
११७ वर्षांचा मतदार, ४० वर्षांचा मुलगा ; जयंत पाटलांचा बाण, आयोग झाला हैराण!
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना मतदार यादीतील घोळांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (१४ ऑक्टोबर) मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. बैठकीत मतदार यादीतील विसंगती, चुकीची नावे, पत्त्यांतील गोंधळ आणि अपूर्ण माहिती यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर तुफान हल्ला चढवला.
जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मतदार यादीत इतका गोंधळ आहे की ११७ वर्षांच्या व्यक्तीला ४० वर्षांचा मुलगा दाखवला आहे. काही ठिकाणी एकाच घरात अनेक लोक दाखवले आहेत, तर काही ठिकाणी घराचे नाव किंवा पत्ता नाही. ही यादी जशीच्या तशी ठेवून निवडणुका झाल्या, तर लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.” त्यांनी स्पष्ट केलं की, “आम्ही केवळ तक्रार घेऊन आलो नाही, पुरावेही दाखवले. राज ठाकरे यांनीही आयोगासमोर अनेक उदाहरणं मांडली. ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवायची असेल, तर आधी या याद्या नीट दुरुस्त केल्या पाहिजेत.”
विरोधकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी चोक्कलिंगम आणि राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी दीर्घ चर्चा केली. जयंत पाटील यांनी सांगितले की, “आयोगाने आम्ही दाखवून दिलेल्या त्रुटींची दखल घेतली आहे. मात्र काही निर्णय अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे उद्या पुन्हा सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे.”
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “हे केवळ राजकीय शिष्टमंडळ नाही, तर देशातील निवडणुका पारदर्शक व्हाव्यात म्हणून आमचा प्रयत्न आहे. केरळ, बंगाल, कर्नाटकात भाजपही हीच मागणी करत आहे. मग महाराष्ट्रात ती मागणी केली तर अडचण काय?” विरोधकांनी व्हीव्हीपॅटचा वापर अनिवार्य करण्याची, प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आणि बूथ कॅप्चरिंग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आयोगाकडे केली आहे.
जयंत पाटील म्हणाले, “शिरूर मतदारसंघातील आमचे माजी आमदार अशोक पवार यांनी मतदार यादीत घोळ असल्याची तक्रार केली, तेव्हा त्यांना उत्तर मिळाले की, मतदारांची माहिती गोपनीय आहे. निवडणुका लोकांसाठी असतात, मग मतदारांची माहितीच गोपनीय कशी राहू शकते?” त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
चर्चा अपुरी राहिल्याने उद्या पुन्हा बैठक होणार आहे. त्यानंतर विरोधक पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा जाहीर करतील. जयंत पाटील म्हणाले, “आमचं म्हणणं सोपं आहे – लोकशाही टिकवायची असेल, तर निवडणुका पारदर्शक झाल्याच पाहिजेत. याद्या दुरुस्त न करता निवडणुका घेणे म्हणजे मतदारांच्या अधिकारांशी खेळ आहे.”
११७ वर्षांच्या माणसाला ४० वर्षांचा मुलगा…