Monday, October 27

आई कधीच नसते मरत – राजेंद्र उगले यांचा हृदयस्पर्शी काव्यसंग्रह

"आई कधीच नसते मरत कवितासंग्रह – राजेंद्र उगले, अष्टगंध प्रकाशन, मुखपृष्ठ संतोष घोंगडे"

आई कधीच नसते मरत – राजेंद्र उगले यांचा हृदयस्पर्शी काव्यसंग्रह

नाशिकचे अष्टपैलू साहित्यिक राजेंद्र उगले यांच्या आई कधीच नसते मरत या काव्यसंग्रहाचे नुकतेच नाशिक येथील शं मु औरंगाबादकर सभागृहात प्रकाशन झाले. जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी लक्ष्मण महाडिक, कवी प्रकाश होळकर , प्राचार्य दिलीप धोंडगे, अष्टगंध प्रकाशनचे संजय शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यानंतर आई कधीच नसते मरत ही साहित्य कलाकृती वाचनात आली. या कलाकृतीचे सहज निरीक्षण केले असता असे लक्षात आले की, आई या व्यक्तिमत्वाला कवी राजेंद्र उगले यांनी मुखपृष्ठावर स्थान देवून जगातील समस्त आईंचा सन्मान केला आहे, आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे असे मला वाटते.


आई कधीच नसते मरत या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर कवीने आपल्या आईचे छायाचित्र घेतले असून आईच्या भाळावर ठसठसीत कुंकु आहे, डोक्यावर पदर घेतलेला आहे, शेजारी झाडाची फांदी दिसत असून त्यावर चार पक्षी उदासवाणे बसलेले दाखवले आहे तर मुखपृष्ठाच्या तळाला आई कधीच नसते मरत चार शब्दाचे शीर्षक आणि कवीचे नावही राजेंद्र दगुबाई बापूराव उगले अशा चारच शब्दात असलेला संदर्भ आपणास पहावयास मिळतो. हे मुखपृष्ठ साकारताना मुखपृष्ठचित्रकाराचा कस लागला असेल इतके अर्थपूर्ण मुखपृष्ठ साकारले आहे. यावरून या कलाकृतीचा साहित्यिक अंगाने आपण विचार करणार आहोत.


आई कधीच नसते मरत या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर कवीने आपल्या आईचे छायाचित्र घेतले असून आईच्या भाळावर ठसठसीत कुंकु आहे, डोक्यावर पदर घेतलेला असा संदर्भ आला आहे. भारतीय संस्कृतीत कुंकु लावणे म्हणजे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. भाळावरचा कुंकु पतीच्या हयातीची साक्ष देतो, हिंदू संस्कृतीनुसार कुंकु नसेल तर विवाहित स्त्री विधवा समजली जाते. कुंकवाला अहिवाचं लेणं समजलं जातं. जर पत्नी पतीच्या आधी मरण पावली तर तिचं मरण अहिवाच समजलं जातं, ती हे लेणं स्वतःबरोबर घेऊन जाते, म्हणजेच सौभाग्याचं लेणं कुंकु घेऊन जाते. कवी राजेंद्र उगले यांच्या मातोश्री अहिवाचं लेणं लेवून होत्या त्या हे लेणं घेऊन गेल्या. आई निघून गेल्यावर विरहाने कुंकवाच्या करंड्यासह या कवितेत कवी म्हणतात की –
कष्टाच्या अशा असंख्य चांदण्या जोडत, आमच्या आयुष्यात संस्काराचे रंग भरत , आमचं अंगण लख्ख उजळवून निघून गेली ती..
तिनेच अंगणात सजवलेल्या चांदणीकडे कुंकवाच्या करंड्यासह.

डोक्यावरचा पदर हे स्त्रीच्या संस्काराचे , शिलतेचे प्रतिक मानले जाते, हल्ली जमाना बदलत चालला आहे त्यामुळे डोक्यावरचा पदर खांद्यावर आला आहे. मात्र आजच्या काळात वयाची साठी पार केलेल्या स्त्रीया आजही डोक्यावर पदर घेऊन समाजात वावरतांना आपल्याला दिसतात. या पदराला संस्काराचा स्पर्श असला तरी आईची माया, प्रेम, वात्सल्य या पदराने अधोरेखित केले आहे. ज्याच्या डोक्यावर आईचा पदर आहे त्या लेकराला जगातील कोणतेही संकटे हरवू शकत नाही इतकी शक्ती आईच्या पदरात आहे. याच पदराखाली घेऊन आईने स्तनपान करून लहानाचे मोठे केले, याच पदराने आईने आपले तोंड पुसले असेल, याच पदराने उन्हात चालतांना डोक्यावर सावली धरली असेल. आता डोक्यावर पदर धरायला आई राहिली नाही मात्र तिच्या पदराचे महत्व सांगतांना कवी पदर या कवितेत लिहितात की –
रखरखत्या तप्त उन्हात , माय जेव्हा तिचा पदर, माझ्या डोक्यावर धरायची तेव्हा.. आग ओकणाऱ्या सूर्यालाही माझ्यापर्यंत पोहोचायची भीती वाटायची….!

