हिवराची झाडं, तरसाची गुफा आणि बालपणीच्या आठवणी
शहानुर नदीच्या काठा,काठानं नदीथडीनं हिवराची ही दाट झाडं दृष्टीस पडायची.मधुकर डॉक्टर यांच्या थडीपासून तर रंगराव भदे पोलिस पाटील यांच्या वावरा पर्यंत नदीकिनारी आमचं खेळायचं साम्राज्य असायचं. बंगाली बाभुयांनी दाट झाकलेला भाग,थडीकाठानं जंगली श्वापदे व तरसाच्या मोठमोठ्या गुफा.
ही तरसं रात्री शिकारीसाठी बाहेर पडायची.व दिवसा या दाट अडचणीच्या गुफेत दडून बसायची. बादशहा भाईच्या मईच्या वावरात मुंगाच्या शेंगा तोडल्यावर ताण काट्यावर मोजण्यासाठी डोक्शावर घराकडे पोतं आणतांना गोविंदराव साधुबुवांच्या मोठ्या पसरलेल्या नाल्या जवळ सगर रस्त्यावर वाढलेल्या गावरानी कडब्यातून वाट काढतांना कधीकधी ती समोरून पळून जायची.
गाढवा सारखी उंची वाघासारखे पसरट पट्टेदार मोठ्ठं तोंड खुप भिती वाटायची.एक दोघं सोबतीला असले म्हणजे जाण्याची हिमंत यायची. एकदा तर सखाराम महाराजांच्या मंदिराजोळून जाणाऱ्या गाळ रस्त्यावर मामनकरच्या वावराजवळच्या नाल्यात हा मोठ्ठा तरस दिसला. तेव्हा मंदिर खुप पडकं होतं. एखाद्या लहान लेकराचा कान फुटला किंवा वाहत असला म्हणजे लोकं एक किलोमीटर पायवाटेनं आरती घेऊन जावून मंदिरात भक्तीभावाने गुळखोबरं वाहायची.
मेंढपाळाचा देव म्हणून मंदिराची ओळख होती. तेवढं तरी बरं की नागोरावचा बुढा आंगावर घोंगडं घेउन झुडपाजवळ हातात काठी घेऊन म्हैस चारत होता. नाही तर काही खैर नव्हती.असं बिनधास्त आयुष्य होतं. बऱ्याच वेळा रात्री उन्हाळ्यात बाहेर ओट्यावर आम्ही बाजा म्हणजे खाटा टाकून हवेशीर झोपायचो.
तेव्हा पडक्या गोठ्यात बांधलेल्या तरसाने ओढून नेलेल्या बकरीच्या पिलांचा ओरडण्याचा आवाज मी बराचवेळ ऐकला होता. काही वेळाने दूरवर तो अगदी हवेत विरत गेला. बऱ्याचदा त्या गुफांच्या तोंडावर प्राण्यांची चघळलेली मोठमोठी हाडे पडलेली दिसायची. तेथे आम्ही जायचो. खोल झाडाच्या सावली पडलेल्या हिरव्यागार वाटणाऱ्या पाण्यात तासनतास पोहायचो. दिवसा सुद्धा खूप भिती वाटायची. काठाकाठाने हिरवीगार हिवराची दाट झाडं असायची.

तसं हिवराचं झाड साधंसुधं वाटत असलं तरी या झाडाचं लाकूड टणक, व तोडण्यासाठी खुपच चिकट असते. त्याचा उपयोग घरबांधणीपासून ,तर गाड्या व शेतीची अवजारे, फर्निचर व तेलघाणे याच्यासाठी उपयोग होतो. तसंच मित्राच्या झाडापासून व सालीपासून धागे काढून दोऱ्या व माश्यांची जाळी बनवितात. तसेच तीचा वापर कातडी कमाविण्यास होतो. पानांपासून काळा रंग, तर सालीपासून लालसर तपकिरी रंग मिळतो.
त्याच्या सालीची पूड उसाचा रस व ताडी-माडीपासून बनविल्या जात असलेल्या मद्यात म्हणजे दारूत वापरतात. तसेच याच्या कोवळ्या शेंगांची भाजी करतात. सालीची किंवा बियांची पूड बाजरीच्या पिठात मिसळून भाकरी करतात. मोड आलेल्या बिया शिजवून खातात. बियांमध्ये प्रथिने व खनिजे असतात. दुष्काळात वा चाऱ्याची कमतरता असली म्हणजे या झाडाची पाने आणि शेंगा शेळ्यामेंढ्यांना चारतात. खोड व मूळ यांपासून डिंक मिळतो व तो औषधी आहे.
या मित्राच्या झाडावर अनेक कीटक आपल्याला अधुन-मधून नजरेला पडतात. पावसाळा आला की जास्त प्रमाणात कीटक आपल्या अवतीभवती दिसायला लागतात. लहानपणी आपण यातल्या अनेक किड्यांशी मैत्री केलेली आहे. त्यांच्या सोबत आपण तासंतास वेळ त्यांच्याबरोबर घालवला आहे.
त्यापैकीच एक भिंग होय.आम्ही राजेहो, वावरात जाऊन नदी, नाल्याच्या काठावर गर्द हिरव्या दाट सावली असलेल्या काटेरी हिवराच्या झाडावरचे हिरवे व कथ्या रंगाचे भिंग पकडायचो. बुडाशी गच्च दाट गवत तरी साप, विंचू,इंगळ यापैकी कशाचाही विचार न करता ते घेऊन खाली झालेल्या किंवा मुद्दाम काड्या काढून ठेवून माचीसच्या डब्बीत भरून ठेवायचो. यामध्ये कथया रंगाचे भिंग कमी सापडायचे.बारीक हिवराचा पाला तोडून त्यांना खायला घालायचो. ही डब्बी शाळेत घेऊन मिरवायचो.

काहीच दिवसात मस्त लहान,लहान पिवळी धमक अंडी नजरेला पडायची. बरेच दिवस वागवायचो व नंतर घरच्यांनी धमकावले म्हणजे सोडून द्यायचो. आमच्या लहानपणी हे भिंग शेतात आजूबाजूला झाडावर भरपूर मिळायचे एका रिकाम्या डब्बीत मस्त हिवराच्या पानांच्या चाऱ्याची मऊशार नरम गादीवर ठेवायचो. झाकणाला हवा घेण्यासाठी भोके पडलेली असायची.गमंत अशी की यांच्या तोंड आणि मागील शरीरात खाच असायची त्यात अलगद दोरा बांधून ते उडायचे त्याची गम्मत वाटायची.
या खाचेमधे चुकून बोट लागल्यास चांगली कैची म्हणजे चिमटी बसायची नंतर त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून द्यायचो. पण हे चुकीचे करत होतो याचे आता वाईट वाटते. कधीकधी यांचा जीव सुद्धा जायचा.अंडी नेमकी कुठं असतात या उत्सूकतेपोटी भिंगाचं पोट दाबायचो.यामधे हिरवे सोनेरी चमकदार भिंग खुप सुंदर वाटायचे. उन्हाच्या किरणांमधे ते मस्त चमकायचे. तेव्हा हे भिंग भरपूर मिळायचे. याला काही भागात सोनपाखरू.पाचीपिंगा या नावानं सुध्दा ओळखतात. विशेषतः पावसाळ्यात हमखास पहायला मिळायचे.
हे भिंग पकडायला दोन, चार सोबती वर्गमित्र असायचे.जे जिवाची बाजी लावून काट्या- कुटयामधून हे भिंग पकडण्याचं काम मोठ्या उत्स्फूर्तपणे करायचे. काट्याने कधी कधी सदरे सुद्धा फाटायचे. घरच्यांना हा उपद्व्याप माहिती पडला म्हणजे पुठ्ठ्यावर साजरे टोले बसायचे.तरी त्याची या खेळापुढे मुळीच पर्वा नव्हती. हे बांजीदे पोट्टे नदीकाठावरील मोठमोठ्या वाढलेल्या उंच झाडावर चढून झाडाच्या मोठ,मोठ्या ढोलीत हात घालून मिठ्ठूचे पिल्लं पकडायचे. त्यांना घरी आणून पिंजऱ्यात ठेवून त्यांना कापसानं दूध पाजायचे.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
ह्या झाडाच्या ढोलीत मोठमोठे साप सुद्धा दडून बसलेले असायचे. किती बिनधास्त व अवखळ बालपण होतं आपलं, की स्वताच्या जिवाची सुद्धा मुळीच पर्वा नव्हती.असे हे सोनेरी हिरवट रंगाचे भिंग पकडून या किड्यांशी मस्त खेळायचो. बोरीच्या किंवा हिवराच्या झाडांवर,काटेरी झाडांवर हे भिंग हमखास सापडायचे. भुंग्यांसारख्या याचा आवाज यायचा. त्याच्या पायाला दोरा बांधून तो उडावायचो.
तो उडायला लागला की त्याच्यामागे सुसाटपणे पळायचो. म्हणूनच आम्हाला क्रिकेटच्या, चित्रकलेच्या क्लासची व अन्य उन्हाळी क्लासची आवश्यकताच भासली नाही किंवा तशी गरजही पडली नाही. आकाशाखाली असलेला हा खुला निसर्गच आमचा खराखुरा बालमित्र व सवंगडी होता आता हे स्वर्गसुख या आधुनिक पिढीला माहितही नाही.
– विजय जयसिंगपुरे अमरावती
भ्रमणध्वनी – ९८५०४४७६१९
• नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
