मार्शल.! एकमेकांची उणीदुणी काढत वेळ घालवण्यापेक्षा आपण आपले काम पूढे रेटत राहू बुध्दगयेच्या बोधिवृक्षाखाली सारेच एकत्र भेटत राहू ………. मार्शल …… गल्लीबोळातून धोक्याचे सायरन सर्रास आदळत आहेत कर्णपटलावर आता आपण अलर्ट झालो पाहीजे आपल्या छावण्यांमध्येही रेड अलर्ट घोषित केला पाहीजे शत्रु हल्ल्याची तयारी करत आहे आपल्या छावण्या उध्वस्त करण्यासाठी रणगाड्यात धर्माची बारूद भरत आहे ………. मार्शल …… कुठली वेळ कशी येईल सांगता येत नाही रात्र वै-याची नसून दिवसही वै-याचा आहे आपल्यासाठी आरपारचे युध्द लढणे गरजेचे आहे संविधानाच्या संवर्धनासाठी आता आपण आपल्याच दिशेने बंदुकीच्या फैरी झाडण्यात अर्थ नाही शत्रुसैनिक सिमापार करत असतांना आपण एकमेकांचे कपडे फाडण्यात अर्थ नाही ……… मार्शल ……. वेळ अजूनही गेली नाही सुर्य अस्तास जायचा आहे अजून निरंजनेच्या निर्मळ पाण्याने सारेच जाऊ भिजून तुम्ही तिकडून या….आम्ही इकडून येऊ श्रावस्तीच्या जेतवनात एकमेकांची गळाभेट घेऊ ……… – गणेश रा.लांडगे