
धनगर समाजाने आता ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व घ्यावे – प्रकाश आंबेडकर
जालना : महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी आता निर्णायक लढ्याची वेळ आली आहे आणि या लढ्याचे नेतृत्व धनगर समाजाने करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे महत्वाचे विधान केले असून, राज्याच्या राजकारणात या वक्तव्यामुळे नवा राजकीय भूचाल निर्माण झाला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “ओबीसींना सध्या २७ टक्के आरक्षण आहे. मात्र तेलंगणा राज्यात हेच आरक्षण ६२ टक्क्यांपर्यंत नेले गेले आहे. तसाच प्रयोग महाराष्ट्रातही होऊ शकतो. पण त्यासाठी ओबीसी समाजाने सत्ता हाती घेतली पाहिजे. धनगर समाजाने आता पुढे येऊन ओबीसींच्या हक्कासाठी नेतृत्व घ्यावे आणि विधानसभेवर सत्ता मिळवून आरक्षण वाढवावे.”
ते पुढे म्हणाले, “ओबीसी समाजाने अनेक वर्षांपासून अन्याय सहन केला आहे. सवर्णांनी नेहमी सत्ता वापरून आपल्यावर अन्याय केला. त्यामुळे आता ओबीसींनी सवर्ण उमेदवारांना मतदान करू नये. जर ओबीसी उमेदवार नसेल, तर SC, ST किंवा मुस्लीम उमेदवारांना मतदान करून सामाजिक एकता निर्माण करावी.”
राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसी समाजात अस्वस्थता आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्यांनंतर ओबीसी समाज पुन्हा लढाऊ भूमिकेत आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींच्या बाजूने ठाम भूमिका घेत या समाजाला एकजूट होण्याचे आवाहन केले.
आंबेडकर म्हणाले, “आपली ओळख आता एकसंध ‘OBC’ अशी झाली पाहिजे. समाज विभाजनाने नव्हे, तर एकतेने शक्ती निर्माण होते. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ओबीसी म्हणून राजकीय ओळख तयार केली पाहिजे.”
मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, असंही आंबेडकर म्हणाले. “माझं उद्दिष्ट सत्तेत लोकांना आणण्याचं आहे. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या परिवर्तनाच्या चळवळीला राजकीय रूप देणं हीच माझी जबाबदारी आहे.”
यावेळी त्यांनी हिंदुत्ववादी नेत्यांवरही टिका केली. “खंडोबा देवाला गोलवलकर आणि मोहन भागवत यांनी कधी भेट दिली आहे का? हे दाखवा!” असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
धनगर समाजाच्या उपोषणावरून सुरू झालेल्या या राजकीय हालचालींमुळे राज्यातील ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा संघर्ष नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी समाजात नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र आहे.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
आता या जातीने ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व करावे