परभणीच्या सकाळी एक खास ठिकाण असायचं संजीवनी पोहा सेंटर. कामावर धावणाऱ्या माणसांपासून ते शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांसाठी इथले पोहे म्हणजे सकाळची ऊर्जा होती. या सेंटरचा आत्मा म्हणजे परमेश्वर कदम, सर्वांच्याच आपुलकीने ‘कदम मामा’ म्हणून ओळखले जाणारे.
दोन किलो पोह्यांनी सुरू झालेला त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला. कामगार, विद्यार्थी, छोटे दुकानदार, मोठे व्यापारी, डॉक्टर, वकील, सरकारी अधिकारी सर्व थरांतले लोक संजीवनी सेंटरला भेट द्यायचे. केवळ पोहेच नाही, तर खिचडी, मुगवडा, भजी, मिरची भजी आणि त्यांच्या हातच्या चहाची चव लोकांच्या जिभेवर चढली होती.
कदम मामांचं वैशिष्ट्य वेगळं होतं. गरजूंना पोहे देताना त्यांनी कधी पैसे मागितले नाहीत. कोण उपाशी आला तर मामा स्वतःहून त्याच्या प्लेटमध्ये भरभरून वाढायचे. त्यांच्या स्वभावात असलेली माया आणि आपुलकी माणसांना जास्त भावायची.
व्यवसाय वाढला, चार बंगल्यांची मालमत्ता झाली, गाड्या आल्या, शेती वाढली, पण कदम मामा तिथेच राहिले. त्यांच्या हातातली झारी शेवटच्या श्वासापर्यंत पोह्यांवर फिरत राहिली. मोठेपणाचा गंध त्यांच्या स्वभावाला कधी लागू दिला नाही.
या प्रवासात सुरुवातीच्या काळात स्व. शेषराव भरोसे यांनी त्यांना मदतीचा हात दिला. मात्र त्यानंतर मामांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर सगळं उभं केलं. माणसांशी जुळलेला त्यांचा ऋणानुबंध व्यवसायाच्या आकड्यांपेक्षा कितीतरी मोठा होता. अशी प्रेरणादायी कहाणी घडवणाऱ्या कदम मामांनी अचानक आत्महत्या केली, ही बातमी शहरभर वाऱ्यासारखी पसरली आणि प्रत्येकाला हादरवून गेली.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
काहींचं म्हणणं आहे की दीर्घ आजारपणाने त्रासून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. काहींना वाटतं, एकटेपणा आणि मानसिक थकवा कारणीभूत ठरले. कारण काहीही असो, ज्यांनी शेकडो उपाशी पोटांना प्रेमाने भरलं, त्यांच्या मनातलं दुःख आपण ओळखू शकलो नाही, ही मोठी खंत आहे.
आजही संजीवनी सेंटर सुरू आहे. पोह्यांचा वास तसाच आहे, चहा तसाच आहे, पण त्या झारीचा प्रेमळ हात नाही. त्या मायेच्या नजरेचा उष्णपणा नाही. फक्त त्यांच्या आठवणींनी परभणीच्या गल्ल्यांत गंध दरवळतोय. परमेश्वर कदम मामा यांनी फक्त पोहे वाढले नाहीत, तर माणुसकीही वाढवली.
त्यांच्या हातून वाढलेल्या प्रेमाचा स्वाद कधीच विसरता येणार नाही. आजही त्या संजीवनी सेंटरच्या गेटवर उभं राहिलं की मनात एकच शब्द येतो
“मामा, तुम्ही होतात म्हणून सकाळ गोड होती… आज सकाळही पोकळ वाटतेय.”
मामा भावपुर्ण श्रद्धांजली.!
– निखील सुक्रे ( मुक्त पत्रकार )