Sunday, October 26

बालपणाची निरागसता जपणारी कलाकृती – चांदणभूल

चांदणभूल मुखपृष्ठ – बालक अंधारात बसून चंद्रात बघतो, बैलगाडीचे चाक, आठ चांदण्या, ग्रामीण जीवनाचे चित्रण

नाशिकचे साहित्यिक विजयकुमार मिठे यांचा चांदणभूल हा ललित लेखसंग्रह नुकताच वाचनात आला. खरे तर या संग्रहाला ललितलेखन म्हणणे वावगे ठरेल कारण या संग्रहातील लेखन हे लेखकाच्या बालपणापासून तर साठी गाठण्यापर्यंतचा थोडक्यात प्रवास मांडला आहे त्यामुळे या संग्रहाला आत्मलेखन किंवा स्वानुभवलेखन किंवा आत्मचरित्र म्हणता येईल असे मला वाटते. चांदणभूल या कलाकृतीच्या मुखपृष्ठाकडे पाहिले की, प्रत्येकाला आपले बालपण आठवते, कधी आई सोबत, तर कधी आजी आजोबांसोबत तर कधी मामा मावशी सोबत चांदण्यारात्री आभाळाकडे बघून चांदण्या मोजायच्या आणि चंद्राच्या कला अनुभवायच्या इतकी उत्सुकता लागलेली असायची.

चांदणभूल या कलाकृतीच्या मुखपृष्ठाचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, माणसाच्या गत आयुष्याचे संदर्भ रेखाटले आहेत की काय असे वाटते. विजयकुमार मिठे यांच्या लेखनीची भाषा ग्रामीण बाजाची आहे, जे अनुभवले तेच कागदावर आले पाहिजे, वास्तव जीवनातले अनुभव व्यक्त होतांना लेखक मिठे यांनी अत्यंत सुंदर मिलाप घातला आहे. या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर संपूर्ण अंधार दाखवला आहे, मातीत बांधलेल्या एका साध्या घरासमोर एक मुलगा काळ्याकुट्ट अंधारात बसून एका आश्वासक नजरेने चंद्रातारकांकडे पहात आहे, शेजारीच बैलगाडीचे चाक अंधारात पडले आहे, वर आभाळात आठ चांदण्या दिसत आहेत असा संदर्भ रेखाटलेला आपल्याला दिसतो. यातून लेखकाच्या काही बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

चांदणभूल या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर मातीत बांधलेल्या एका साध्या घरासमोर एक मुलगा काळ्याकुट्ट अंधारात बसून एका आश्वासक नजरेने चंद्रातारकांकडे पहात आहे, शेजारीच बैलगाडीचे चाक अंधारात पडले आहे, वर आभाळात आठ चांदण्या दिसत आहेत असा संदर्भ रेखाटलेला आपल्याला दिसतो. या संदर्भाला लेखकाच्या वास्तव जीवनाची सांगड घातली गेली आहे, लेखकाने लहानपणी जे पाहिले, जे भोगले ते अनुभव कथानकाच्या स्वरुपात या कलाकृतीत मांडले आहेत. गेली चार पाच दशकापूर्वी ग्रामीण भागात वीज नव्हती, अंधाऱ्या रात्री कंदिलाच्या उजेडात किवा घासलेटच्या चिमणीच्या उजेडात घर उजळून निघायचे, असाच गरिबीचा अंधार अनेकांच्या जीवनात होता. हा जीवनातला अंधार लेखकाने खुबीने मुखपृष्ठावर साकारला आहे.

कौलाच्या सांधीतून किंवा पत्र्याच्या सापटीतुन रात्रीच्या वेळी चंद्राचे दर्शन व्हायचे. त्यावेळची गरिबीची दाहकता यातून दिसून येते. रहायला घर नसायचे, कुठेतरी पत्र्याच्या खोलीत, किंवा पाचटाच्या कोपीत राहायचे, अंगात घालायला चांगले कपडे नसायचे, घराच्या अंगणात बसून चांदण्या मोजायच्या हा बालपणाचा काळ किती सुखाचा होता. आता सिमेंटच्या घरात राहूनही तो आनंद मिळत नाही ही खंत लेखकाला पडल्याने तो लहानपणचा निरागस चेहरा मुखपृष्ठावर मुखपृष्ठचित्रकाराने साकारला आहे असे मला वाटते.

