Sunday, October 26

मी पाहिलेली दुर्गामाऊली…

AL1OK

मी पाहिलेली दुर्गामाऊली…

शिवम प्रतिष्ठान घारेवाडी कराड येथे हृदय संमेलनाच्या निमित्ताने जाणं झालं. तिथे जे काही अनुभव आले हे अगदी थोडक्यात सांगायचं तसं कठीणच. पण नवरात्राच्या निमित्ताने मी पाहिलेली दुर्गा मला नमूद करावीशी वाटली म्हणून हा लेखन प्रपंच. आघाद स्मरणशक्ती, अचंबित करणारी कृतिशीलता आणि शब्दातही मांडता येणार नाही अशी जिद्द असणारी ती अगदी तरतरीत आणि अगदी आत्मविश्वासपूर्वक पटपट चालत येऊन स्टेजवर खुर्चीत बसली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे फिरल्या.

कारण तिच्याकडे पाहिलं की देवानं तिला एका विशिष्ट कार्यासाठी आणि विशिष्ट पद्धतीने बनवले आहे हे नक्कीच लक्षात आलं. जिथे हट्टेकट्टे दोन हात, दोन पाय, डोळे इत्यादी असं समृद्ध शरीर दिलेलं असताना देखील आम्ही कधी त्या विधात्याचे आभार मानत नाही की त्यांची काळजी घेत नाही. कारण त्याचं मूल्य आम्हाला जाणवतच नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्य अशा सर्वांनाच जळजळीत अंजन घालण्यासारखी तिची कहाणी. जन्मताच दोन्ही हात नसलेले मुल एका दांपत्यांच्या पोटी जन्माला आले. पदरी आलेला हा गोळा पाहून आपण शब्दातही सांगू शकणार नाही की, त्या माता पित्याला किती दुःख झालं असेल! पण आईचं, बापाचं हृदय फार वेगळं असतं. त्यातूनही जन्माला आलेलं मूल ही मुलगी होती.

"दुर्गामाऊलीची प्रेरणादायी जीवनकहाणी – जिद्द, संघर्ष आणि यश"

मग तर काय समाजातील अनेक सल्लेगारांनी वेगवेगळे सल्ले दिले. अक्षरशः काही लोकांनी अशी मुलगी जिवंत कशाला ठेवायची? असाही कठोर सल्ला दिला. पण म्हणतात ना “पदरी आले पवित्र झाले” या उक्तीप्रमाणे त्या माता पित्याने मुलीला मोठं करायचं ठरवलं. हे माता पिता होते पन्हाळा तालुक्यातील आडकूर कुटुंबीय. “माऊली” हे सुंदर नाव त्यांनी आपल्या बाळाला दिलं आणि इथूनच पुढे सुरू झाली तिची जीवन कहाणी. माऊली हळूहळू मोठी होऊ लागली. पायानेच आपले हाताचेही काम करू लागली. तिच्या वडिलांनी आणि आईने दोघांनी मिळून वस्तू पकडणे, उचलणे, तोंडापर्यंत नेणे इत्यादी क्रिया पायाने आणि पायाच्या बोटाने करण्याची सवय हळूहळू तिला लावली. तसं तर हे खूप अवघड पण ही माऊली पटपट आत्मसात करत होती.

इतर मुलांसारखे तिने देखील शाळेत जावं असं तिच्या आई-वडिलांना वाटू लागलं. पण अशा मुलाला स्वतंत्र शाळेचा रस्ता प्रत्येक जण दाखवू लागले. परंतु एका प्राथमिक शाळेच्या मस्के नावाच्या शिक्षकांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. आणि पायात पेन्सिल धरून ही माऊली पटापट शिक्षणाचे धडे गिरवू लागली. एक दिवशी सूर पेटीतील स्वर तिच्या कानावर पडले. परंतु पेटीसारखे एक पवित्र वाद्य, पायाच्या साह्याने वाजवणे हे चुकीच आहे. असं तिला कुणीतरी खडसावलं आणि तिथेच तिचे मन खूप दुखावले गेले. पळत पळत येऊन ती आपल्या वडिलांना मिठी मारून खूप खूप रडली.

वडिलांनी तिच्यासाठी पेटीची व्यवस्था केली. आणि ज्या पायात पेन्सिल धरली त्याच पायाच्या बोटांनी पेटीचे सुस्वर वाजू लागले. हा हा म्हणता माऊली सुंदर पेटी वाजू लागली. प्रत्येक गोष्ट जिद्दीने शिकणे हे जणू तिच्या अंगी भिनले होते. एक दिवशी आरतीच्या तालावर सर्व भाविक दोन्ही हाताने टाळ्या वाजवत होते. हे पाहून माउलीला वाटलं आपल्याला दोन हात असते तर आपणही छान टाळ्या वाजवल्या असत्या. तिने आपली इच्छा आपल्या वडिलांना बोलून दाखवली. याचं वडिलांनाही खूप वाईट वाटलं. मुली समोर आपले दुःख व्यक्त न करता त्यांनी तिला एक मोलाचा सल्ला दिला.

“हे बघ बाळा स्वतः टाळ्या वाजवू शकले नाहीस म्हणून रडू नकोस. वाईट वाटून घेऊ नकोस. पण एक लक्षात ठेव तुला स्वतःला वाजवता आल्या नाहीत म्हणून काय झालं,तुझ्यासाठी सगळ्या जगाने टाळ्या वाजवल्या पाहिजेत असं काहीतरी करून दाखव.” हे शब्द तिने कायम लक्षात ठेवले. आणि खरंच जिद्दीने आज माऊली एमपीएससी सारख्या अवघड परीक्षेत अव्वल मार्काने उत्तीर्ण झाली.

सोलापूर सारख्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये लिपिक म्हणून काम करते आहे. एवढेच नाही तर सुंदर सुरपेटी वाजवते. खरंच ती स्वतः टाळ्या वाजवू शकली नाही पण आज उभा जग तिच्यासाठी अभिमानाने टाळ्या वाजवतो. खरच माऊली तूझा आम्हाला खूप अभिमान वाटतो. तुझ्यात लपलेल्या दुर्गेला लाख लाख सलाम….

-सौ आरती अनिल लाटणे.

इचलकरंजी

————————————————-

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

————————————————-

  • नम्र निवेदन
    “निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
    या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
Qr 1

————————————————-

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.