
मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे लातूर येथील एका खासगी रुग्णालयात आज निधन झाले. जांभळढव्हपासून बिरडं पर्यंतचा प्रवास आज थांबला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हासेगाव येथील ते रहिवासी होते.मराठवाड्याच्या तहानलेल्या मातीला, दुष्काळाने होरपळलेल्या शिवारांना आणि उपाशीपोटीही मुले शिकवणाऱ्या ग्रामीण आईच्या जगण्याला शब्द देणारा सशक्त आवाज आज कायमचा थांबला आहे. ख्यातनाम कथाकार भास्कर तात्याबा चंदनशिव यांच्या निधनाने मराठी साहित्य सजीव कथनकलेचे एक तेज गमावून बसले आहे. त्यांच्या कथांनी केवळ ग्रामीण समाजाचेच नव्हे, तर जातीय, स्त्रीवादी आणि दलित जीवनाचे दु:ख, आशा, संघर्ष आणि मूक करुणा आपल्या समोर उभी केली.
१२ जानेवारी १९४५ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील हासेगावात जन्मलेल्या संवेदनशील या बालकाने पुढे मराठी साहित्याला कथाकार भास्कर चंदनशिव म्हणून अमिट ओळख दिली. निजाम राजवटीतील अन्याय, सतत जाणवणारा दुष्काळ आणि गावगाड्याचा हलाखीचा संसार—यांनी त्यांच्या लेखनीने मातीतली बीजे रोवली. वयाच्या विसाव्या वर्षी कथा लिहायला सुरुवात करणाऱ्या या लेखकाने पुढील पाच दशकांत शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया आणि वंचित समाजाचे जीवन सशक्तपणे कथेतून उतरवले.
‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘नवी वारुळं’, ‘बिरडं’ यांसारख्या कथासंग्रहांनी मराठी माणसाचे अंतरंग हलवले. भुकेने विव्हळलेली माणसे, गुराढोरांप्रमाणे जगण्यास भाग पडणारी कुटुंबे, दुष्काळाने तळपणारी पिके—त्यांच्या कथांनी वाचकांच्या मनात विषण्णतेसोबत करुणेची नवी जाणिव जागवली. साहित्याला सामाजिक जबाबदारीचे भान देत, त्यांनी कथा केवळ किस्स्यापुरती न ठेवता ती मानवी जीवनाची साक्ष बनवली.
प्रा. भास्कर चंदनशिव यांचे बालपण कळंबच्या साध्या शाळकरी वातावरणात फुलले. जिल्हा परिषद शाळेतून त्यांनी शैक्षणिक वाटचालीस सुरुवात केली आणि पुढे अंबाजोगाईत बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मराठी भाषेवरील प्रेम अधिक गहिरे करण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे एम.ए.ची पदवी संपादन केली. या काळात मराठी साहित्याचा गाभा समजून घेण्याची दृष्टी त्यांच्या मनात दृढ झाली.शिक्षणक्षेत्रातील त्यांचा कारकीर्दीचा प्रवास मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेतून सुरू झाला.
जून १९७२ मध्ये आष्टी येथील वरीष्ठ महाविद्यालयात ते मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. अध्यापनात त्यांची खासियत म्हणजे विद्यार्थ्यांना मराठी साहित्याचा गाभा सहज, प्रभावी आणि सखोल पद्धतीने समजावून सांगण्याची त्यांची शैली. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय केवळ अभ्यासक्रमापुरता न वाटता तो अनुभवण्यासारखा आणि जवळचा वाटत असे.यानंतर वैजापूर येथे अनेक वर्षे त्यांनी अध्यापन केले. भाषेच्या सौंदर्याची ओळख करून देताना त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रेरणेचे दिवे प्रज्वलित केले.सेवाकार्याचा अखेरचा टप्पा त्यांनी बीडच्या बलभीम महाविद्यालयात गाठला. येथे त्यांचे कार्य मोठ्या आदराने स्मरणात ठेवले जाते. २००५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. परंतु निवृत्ती म्हणजे त्यांच्या आयुष्यातील थांबा नव्हता, तर एका शांत व स्थिर टप्प्याची सुरुवात होती. सेवाव्रताची उजळ परंपरा जपून अखेर ते आपल्या मायभूमीत, कळंब येथे स्थायिक झाले.
फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा ठसा त्यांच्या लेखनात खोलवर आहे. त्यांनी शेतकरी चळवळीच्या प्रश्नांवरच नव्हे, तर ग्रामीण स्त्रियांच्या संघर्षावर, दलितांच्या न्यायाच्या लढ्यांवर आणि माणसाच्या उपासमार व अस्मितेच्या प्रश्नांवर थेट प्रकाश टाकला. त्यांच्या लेखणीने संकटात दबलेल्या लाखो आवाजांना आकार दिला.
लाल चिखल” ही कथा केवळ शालेय -अभ्यासक्रमाचा भाग नव्हती, तर ती एक पिढीला विचार करायला भाग पाडणारी सशक्त कलाकृती होती. जांभळडव्ह, अंगार माती, नवी वारुळं, बिरडं आणि मरणकाळ अशा त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी कथासृष्टीला नवीन आयाम दिला. माती आणि मंथन; संपादन : ज्योती म्हणे, गाथा, सगनभाऊंच्या लावण्या इत्यादी. म. ज्योतीराव फुले यांच्या शेतीविषयक विचारांच्या प्रभावातून त्यांनी शेती, शेतकरी, शेतमजूर, शेतीवर अवलंबून असणारे विविध समाजघटकांचे प्रश्न, विशेषत: कोरडवाहू शेतकरी, त्याचे शेतमालाचे उत्पादन, बाजार, हमीभाव, दुष्काळ, अस्मानी-सुलतानी, बेरोजगारी इत्यादींसंबंधी मूलभूत मांडणी पोटतिडकीने केली.
शेतमजुरांच्या जिवघेण्या वास्तवाला त्यांनी शब्द दिले, तर ग्रामीण माणसाच्या संघर्षाला त्यांनी साहित्याच्या पानांवर अमरत्व बहाल केले. ‘भूमी आणि भूमिका’ हा समीक्षा ग्रंथ आणि ‘रानसय’ हा ललित संग्रह हे त्यांच्या प्रतिभेचे द्योतक ठरले. एकूण १४ ग्रंथ प्रकाशित करून त्यांनी मराठी साहित्याचा पट अधिक गडद आणि प्रभावी करून टाकला. मराठवाडा साहित्य संमेलनाच्या २८व्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले, तर राष्ट्रीय शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाने त्यांच्या कार्याला अधिक व्यापकता दिली. अनेक शेतकरी व ग्रामीण साहित्य संमेलनांचे ते अध्यक्ष राहिले आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्या शब्दांनी आशेची नवी पालवी फुलवली.त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र शासनासह अनेक संस्थांचे पुरस्कार लाभले. परंतु खरे तर त्यांचा सर्वात मोठा सन्मान म्हणजे शेतकऱ्याच्या ओल्या डोळ्यांत आणि वाचकाच्या मनात सदैव राहिलेली त्यांची आठवण. त्यांनी दाखवून दिले की साहित्य केवळ कला नसते, तर ते संघर्षाला आवाज देणारे आणि भविष्याला दिशा दाखवणारे असते.
