Sunday, October 26

धुळेकराचा ‘मंकी पॉक्स’ रिपोर्ट पॉझिटिव्ह; महाराष्ट्रात पहिली केस नोंद! प्रशासन अलर्टवर

धुळे जिल्ह्यात मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण

धुळे : जगभर थैमान घालणाऱ्या ‘मंकी पॉक्स’ आजाराने अखेर महाराष्ट्रातही प्रवेश केला आहे. धुळ्यातील गरीब नवाज नगर परिसरात राहणाऱ्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, ही राज्यातील पहिलीच मंकी पॉक्सची केस असल्याचे पुण्यातील एनआयव्ही (NIV) प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे.

माहितीनुसार, हा बाधित रुग्ण 2 ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियाहून धुळ्यात आला होता. तो गेल्या चार वर्षांपासून सौदी अरेबियात वास्तव्यास होता आणि मुलीच्या लग्नासाठी भारतात आला होता. मात्र, आगमनानंतर काही दिवसांतच त्वचेवर पुरळ आणि त्रासाची लक्षणे दिसू लागल्याने त्याने 3 ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणी करून घेतली.

तेथे डॉक्टरांना मंकी पॉक्सची लक्षणे दिसल्याने तातडीने नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी झाली असून, रुग्णाला तत्काळ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

सदर रुग्णाला डायबेटीज असल्यामुळे त्याचा उपचार कालावधी वाढत आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेने पथक नियुक्त केले आहे. तसेच जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मंकी पॉक्सचे क्लायड-1 आणि क्लायड-2 असे दोन प्रकार असून, क्लायड-1 हा अधिक संसर्गजन्य आणि दुर्मिळ प्रकार मानला जातो. आतापर्यंत भारतभरात 35 रुग्ण नोंदले गेले आहेत.

आरोग्य प्रशासनाने नागरिकांना भीती न बाळगता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. ताप, अंगावर पुरळ, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा शिरकाव! धुळ्यात आढळला

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.