मानलं माणसा तुला.!
एअर इंडियाचं एक फ्लाईट अहमदाबाद वरून लंडनसाठी २४२ प्रवासी घेऊन हवेत झेपावलं. खूप मोठ्या उम्मेदी घेऊन २४२ प्रवासी लंडनसाठी निघाले आणि काही सेकंदामध्ये ते कोसळले. आपला भारत देशच काय संपूर्ण विश्वच ह्या उडानाने स्तब्ध झाले. आता ह्या घटनेची मीमांसा होते आहे. तर्क वितर्क होत आहेत, सांगितले जात आहे. जी काही घटना घडली ती खूपच वाईट घडली. फ्लाईटचे नाव होत ड्रीमलाइनर. आपण ह्याला आपल्या स्वप्नांची पूर्ती करणारा म्हणू. ‘उंच झेप घेरे पाखरा’, पण हे पाखरू काही उडालच नाही. कोण काय, काय जाणे होत्याच नव्हतं झालं.
संपूर्ण भारतातच काय संपूर्ण विश्वात सर्वांच्या पोटात गोळा आला. हवाई वाहतूक हादरली. हल्ली असा दावा केला जातो की हवाई प्रवास हा सर्वात सुरक्षित आणि जलद प्रवास आहे. ह्या धावपळीच्या युगात सर्वानाच वेळ वाचवावयाचा आहे आणि कोणाला वेळच नाही आहे. माणूस जणू धावतो आहे आणि धावतच सुटला आहे. तो आता ट्रेन ऐवजी हवाई प्रवासाला अधिक पसंती देतो आहे. तरुणाई तर विमान प्रवासालाच अधिक पसंती देतो आहे. त्यांना ट्रेन आणि बस मध्ये प्रवास करायला एव्हढा वेळ नाही. अगदी त्यांना लगेच सर्व काही झटपट लागतं.
ह्या घटनेनंतर मला बँकेच्या मीटिंगला दिनांक १५ जून २०२५ ला चेन्नईला जायचे होते. माझी नेहमी पहेली पसंती ही भारतीय रेल्वे असते. मला रेल्वे खूपच आवडते. कारण काय तर रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित असतो. त्यात मस्त वाचन, लिखाण होत. एक पुस्तक घेतलं की बस पोहचू दे ती कितीही वेळा नंतर. मला कुठेही जायचे असेल तर मी रेल्वेलाच पसंती देतो. माझ्या समोर जेव्हा दोन पर्याय असतात. एक म्हणजे दोन तासांचा विमानाचा प्रवास की २२ तासांचा रेल्वेचा प्रवास. मी २२ तासांच्या प्रवासाला अधिक पसंती देतो. मला माझा एजंट नेहमी पटवून देतो की विमान प्रवास हा किती फायदेशीर आहे. तो मला १५-२० मिनिट समजावून सांगतो आणि शेवटी मी त्याला २२ तासाच्या रेल्वे प्रवासाचे तिकीट काढायला सांगतो. तो नेहमी मला म्हणतो सर,’ सारी दुनिया उडाण खटोला पसंद करती है और आप रेल,’ मुझे समझ में नही आता | माझा मुलगा सुद्धा विमान प्रवास कसा वेळ वाचवतो व भाड्यात सुद्धा काही जास्त फरक नसतो असे सांगत असतो. पण मी मात्र रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतो. मला विमान प्रवासाचे कधीच आकर्षण नव्हते आणि नाही सुद्धा.
पण अंदर की बात ही आहे मला विमान प्रवासाची फार भीती वाटते. जेव्हा ते टेक ऑफ करत न, तेव्हा माझ्या पोटात गोळा येतो. जेव्हा ते हवेत थोड्या वेळाने स्थिर स्थावर होत तेव्हा माझ्या जिवात जीव येतो. परत थोड्या वेळाने पायलट घोषणा करतो “हम खराब मौसम से गुजर रहे है और कुर्सी की पेटी बांध ले, अगला संकेत होणे तक”| मी लगेच घाबरतो. अरे देवा, हे काय आता ? आणि विमान हलायला लागत. म्हणजे ते काय टर्ब्युलन्स त्याला म्हणतात ते. प्रवासी मात्र इकडून तिकडे बिनधास्त फिरत असतात. त्यांना अजिबात घाबरायला होत नाही. दोन तासांचा प्रवास हे आपले हवसे नवसे प्रवासी लगेच विमान टेक ऑफ झाले की उठले आपले वॉश रूमला जाण्यासाठी. अरे बसना एका जागेवर मुकाट्याने. विमानतळावर सर्व सुविधा असतात ना. काय तुमच्या त्या नैसर्गिक कॉल्स आहेत ते पूर्ण कराना विमानतळावर. पण नाही उठले लगेच. लगेच बटन दाबणार हवाई सुन्दरीला बोलावणार. तिला काही तरी मागणार, सूचना करणार. अरे बसन दोन तास मुकाट्याने.
नेमके मला चेन्नईचे १५ जून २०२५ चे रेल्वेचे तिकीट मिळाले नाही. इच्छा नसतांना विमानाचे तिकीट काढावे लागले आणि तिकीट मिळून मिळून कुठले मिळाले तर ते पण एअर इंडियाचे. परत मनात भीती.
