लावते .,
“रथ सांग चळवळीचा आहे कुठे अता तो
नेशील तो पुढे की,बाताचं हाणतो मी” (८०)
आमच्या स्वार्थी सोकाॅल्ड नेत्यांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय.त्यांच्या कोतेपणामुळे आज जो तो सूर्य झाकण्याची, संविधान बदलाची कोल्हेकुई देत आहे,
“घटनेस बदलण्याचा त्यांनी प्रचार केला
सूर्यास झाकण्याचा नाहक प्रकार केला” (३६)
किंवा
” भीमा तुझ्या रथाचे मजबूत चाक असता
अश्वास रोखण्याचा कोता प्रकार केला “(३६)
साहित्यिकाची लेखणी भ्रष्ट शासन व्यवस्थेवर प्रहार करणारी, जनविरोधी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी झिजायला हवी.आज सर्वत्र उचलेगिरी,हाजी हाजी, लाळघोटेपणा दिसतो वृत्तपत्रांची पान न् पान यांची स्पष्टोक्ती देतात .या पार्श्वभूमीवर विघ्नेंची गझल वामन कर्डक, नामदेव ढसाळ, मेश्राम यांच्या जातकुळीची वाटते .ते परखडपणे भरकटलेल्या सत्तेला जाब विचारतात,
“उत्कर्ष दूर गेला, सत्ता सुमार झाली
नाकाम शासकाचा नुसताच शोर आहे “
फुसक्या, वांझ योजनांच्या घोषात सरकार मश्गूल आहे, सरकारला गर्भित इशारा देणारी रचना, “झोपलेल्या शासनाला जागवावे मी किती
कुंभकर्णा ढोलताशे वाजवावे मी किती (३२)
आपल्या शेजारच्या राष्ट्रात एकाधिकार व हूकुमी राजवटीला कंटाळून जनतेनेसंघटीत उद्रेक करून त्यांच्या आलिशान निवासस्थानी धडकून अक्षरशः देशोधडीला लावले.,शासकाला तोंड काळे करून पलायन करावे लागले, भारतीय प्रजासत्ताकाची भक्कम इमारत संविधानावर उभी आहे.राज्यघटना ही भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे ह्याची जाणीव व महत्व जनता जाणते .इथे राज्यापेक्षा जानती प्रजा आहे., म्हणूनच हा देश एकसंध आहे .कवीने “संविधान आहे ‘कवितेत राज्यकर्त्यांच्या मर्यादा सूचित केल्या आहेत,
“जोवर असेल घटना नांदेल लोकशाही
समजू नये कुणीही मोकाट रान आहे” (२७)
संविधान, लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी घरातील प्रत्येकांच्या मनात संविधान पोहचण्या आधी सर्वांना शिक्षण हे वाघिणीचे दुध प्राशन करावे लागेल.तरुणाईला भूतकाळाचा, फुले शाहू आंबेडकरांच्या संघर्षाचा विसर पडला आहे ,आपली वैचारिक ठेवण भरकटते आहे. आरक्षणातील घुसखोरी, जाती-जातीतील अभिनिवेश आता तर अनुसुचीत जाती प्रवर्गाचे वर्गीकरण करण्याची घोषणा सरकारने केली आहे . जाती-पोटजातीत वितुष्ट निर्माण करून अंतर्गत संघर्षाचा फायदा उठवत राज्यकर्ते सत्ता संपादनासाठी धर्माचे विखारी हत्यार म्हणून गावकूसाबाहेरची पूर्वीची संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी धार्मिक अवडंबराचे उदात्तीकरण करते आहे,हे रोखण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी शस्त्र आहे . बाबासाहेबांना डोक्यावर मिरविण्यापेक्षा मस्तकात बसवण्याचा सल्ला कवी देतो,
“उपकार बा भीमाचे विसरू नका कुणीही
डोक्यात त्यास ठेवा जे पुस्तकात आहे” (२९)
अरुण विघ्नेंची गझल प्रबोधन करते .तशीच ती अस्सल धम्मानुगामी व धम्माभिमानी आहे.”बुद्ध मार्गी” तत्वज्ञान जपणारी आहे,
“जीवनाला सार्थ करण्या बुद्ध मार्गी चालतो मी सत्य मार्गी माणसाशी प्रेमभावे वागतो मी”(६७)
हा बुद्ध वसा अडाणी आई प्राणापल्याड जपते
” शिक्षित नसली तरी विचारी बुद्धीने ती हुशार आहे
नव्या पिढीच्या नातवासही बुद्ध सांगते आई”(४२)
बुद्ध धम्माने सर्वांना स्वयं प्रकाशित केले आहे,
” मी अत्त दीपं झालो माझी कमाल नाही
ज्याने दिला धडा तो सार्या जगात आहे “(२८)
‘सोडा विहार आता’, ‘मी मोडले तरीही’, ‘बुद्धत्व मिळविताना’,’जगणे विशाल झाले’ , ‘सोडा विहार आता’ , ‘मी मोडले तरीही’ ,’उरी वेदनेचा जसा वार झाला’ इत्यादी रचना बौद्ध तत्वज्ञान, सम्यक जीवनमूल्ये रूजविणार्या आहेत. अरूण विघ्ने हे कवी ,शिक्षक असल्याने त्यांचा अनुभव दांडगा आहे, समाजातील विविध घटकांसोबतचा संपर्क विस्तृत आहे . कवींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सर्व संचितामुळे अनेक विषय कौशल्यतेने हाताळले आहेत, अर्थातच मानवी वेदना, शोषितांच्या वाटेला आलेल्या अवहेलना हा विषय अग्रणी राहिला आहे.
