
श्रद्धा आणि अंधश्रद्धा : लिंबाच्या माळीमागील रहस्य जाणून घ्या
मागील आठवड्यामध्ये नेहमीप्रमाणे तुळजाभवानीच्या मंदिरात गेले असता एका महिलेने पुजाऱ्यास विचारले की,”गुरुजी ही लिंबाची माळ देवीला का बरे घातली आहे देवीच्या गळ्यात? अशी माळ याआधी तर कधी पाहिली नव्हती. तेव्हा गुरुजी म्हणाले,” कुणी काही नवस केला असेल तर घालतात ते अशी लिंबाची माळ. त्यावर ती उत्तरली दक्षिणात्य मंदिरांमध्ये देवीला लिंबाची माळ घातल्याचं बघितले आहे, ऐकलं आहे परंतु तुळजाभवानीला लिंबाची माळ प्रथमच मी बघते आहे. त्यावर ते म्हणाले, “क्रोधित झाल्यानंतर शरीर तापते. लिंबू थंडावा आणि तरतरी देणारे गुणकारी फळ असल्याने भगवतीचा क्रोध शांत व्हावा तिला थंडावा मिळावा म्हणूनही लिंबाची माळ घातली जाते असे म्हटले जाते”.
गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!
तसं बघितलं तर लिंबू हे गुणकारी असते. ते थंड आणि तरतरी देणारे फळ. शरीराला थंडावा मिळावा म्हणून लिंबाचा वापर केला जातो. शिवाय सर्वसामान्यांना ते परवडणारे असते. अध्यात्मातील फळांचा राजा म्हणूनही लिंबू ओळखले जाते. ऋषीमुनींनी विविध हेतूसाठी लिंबाचा वापर केलेला आहे कारण लिंबामध्ये पवित्र मंत्र व मूर्तीची कंपने रोखण्याची शक्ती असते. लिंबामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्याची शक्ती असते असे मानले जाते. एक चमकदार, पिवळा रंग असलेले हे फळ ऊर्जा आणि ताजेपणा देणारे आहे. उत्साह आणि चैतन्याची भावना जागृत करणारे आहे.
लिंबाची फळे आणि फांद्या विवाह समारंभात पवित्रता आणि प्रेमाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बहुतांश ठिकाणी वापरले जातात. यामागे सत्य असण्याचे वचन आणि प्रेमात निष्ठा हा त्यामागील अर्थ दडलेला आहे. जेथे नारळ उपलब्ध नसते तेथे देवतेला लिंबू अर्पण केले जाते. भोवतालच्या वाईट शक्तींना दूर करण्याकरीता विशेषतः लिंबाचा वापर केला जातो. म्हणूनच कदाचित वाहनाने लिंबू चिरडले जात असावे. देवीच्या त्रिशूळावर, नवरदेवाच्या कट्यारीवर लिंबू खोवले जाते. देवी ही शक्तीदायिनी असल्याने आणि लिंबू देखील शक्तीवर्धक आहे म्हणूनच अडकवले जात असावे.
तसेच मळमळ थांबविण्याकरीता लिंबू वापरले जाते. लिंबाचा रस घालून स्नान केल्याने केसाचे तसेच त्वचेचे आरोग्य सुधारते. अन्न खाण्याची इच्छा नसणाऱ्यांना किंवा अजीर्ण झाल्यावर देखील लिंबाचा वापर केला जातो.
काही लोककथांनुसार निंबासुर नावाचा अन्यायी, अत्याचारी दैत्य भगवतीशी युद्ध करण्यास सज्ज झाला परंतु देवीला बघताच त्याची सुबुद्धी जागृत झाली आणि तो भगवतीला शरण आला. स्वतःचा देह मानव व देवतेच्या उपयोगी पडावा असा त्याने वर मागितला. देवीने त्याचे लिंबात रूपांतर केले आणि आजही त्याचा उपयोग सेवेत करवून घेतला जात आहे.
शेवटी ज्याची त्याची श्रद्धा. परंतु ही श्रद्धा कधी अंधश्रद्धा होते हे समजत नाही आणि मग नको त्या गोष्टी रूढ होतात. परंपरा म्हणून पाळल्या जातात अन् मूळ उद्देश बाजूला राहतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक ओळखणे महत्त्वाचे ठरते. याकरीताच एखाद्या गोष्टी मागचे मूळ कारण, शास्त्र हे बुद्धीने समजून घेणे विवेकीपणाचे लक्षण असून गरजेचे ठरते.
-आरती डिंगोरे
- नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

लिंबू मिरची बांधण्याचं मुळात हेतू काय… ते नक्की जाणून घ्या…