ह्या अपघातात फक्त एकच जण वाचला. काही दिवसांपूर्वी काश्मीर मध्ये पर्यटकांवर पहलगाम मध्ये अतिरेक्यांचा हल्ला झाला, त्यात पर्यटक मृत्युमुखी पडले. अगदी काही दिवसांपूर्वीची मुबईतील घटना रेल्वेतून प्रवास करताना काही प्रवासी पडले व त्यांचा नाहक जीव गेला.
ह्या भयंकर विमान अपघातानंतर दहशतवादी हल्ल्यानंतर, लोकल रेल्वे अपघातानंतर आपण सर्वजण सुन्न झालो. वाटले आता कोणी विमान प्रवास करणार नाही, कोणी काश्मीरला पर्यटनाला जाणार नाही व कोणी लोकल रेल्वेने प्रवास करणार नाही. परंतु तसे झाले नाही. माणूस हा विमानाने प्रवास करत होता. जी गर्दी अगोदर विमान प्रवासाला होती तिच गर्दी आत्ता सुद्धा आहे. तिच गर्दी, तोच उत्साह काश्मीरच्या पर्यटनासाठी आहे. मुंबईच्या लोकलची गर्दी नेहमी प्रमाणे आहेच.
थोडक्यात काय तर एव्हढ्या मोठ्या आघातानंतर सुद्धा माणूस हा थांबला नाही, घाबरला नाही. तो परत सकारात्मक विचाराने त्याने उभारी घेतली. आपल्या हिमतीच्या बळावर परत एकदा उभा राहिला. मी जेव्हा विमानाने प्रवास करत होतो तेव्हा निरीक्षण करत होतो तर तोच उत्साह पायलटमध्ये होता, हवाई सुंदरीत होता व प्रवाशांमध्ये सुद्धा होता. जणू काही काहीच झाले नाही, सर्व अलबेल आहे.
ह्या घटनेनंतर अनेक पायलट, हवाई सुंदरी आपल्या नियमित कर्तव्यवार तत्पर हजर सुद्धा होते.माणसा मानलं तुला, तुझ्या हिमतीला, तुझ्या आत्मविश्वासाला. तू रडत बसला नाही तर परत एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे तू परत उभारी घेतलीस.
मला कमाल वाटते ती मानवाची की एव्हढे हादसे होऊन सुद्धा माणूस घाबरत बसला नाही. टायटॅनिक जहाज एव्हढा मोठा अपघात होऊन सुद्धा माणूस त्यावर अजूनही सिनेमा करतो, त्यावर अजूनही संशोधन जारीच आहे. टायटॅनिक घटनेला बघून घाबरायला पाहिजे तर ह्या भयानक घटनेवर तो प्रेमकथा तयार करतो. एव्हढेच नाही तर टायटॅनिक प्रेमकथा ही जगप्रसिद्ध झाली आहे. त्याला अजूनही कुतूहलाने सर्व बघतात आहे, पसंत करतात आहे. माणूस बघा कसा आहे? टायटॅनिक मध्ये गोंधळ झाल्यावर प्रवासी इतरत्र पळत असतात, मात्र संगीतकार न घाबरता आपल्या संगीताचा, वाद्यांचा आनंद घेत असतात. तर दुसऱ्या बाजूला ह्या प्रेमवीरांचा रोमान्स चालूच असतो. मला वाटत टायटॅनिक हा सिनेमा अपघातासाठी नाही तर ह्या प्रेमकथेसाठीच माणूस बघत असतो. म्हणजे बघा माणसाचा दृष्टिकोन कसा आहे, तो अपघाताला घाबरत नाही त्या घटनेकडे बघत नाही तर त्या प्रेमकथेतल्या रोमान्सला बघतो आहे.
माणसाची कुतूहलता किती आहे बघा. करोडो रुपये देऊन माणूस खर्च करून पाणबुडीने खोल समुद्रात जातो. तिथे त्या पाणबुडीचा अपघात होतो. श्रीमंतातील श्रीमंत ह्यात आपले प्राण गमावतात पण ह्याची काही जिज्ञासा कमी होत नाही, तो परत उभारी घेऊन ते जाणण्यासाठी, आनंद घेण्यासाठी तिथे जातोच.
आपण माणसाच्या अंतराळ प्रवासाकडे बघितले तर काय दिसते? किती महाभयंकर हे काम आहे. किती अपघात, अपयश आले आहेत परंतु माणसाचे अंतराळात जाणे येणे हे सुरु आहेच. सुनिता विल्यम हिचा अंतराळातील प्रवास किती आव्हानात्मक होता. कल्पना चावलाचा प्रवास हा किती थरारक होता. हे सर्व असले तरी माणसाच्या अंतराळाच्या वाऱ्या, संशोधन हे चालूच आहे तो थांबला नाही. त्याला हे सर्व जीवावर बेतून जाणून घावयाचे आहे.
हे सर्व काही माणूस माणसाच्या भल्यासाठी, सुखासाठी व येणाऱ्या पिढीसाठीच करीत आहे. येणाऱ्या पिढीसाठी त्याचा चांगले देण्याचा भाव नक्कीच ह्यात आहे.
म्हणून हे सर्व बघून एव्हढेच म्हणावेसे वाटते की “मानलं माणसा तुला !”

अरविंद सं. मोरे,
नवीन पनवेल (पूर्व) मो. ९४२३१२५२५१