ग्राम विकासाचा मंत्र म्हणजे ग्रामजयंती

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

ग्राम विकासाचा मंत्र म्हणजे ग्रामजयंती

गावा गावासि जागवा | भेदभाव हा समूळ मिटवा || उजळा ग्रामोन्नतीचा दिवा | तुकड्या म्हणे ||

आज 30 एप्रिल म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची जयंती. माझी जयंती ही ग्राम जयंती म्हणून साजरी करा असा आग्रह धरणारे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्म यावली मधील एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी ठाकूर तर आईचे नाव मंजुळा देवी होते. वडील शिवणकाम करून तर आई दळणकांडन करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. महाराजांचे जन्म नाव माणिक होते. बाल माणिक इतर मुलांप्रमाणे खेळ न खेळता एकतारी व खंजिरी भजने म्हणून ईश्वर दर्शनाची तळमळ त्यांच्या मनामध्ये दिसून येत होती. प्राथमिक शिक्षण कसेबसे पूर्ण केल्यानंतर महाराज शाळेऐवजी शिवमंदिरात, नदीत किंवा शेतात ध्यान पूजन करण्यासाठी वारंवार धाव घेत होते. आणि इथूनच राष्ट्रसंताच्या विचार प्रवर्तक कार्याला सुरुवात झाली.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा


आज आपण जी राष्ट्रसंताची जयंती साजरी करतो ती राष्ट्रीय एकात्मतेसाठी अतिशय महत्त्वाची आहे. ग्रामजयंती म्हणजे नुसता गावाचा विकास नसून देशाचा विकास कसा करावा यासाठी एक प्रेरणा ठरते. गावाविषयी व त्या गावातील सर्व जाती-धर्माच्या, पंथ – पक्षाच्या,नागरिकांच्या अंत:करणात एकात्मभाव असला पाहिजे, आम्ही सारे एक आहोत अशी विशाल भावना निर्माण होणे गरजेचे आहे व त्यानुसार आचरण करणे म्हणजेच ग्रामजयंती होय. आम्ही सारे भारतीय भाऊ भाऊ आहोत.एकाच भारत मातेची लेकरे आहोत. या दृष्टीने परस्परात संबंध प्रस्थापित होणे हाच ग्राम जयंतीचा खरा भावार्थ आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी, गावात सर्व गुण्यागोविंदाने नांदावे या आशयाची अनेक भजने लिहिली आहेत. त्यात “या भारतात बंधुभाव नित्य वसु दे | दे वरची असा दे” हे भजन सुपरिचित असून शालेय अभ्यासक्रमात सुद्धा याचा समावेश झाला आहे. राष्ट्राचे आधारस्तंभ असलेल्या युवकांवर अशा ग्रामविकासाच्या भजनांचा सुसंस्कार होणे. अशी नवी पिढी गावाच्या विकासासाठी तयार होऊन ‘हे राष्ट्र आमचे सर्वांचे आहे ‘ ”आमच्या राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी संस्कृतीची जोपासना करण्यासाठी प्रसंगी प्राणही पणास लावू ” अशा आशयाची अनेक स्फूर्ती गीते राष्ट्रसंतांनी मराठी व हिंदी भाषेतून लिहिले आहे. त्या दृष्टीने त्यांचे देश विकासाविषयीचे महान कार्य म्हणावे लागेल.
राष्ट्रसंतांनी परमेश्वराला दुसरा कोणताही वर मागितला नाही. माझा देश वैभवशाली सामर्थ्यवान व्हावा. माझ्या संपूर्ण देशामध्ये सुख व शांती नांदावी. भारत देशाची संपूर्ण जगामध्ये दहशत असावी असा वर मागितला नाही,तर राष्ट्रसंताच्या भजनातून राष्ट्रीय एकात्मतेचा साधा भोळा भाव प्रकट झाला आहे. राष्ट्रसंत म्हणतात

नांदोत सुखे गरीब अमिर एकमतांनी |
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी |
स्वातंत्र्य सुखा या सकळा माझी वसु दे |
दे वरचि असा दे ||