चांदणभूल या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर आठ चांदण्या दिसत आहे, या चांदण्यांचा अर्थ खूपच मजेदार आहे. लहानपणी आजी आजोबा सांगायचे आकाशात तीन चांदण्या दिसल्या की तीकांड , चार दिसल्या की बाज आणि पहाटे एक चांदणी दिसली की ती सुकाची (शुक्राची) चांदणी असायची या आठ चांदण्यांचा सदर्भ मुखपृष्ठावर घेतला असला तरी यातून मुखपृष्ठचित्रकाराने अतिशय गर्भित अर्थाने या आठ चांदण्या दाखवल्या आहेत. जीवनाकडे बघण्याचे अष्टावधान यातून दिसून येतात – आयुष्यात माणसानं चंद्राच्या शीतलतेने जीवन जगले तर माणसाच्या अंगी दया, क्षमा, शांती, मोद, भाव, स्नेह, प्रेम आणि हर्ष अशा आठ गुणांनी व्यक्ती भरला जातो आणि यामुळेच मनुष्य जीवन सुंदर होत असते अशा गर्भित अर्थाने या आठ चांदण्या दाखवल्या आहेत लेखकाने या गुणांचे राखण केल्यामुळे त्यांच्या हातून चांदणभूल सारखी कलाकृती निर्माण होऊ शकली.

चांदणभूल या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर अंधारात बैलगाडीचे एक चाक अंधारात पडलेले दाखवले आहे… पूर्वी प्रत्येकाच्या दारात बैलगाडी असायची, दळणवळणाची साधने नव्हती त्यावेळी एकमेव साधन म्हणजे बैलगाडी. ही बैलगाडी आज केवळ चित्रात उरते की काय अशी परिस्थिती झाली आहे. अनेक विविध तंत्रज्ञानाने तयार झालेल्या वाहनांची सुविधा वाढत असल्याने बैलगाडीला अंधारात खितपत पडायची वेळ आली आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी राजाचे दळणवळणाचे साधन आज अंधाराचा आसरा घेऊन राहिलेले काही क्षण जगत आहे, पूर्वी अर्थव्यवस्थेचा कणा असेलेली शेती आज मोडकळीस आली आहे, शेतीव्यवसायाला खीळ पडून जणू शेतकऱ्याचे एक चाक निखळून पडले की काय ही वस्तुस्थिती या बैलगाडीच्या चाकातून आपल्याला दिसून येते. विजयकुमार मिठे हे ग्रामीण शेतकरी जीवन अनुभवलेले लेखक आहेत. शेतकऱ्याच्या व्यथा त्यांनी जवळून पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत आणि म्हणूनच हा जुना अनमोल ठेवा भविष्याचा साक्षीदार म्हणून जतन केला पाहिजे असा संदेश मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी यातून दिला असावा असे मला वाटते.

चांदणभूल या संग्रहात एकूण तेरा अनुभव कथन मांडले आहेत. प्रत्येक अनुभवातून त्यांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. गुपितबाबाचा डोह यातून भुताटकी आणि त्याविषयीचा गैरसमज आणि त्यातून गुपितबाबाच सत्य माहिती करूनही एक श्रद्धा म्हणून त्याला शेंदूर फासून नारळ वाढवून समाजाच्या मनातला गैरसमज काढला आहे, जुनं ते सोनं या कथानकातून लेखकाने सायकलचे महत्व पटवून सांगितले आहे. वजन कमी करणे, ह्रुद्यावरचा ताण कमी करण्याचे साधन म्हणून सायकल महत्वाची आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न या कथानकातून केला आहे. चांदणभूल संग्रहातील टेरलीनचा सदरा, सोनपिवळ्या फुलांची बाभूळ, गोष्टी रंगल्या ओठी, रानमेवा, फोटोवाला, बिनपैशाचा आनंद आदी कथानक वाचनीय असून जुन्या काळातील आठवणींना उजाळा देणारे आहेत.

चांदणभूल या संग्रहातील ओघवती भाषा, ग्रामीण भाषेचा बाज सांभाळत लेखकाने केलेली शाब्दिक गुंफण वाचनीय आहे आणि म्हणूनच पुण्यासारख्या शुद्ध मराठीचा जागर घालणाऱ्या शहरी पण ग्रामीण भागातील शेतीमातीत राबणारे प्रकाशक बाळासाहेब घोंगडे यांनी अक्षरवाड्:मय प्रकाशन पुणे यांनी या कलाकृतीचे प्रकाशन करून ही कलाकृती चंद्रप्रकाशासम उजळून टाकली आहे, प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी आपल्या अभिनव कल्पकतेने मुखपृष्ठ रंगवून वाचकांचे लक्ष वेधले आहे. लेखक विजयकुमार मिठे यांनी ही कलाकृती युवा साहित्यिक प्रशांत भरवीरकर यांना सादर केली असून प्रसिद्ध साहित्यिक विवेक उगलमुगले यांनी या कलाकृतीला ब्लर्बच्या माध्यमातून पाठराखण केल्यामुळे या कलाकृतीला वेगळी उंची लाभली आहे.

प्रशांत वाघ

प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)

कलाकृती परिचय:
कलाकृती – चांदणभूल
साहित्य प्रकार – ललित लेख संग्रह
लेखक – विजयकुमार मिठे, नाशिक
संपर्क क्रमांक – ९८८१६ ७०२०४
प्रकाशक : अक्षरवाड्:मय प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठचित्रकार – अरविंद शेलार , कोपरगाव

सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा पुस्तक परिचय …

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.