
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून प्रचंड पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी कोणतीही ठोस दखल घेतली नाही, असा आरोप करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसांत आगळीवेगळी तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीत जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांना शोधून देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत आणि शेतकऱ्यांच्या दुःखाला कोणी न्याय देणार, असा प्रश्न या तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.
तक्रारीनंतर सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले :
- “शासनाचा वेळ आल्यावर दुसऱ्याच दिवशी मी बुलढाण्यात होतो. सगळ्या विभागांच्या बैठका घेतल्या आणि नुकसानीची माहिती घेतली.”
- “पदभार घेण्यापूर्वीच अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते, त्याचे पंचनामेही झाले होते.”
- “मलकापूर तालुक्यात विवरे गावात अतिवृष्टी झाली होती, तिथे मी जाऊन पाहणी केली.”
- “इतर ठिकाणी परिस्थिती चांगली असल्याने पुढे गेलो नाही. मात्र, सोमवारी रात्री पाऊस झाला तेव्हा मी ट्रेनमध्ये होतो.”
- “मंगळवारी कॅबिनेट मीटिंगमध्ये बुलढाण्याच्या गंभीर परिस्थितीची माहिती सन्माननीय मुख्यमंत्र्यांना दिली.”
सावकारे यांनी पुढे सांगितले की, ते आता चिंचलराजा आणि लोणाद भागाची पाहणी करण्यासाठी निघाले आहेत.
शेतकऱ्यांमध्ये रोष
बुलढाणा जिल्ह्यात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन, कापूस, मका ही पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांच्या पोटाला चिमटा बसला असून, त्यांना तातडीने शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. पण अशा स्थितीत दोन्ही पालकमंत्री जिल्ह्यात कुठेच न दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
या अनोख्या तक्रारीमुळे बुलढाणा जिल्हा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. राष्ट्रवादीकडून दाखल झालेली “पालकमंत्री हरवल्याची तक्रार” सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहे. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली असून, जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
संपूर्ण परिस्थिती पाहता बुलढाण्यातील शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत आणि आता या तक्रारीमुळे राजकीय पातळीवरही तापमान वाढले आहे.
———————————–
दोन्ही पालकमंत्री शोधून द्या, 11 रुपये बक्षीस मिळवा…..
——————————————————
नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