 आई कधीच नसते मरत या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर झाडाची फांदी दिसत असून त्यावर चार पक्षी उदासवाणे बसलेले दाखवले आहे तर मुखपृष्ठाच्या तळाला आई कधीच नसते मरत चार शब्दाचे शीर्षक आणि कवीचे नावही राजेंद्र दगुबाई बापूराव उगले अशा चारच शब्दात आपणास पहावयास मिळतात या चार अंकाचा कवी जीवनाशी काही संदर्भ जुळतो का याचा बारकाईने विचार केला तेव्हा कवीने काही गोष्टी मुखपृष्ठावर अधोरेखित केल्याचे दिसून आले. पहिली गोष्ट म्हणजे कवी राजेंद्र उगले यांनी या कलाकृतीला चार विभागात विभागले आहे पहिला भाग म्हणजे मुक्तछंद, दुसरा भाग म्हणजे अभंग, तिसरा भाग अष्टाक्षरी आणि चौथा भाग म्हणजे वृत्तबद्ध गझल अशा चार भागात विभागणी केली आहे. 

या मुखपृष्ठावर दाखवलेली झाडाची फांदी ही उगले कुटुंबाचा आधारवृक्ष आहे, ही फांदी म्हणजे सावलीविना झाड आहे.. तीर्थरूप नाना ह.भ.प. बापूराव बाळासाहेब उगले नावाचे सावली विना झाड आहे. आई ही कुटुंबाची सावली होती ही सावली आता राहिली नाही म्हणून हे झाड उघडे पडले आहे. या झाडाच्या फांदीवर चार पक्षी बसलेले दाखवले आहे हे चार पक्षी म्हणजे या कुटुंबाचे चार सदस्य… ज्या झाडाच्या अंगाखांद्यावर खेळलेले, झाडाच्या सावलीत लहानाचे मोठे झालेले आईची लेकरं संजय, राजेंद्र, विजय आणि जयश्री ही चार भावंडं या झाडाच्या फांदीवर उदासवाणे बसलेले दाखवले असावेत असा अर्थ मला यातून उमगला आहे.


आई कधीच नसते मरत या चार शब्दाच्या शीर्षकाचा परिचय कवीने आपल्या आईच्या चित्रातून दिला आहे तिच्या स्वभावाचं चित्र मुखपृष्ठावर रेखाटले आहे. आईचं चित्र या कवितेत कवी लिहितात की –
विचारतो जेव्हा कुणी मला, प्रेम, माया, ममता, आणि जिव्हाळा म्हणजे काय ? तेव्हा मी त्यांना आईचं चित्र दाखवतो …!
यातील आईच्या स्वभावाचे प्रेम, माया, ममता आणि जिव्हाळा हे चार गुण कवीने येथे चार शब्दाच्या शीर्षकातून व्यक्त केलेले आहेत असे दिसून येते.

आई कधीच नसते मरत या कविता संग्रहात एकूण चौसष्ठ कविता असून सर्व कविता केवळ आणि केवळ आईच्याच विषयीच्या असल्याने या संग्रहाला विशेष रूप आले आहे. आईच्या संस्काराची शिदोरी सोडतांना कवीने भूक आणि पुस्तक तसेच पाटी या कवितेतून शिक्षणाचे महत्व पटवून दिले आहे, झिरा कवितेतून मनाचा गढूळपणा उपसण्याचं तत्वज्ञान, जगण्याचं तत्वज्ञान कवितेतून “आपला पाय कधीच नसतो द्यायचा कुणाच्याही ताब्यात” असे साधे तत्वज्ञान आईच्या संस्कार शिदोरीतून कवीने उघडून दाखवले आहेत. प्रत्येक वाचकांनी ही कलाकृती आपल्या आईच्या आठवणींसाठी संग्रही ठेवावी अशी वाचनीय आहे.


आई कधीच नसते मरत या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा जिल्ह्यातील नामांकित साहित्यिकांच्या उपस्थितीत पार पडला, ठाण्याचे संजय शिंदे यांच्या अष्टगंध प्रकाशन संस्थेने या कलाकृतीचे प्रकाशन केले असून प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार संतोष घोंगडे यांनी अतिशय कल्पकतेने या मुखपृष्ठाला आपल्या कुंचल्याने सजवून वाचकांच्या नजरेस भरेल असे मुखपृष्ठ साकारले आहे. कवी राजेंद्र उगले यांना पुढील साहित्य कलाकृती निर्मितीस खूप खूप शुभेच्छा.

प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)

कलाकृती परिचय:
कलाकृती – आई कधीच नसते मरत
साहित्य प्रकार – कवितासंग्रह
कवी – राजेंद्र उगले, नाशिक
संपर्क क्रमांक – ९९२२९ ९४२४३
प्रकाशक : अष्टगंध प्रकाशन, ठाणे
मुखपृष्ठचित्रकार – संतोष घोंगडे


  • नम्र निवेदन
    “निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
    या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
QR

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

आई कधीच नसते मरत” या कवीमित्र राजेंद्र उगले यांच्या …

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.