
जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम पुत्राला केळापूर न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षा
वणी तालुक्यातील घटनेवर केळापूर न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
गौरव प्रकाशन वणी (प्रतिनिधी) : वणी तालुक्यातील समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेवर केळापूर येथील अतिरिक्त व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. स्वतःच्या जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या 26 वर्षीय नराधम पुत्राला गुरुवार, दि. 18 सप्टेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या कठोर शिक्षेमुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदा किती प्रभावी आहे याचा ठोस संदेश समाजात गेला आहे.
घटनेचा आढावा
जुलै 2021 मध्ये वणी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. 19 जुलै रोजी पीडिता वणी येथे मुलीकडे गेली होती. याच कारणावरून तिच्या मुलाने दोन-तीन दिवस सतत मारहाण केली. अखेर 23 जुलैच्या रात्री दारूच्या नशेत आरोपीने आईवर लोखंडी पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर मलम लावतो या बहाण्याने तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. एवढेच नव्हे तर मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत पहाटेपर्यंत बलात्कार सुरू ठेवला. या धक्कादायक प्रसंगानंतर आईने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. सहा दिवसांच्या उपचारानंतर शुद्धीवर आल्यानंतर तिने धैर्य एकवटून पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपीवर भा.दं.वि. कलम 376(2)(F), 376(2), 323, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अरुण नाकतोडे यांनी महत्त्वाचे पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
न्यायालयीन सुनावणी
सदर खटल्यात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. रमेश डी. मोरे यांनी पिडीतेची बाजू प्रभावीपणे मांडली, तर आरोपीची बाजू अॅड. सिद्धार्थ लोढा यांनी हाताळली. सुनावणीदरम्यान एकूण आठ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. पैरवी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष मडावी यांनी या खटल्यात विशेष योगदान दिले.
न्यायालयाचा निकाल
18 सप्टेंबर 2025 रोजी सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी निर्णय देताना स्पष्ट नमूद केले की, आरोपीचे कृत्य हे आई-पुत्राच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारे असून संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद आहे. त्यामुळे आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
समाजावर परिणाम
स्वतःच्या आईवर बलात्कारासारखा अमानुष अत्याचार हा समाजाच्या मान-सन्मानाला धक्का देणारा होता. या कठोर निर्णयामुळे पीडितेला न्याय मिळाला असून अशा विकृत प्रवृत्तीला चाप बसणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी हा निकाल महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याचे नागरिकांचे मत आहे.
- नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

आईवर बलात्कार करणाऱ्या मुलाला न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली