
मृतालाही नोटीस? हायकोर्टाचा आयकर विभागाला झटका!
मुंबई : मृत व्यक्तीला आयकर विभागाने नोटीस पाठवल्याचा अजब प्रकार नुकताच समोर आला आहे. “मृताच्या नावे आयकर नोटीस पाठवली तर ती कायद्याने ग्राह्य धरता येत नाही” असा ठोस निर्वाळा बॉम्बे हायकोर्टाने देत ही नोटीस रद्द केली आहे. या प्रकरणी हायकोर्टाने आयकर विभागाच्या निष्काळजीपणावर थेट बोट ठेवत विभागाला चपराक दिली.
निनांच्या याचिकेतून उघडकीस
या प्रकरणाची सुरुवात नीना शाह यांनी दाखल केलेल्या याचिकेतून झाली. नीना शाह यांचे पती जतीन शाह यांचे 23 फेब्रुवारी 2019 रोजी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर त्यांनी तत्काळ आयकर विभागाला अधिकृतपणे कळवून याची नोंद करून घेतली होती. मात्र, ही माहिती असूनही आयकर विभागाने 2013-14 या आर्थिक वर्षातील प्रकरणात 24 एप्रिल 2021 रोजी जतीन शाह यांच्या नावेच नोटीस पाठवली.
त्या वेळीही नीना शाह यांनी मृत व्यक्तीला नोटीस पाठवण्याबाबत आक्षेप घेतला होता. न्यायालयाने ती नोटीस रद्द केल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल असे वाटत होते. परंतु, 2018-19 या आर्थिक वर्षाच्या संदर्भात आयकर विभागाने 2024 मध्ये पुन्हा जतीन शाह यांच्या नावे नवीन नोटीस काढली. मृत पतीच्या नावे पुन्हा नोटीस आल्याने नीना शाह यांनी न्यायालयात धाव घेतली.
हायकोर्टाची तीव्र नाराजी
न्या. बी.पी. कुलाबावाला आणि न्या. अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. खंडपीठाने स्पष्ट केले की, “मृत व्यक्तीच्या नावे आयकर विभाग नोटीस पाठवूच शकत नाही. जर पाठवलीच असेल तर ती आपोआप रद्दबातल मानली जाईल.” न्यायालयाने असे आदेश देताना विभागाच्या निष्काळजीपणावर कडाडून टीका केली आणि अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, असे स्पष्ट इशारेही दिले.
वारसालाच नोटीस देता येते
खंडपीठाने या प्रकरणात पुढे स्पष्टीकरण दिले. जर आयकर विभागाला मृत व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांबाबत काही शंका किंवा स्पष्टीकरण हवे असेल तर तो थेट वारसाला नोटीस देऊ शकतो. परंतु, मृताच्या नावे नोटीस काढणे हे पूर्णपणे कायद्याच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
नागरिकांचा सवाल
या घटनेमुळे नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. “आयकर विभागासारख्या महत्त्वाच्या संस्थेकडून अशी बेपर्वाई होऊ शकते का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण विभागाकडे सर्व नोंदी, मृत्यू प्रमाणपत्रे आणि अधिकृत माहिती उपलब्ध असूनही मृत व्यक्तीच्या नावावरून नोटीस पाठवली गेली, हे धक्कादायक असल्याचे मत कायदेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
आईला खतरनाक! आयकर विभागानं पाठवली मृत व्यक्तीला …