
लष्करात नेमणूक, गावात मिरवणूक; नियुक्तीपत्र निघालं बनावट, गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरलं सावट!
लखनऊ : देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या एनसीसी कॅडेटच्या जीवनात अभिमानाचा क्षण काही तासच टिकला. लष्करात निवड झाल्याच्या आनंदात गावानं ढोल-ताशांसह मिरवणूक काढली, पण काही दिवसांतच त्या नियुक्तीपत्राचं खरं रूप समोर आलं आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू सावटात बदललं.
महाराजगंज जिल्ह्यातील डोमा गावातील नगमा ही बारावीतील विद्यार्थिनी आणि एनसीसी कॅडेट. देशसेवेत जाण्याचं तिचं स्वप्न होतं. एनसीसी प्रशिक्षणादरम्यान भेटलेल्या धीरज नावाच्या तरुणानं तिला लष्करात नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. “तुझं काम चांगलं आहे, मी तुला लष्करात भरती करून देईन,” असं सांगत त्यानं तिचा विश्वास संपादन केला.
सप्टेंबर महिन्यात नगमाला गोरखपूरला बोलावण्यात आलं. तिथे तिला लष्करी गणवेश देण्यात आला, धावण्याची आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात आली पण सगळं फक्त नाटक! धीरज आणि त्याच्या साथीदारांनी नियुक्तीपत्र देण्यासाठी २.७० लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यानंतर नगमाला ‘नियुक्तीपत्र’ देण्यात आलं आणि ती आनंदाने गावी परतली.
गावात जयघोष झाला “आपली नगमा आता लष्करात गेली!”ढोल, ताशे, देशभक्तीपर गाणी, हारतुरे सगळ्या गावानं तिला वीरांगना म्हणून गौरवलं. पण काही दिवसांनी जेव्हा त्या पत्राची सत्यता तपासली गेली, तेव्हा समोर आलं की ते पूर्णपणे बनावट होतं.
नगमा आणि तिच्या कुटुंबीयांचा विश्वासघात झाल्याचं समजताच आनंदाचं वातावरण दुःखात बदललं. नगमाने तात्काळ निचलौल पोलिस ठाण्यात धीरज आणि अंगद मिश्रा यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. गावात मात्र अजूनही हीच चर्चा “लष्करात नेमणूक नाही मिळाली, पण नगमाने देशभक्तीच्या नावानं गावाला आरशात दाखवलं!”
हे वाचा-गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!
लष्करात नेमणूक, गावात मिरवणूक…
(छाया म टा)