भास्कर चंदनशिव हे मराठी साहित्याच्या प्रवाहातील महत्त्वाचे आणि समर्थ लेखक मानले जातात. १९७० च्या सुमारास मिलिंद महाविद्यालयात झालेल्या अण्णा भाऊ साठे स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कथालेखन स्पर्धेत ‘मसणवाटा’ या कथेला मिळालेल्या प्रथम क्रमांकातून त्यांच्या साहित्य प्रवासाची सुरुवात झाली. अस्मितादर्श या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या कथांमुळे त्यांचे नाव मराठी साहित्य क्षेत्रात गणले जाऊ लागले. पुढे १९८० मध्ये जांभळ ढव्ह या कथासंग्रहाच्या प्रकाशनाने त्यांना समकालीन महाराष्ट्राचा एक समर्थ लेखक म्हणून ओळख मिळाली.त्यांच्या कथेत ग्रामीण जगण्याचे सोशीत वास्तव आपल्यासमोर येते; जातव्यवस्था, वंचना, दारिद्र्य, राजकारण-समाजकारण याचे हृदयस्पर्शी चित्रण होत राहते. परंतु त्यांच्या साहित्याला ‘ग्रामीण कथा’ म्हणणे म्हणजे त्याचा कक्षा मर्यादित करणे होय. कारण त्यांच्या कथांचा केंद्रबिंदू माणूस आहे—त्याच्या संघर्षांचा, त्याच्या वेदनांचा आणि त्याच्या जगण्यासाठीच्या अपार तळमळीचा.
सामाजिक विषमता, उपासमार, नैसर्गिक आपत्तींनी जखमी केलेले जीवन त्यांच्या साहित्याला करुणेची विलक्षण गहिरी छटा देऊन जाते.चंदनशिव यांच्या साहित्यविश्वाची पार्श्वभूमी उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भूभाग आहे. विशेषतः १९७२ च्या दुष्काळाचा त्यांच्या संवेदनशील मनावर खोल ठसा उमटला. करपलेली शेती, उपाशीपोटी गुरांसारखी जगणारी माणसं, रक्ताच्या नात्यांनाही ओझ्यासारखी भासणारी परिस्थिती—या सगळ्यांना त्यांनी आपल्या कथांत जिवंत उतरवले. त्यामुळे त्यांच्या लेखनात दुःखाची दाहकता तर आहेच, पण त्याचबरोबर मानवी अस्तित्वाविषयीची खोल करुणाही दिसते.साहित्यातून वाचकांच्या अंतःकरणाला कळवळ्याची झळक देणारे लेखक फार थोडे असतात, आणि भास्कर चंदनशिव हे अशा थोर लेखकांमध्ये अभिमानाने गणले जातात.
साहित्याच्या या दीर्घ प्रवासात दलितमित्र पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, बी. रघुनाथ पुरस्कार, पु.भा. भावे पुरस्कार यांसारख्या सन्मानांनी त्यांना गौरविले. मात्र चंदनशिव यांचा सर्वांत मोठा सन्मान म्हणजे त्यांची कथा वाचून असंख्य वाचकांच्या मनात उसळलेला भावनिक कल्लोळ आणि ग्रामीण जीवनाशी झालेले नवे नाते.
भास्कर चंदनशिव हे केवळ ग्रामीण साहित्यिक नव्हते, तर ते शेतकरी आणि सामान्य माणसाच्या वेदनांचे दस्तऐवजकार होते. त्यांनी ग्रामीण दुःखातले सौंदर्य, सामाजिक विषमतेतली दाहकता आणि करुणेतली विशालता साहित्याच्या कागदावर अजरामर करून ठेवली. आज ते नाहीत. पण ‘अंगारमाती’तला जळता शेतकरी, ‘मरणकळा’तील संघर्ष करणारी माणसे, ‘जांभळढव्ह’तील गावगाड्याची नाळ– ही सारी पात्रे अजूनही आपल्याशी बोलतात, कारण त्या कथेच्या माध्यमातून लेखकाने आपले हृदय त्या सामान्य माणसांना अर्पण केले आहे.भास्कर चंदनशिव गेले, पण त्यांचा करुणेचा स्वर, जनतेच्या संघर्षांचा इतिहास आणि साहित्यात जपलेली जीवनसंवेदना आपल्याला सतत जागवणार आहे. मराठी साहित्याचे हे एक अनंत वारसा ठरून राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली !
▪प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे
———————————————————-
———————————————————-
प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या निधनाने शेतकरी, शोषित आणि …