
मोबाईलने फोटो घेतल्यास थेट निलंबन! वाहतूक पोलिसांसाठी मोठा आदेश
Traffic Police News मुंबई : वाहतूक पोलिसांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ई-चलान कारवाई करताना पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आता स्वतःचा खाजगी मोबाईल वापरून फोटो किंवा व्हिडिओ काढणे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, खाजगी मोबाईलने गाड्यांचे फोटो काढताना आढळल्यास थेट निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
वाहतूक संघटनांच्या तक्रारीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही पोलिसांच्या या मनमानीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अनेक अधिकारी खाजगी मोबाईलने फोटो काढून नंतर “सोयीनुसार” ई-चलान प्रणालीमध्ये अपलोड करतात आणि निष्पाप नागरिकांवर चुकीचे चलान लावतात, अशी तक्रार संघटनांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा आदेश जारी करून स्पष्ट केलं आहे की, ई-चलानसाठी केवळ अधिकृत उपकरणांद्वारेच फोटो किंवा व्हिडिओ घेणे बंधनकारक असेल. अन्यथा थेट शिस्तभंग कारवाई होईल.
मोबाईलने गाड्यांचे फोटो काढल्यास थेट निलंबन….
(छाया: संग्रहित)