निसर्ग, पाउस,शेतशिवार, शेतकरी,नाती, दैनिक जीवन,अशा चौफेर आशयाचा समावेश गझल संग्रह वाचताना मन हेलावून टाकणारा आहे.शेतकरी जीवनातील वेदनेवर अचूक वेध घेणारी ‘सातबारा’ गझल आशय व शब्द सौंदर्याचा आस्वाद देते वास्तव विखार मन गलबलून टाकतो,
“केली न कर्जमाफी येथील शासनाने
पडला गहाण माझा स्वस्तात सातबारा “(८२)
किंवा
” आला बराच होता, तोट्यात सातबारा
लटकून काल मेला,फासात सातबारा ” (८२)
अतिशय अल्प शब्दकळा, मार्मिक भाष्य.संग्रहातील पावसाच्या कविता दखलपात्र आहेत. वेधशाळेने वर्तविलेला अंदाज किती फोल ठरतो याविषयीचे यथोचित चित्र रेखाटनात विघ्नेंचे शाब्दिक संचय नजरेत भरते,
” अंदाज पावसाचा आला अजून नाही
आरंभ पेरणीचा झाला अजून नाही ” (६१)
निसर्ग शेतकर्यांना सतत हुलकावणी देतो.
” चोरला मुद्दाम पान्हा पावसाने
की सुपारी घेतली त्याची ढगाने” (६०)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महनीय कर्तृत्वाला मानवंदना देणारी “कोंडमारा” ही कसदार कविता आवर्जून वाचायलाच हवी. हा देश संविधानाच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहे, सामान्य जनतेला समान संधी , हक्क अधिकारांची घटनात्मक तरतूद करण्यात आली आहे ,
“समजू नये जराही कमजोर लोकशाही
देशात कायद्याचा असतो खडा पहारा ” (४३)
जातीय व्यवस्थतेने भीम बाळाच्या शिक्षणाचा कोंडमारा केला त्याच्याच लेखणीतून अवतरल्या संविधानाचा विश्वात दरारा आहे. भागवत बनसोडे यांची,-
सम्यक विचाराची मांडणी करणारी, काळाच्या मर्यादा ओलांडणारी ‘निळी गझलाई ‘अशी उंचीवर नेऊन ठेवणाररी पाठराखण लाभली आहे. कोणतेही साहित्य हे समाजाला बांधिल व जबाबदार असले पाहिजे हा सिराज शिकलकरांचा प्रस्तावनेवतील चौकस विचार “नभाला भिडावे निळ्या पाखरांनी’ या गझल संग्रहातील पानापानावर अंकीत झालेला दिसतो. बाजीगर प्रकाशनाने संकर्षक संग्रह वाचकांच्या हाती सोपवला आहे, अभ्यासक ,वाचकांच्या पसंतीस उतरावा अशी आशा बाळगतो.
आंबेडकरी विचारांचा प्रभावशोध घेणाऱ्या अरुण विघ्ने यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा देतो.
समीक्षक: विद्रोही कवी साहेबराव मोरे
संवाद:९४०४०४८६०१
गझलसंग्रह: ‘नभाला भिडावे निळ्या पाखरांनी‘
गझलकार -अरुण हरिभाऊ विघ्ने ,रोहणा,वर्धा
प्रकाशन -बाजीगर , (पलूस )सांगली .
किंमत ‘:२००₹