ज्याप्रमाणे वृक्षाची पाने,फुले,फळे एक घटक असतात त्याप्रमाणे आम्ही सर्वजण ‘भारत’ या वृक्षाचे अविभाज्य घटक आहोत. आमच्यात कोणीही श्रेष्ठ नाही,कोणीही कनिष्ठ नाही, देशात गरीब असो श्रीमंत असो सर्वजण गुण्यागोविंदाने नांदले पाहिजेत. हा देश धर्मनिरपेक्ष आहे. आणि ‘मानवता’ हाच सर्वांचा एकच धर्म आहे अशी भावना निर्माण झाली पाहिजे. भारतातील सर्व जाती धर्माच्या, पंथ पक्षाच्या लोकांना राष्ट्रीय एकात्मतेचे आव्हान करताना महाराज म्हणतात,

राष्ट्र जागवा,राष्ट्र जागवा तरुणांनो आमुच्या|
वीर वृत्तीचा दिवा उजळवा तरुणांनो आमुच्या |

राष्ट्रसंतांची देशावर देवासारखी भक्ती होती. भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु हिंदू मुस्लिम दंगली संपल्या नाही या जातीयतेने ते व्यथीत झाले होते. त्यांच्या व्यथित अंत:करणातून त्यावेळेस स्फूर्तीगीत बाहेर पडले.

आपस मे लढो मत | अरे हिंदू मुसलमानो|
लढणे से रहा कोन |दोनो का बुरा जानो ||

भारत-पाक युद्धाच्या वेळी भारतात अंदाधुंदी माजली होती. सगळीकडे सैरावैरा दुष्ट विचार धावत होते. त्यावेळी आपल्या भाषणांमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात

हे यार छोडो पक्षबाजी|देशवासी एक हो |
शत्रू खडा है द्वार पर |अपने लिये तो नेकहो|
वह तो गणीमी चालसे| है मारनेको आ रहा|
तुम होश मे हो या नही |फिर क्यू तमाशा हो रहा ||

आपल्या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये गावाचे बहुमूल्य योगदान असते. गावातील सर्व धर्मीयांच्या बळावर आपल्या राष्ट्राची प्रगती अवलंबून असते. म्हणून जर राष्ट्राला जगवायचे असेल,जोपासायचे असेल तर गावाची सर्वतोपरी भरभराट करण्याची जबाबदारी गावातील सर्व नागरिकांची असते. कारण गाव जगले तर देश जगेल आणि देश जगला तर धर्म जगेल आणि धर्म जगला तरच राष्ट्र जगेन अशी भावना त्यांनी आपल्या भजनातून सर्वांसमोर मांडली. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहून 41 अध्यायामध्ये संपूर्ण गावाच्या विकासापासून तर देशाच्या विकासापर्यंत लेखाजोखा मांडला. देवदर्शन, ग्रामरक्षण,ग्राम आरोग्य, श्रमसंपत्ती, जीवन शिक्षण, महिलोन्नती, वैवाहिक जीवन, देव देवळे,मूर्ती उपासना,दलित सेवा,संत स्वरूप ग्राम कुटुंब,ग्रंथ महिमा अशा अनेक अध्यायांमधून त्यांनी मानवाच्या व्यक्तिगत विकासाच्या गावाच्या विकासाच्या व राष्ट्राच्या विकासाच्या पायऱ्या सुस्पष्ट भाषेमध्ये समाजासमोर मांडल्या. शिक्षणाशिवाय पर्याय नाही आपल्या मुला मुलींना चांगले शिक्षण द्यावे यासाठी प्रत्येक आई-वडिलांनी प्रयत्न करावे म्हणून महाराज आपल्या अध्याय क्रमांक 19 जीवन शिक्षण मध्ये म्हणतात

पाठशाळा असावी सुंदर |
जिथे मुली मुले होती साक्षर |
काम करावयासि तत्पर |
शिकती जेथे प्रत्यक्ष |

राष्ट्रसंतांनी गावाच्या विकासामध्ये महिलांचे सुद्धा अमूल्य असे योगदान आहे. हे आपल्या भजनातून स्पष्ट केले. अनेक ऐतिहासिक स्त्रियांचा दाखला देत राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये महिलांना सर्वोच्च स्थान दिले आहे. अध्याय क्रमांक 20 महिलोन्नती मध्ये राष्ट्रसंत म्हणतात,

जिच्या हाती पाळण्याची दोरी |
तीच जगाते उद्धारी |
ऐसी वर्णिली मातेची थोरी |
शेकडो गुरुहूनिही||

अशा प्रकारे ग्रामगीता हा आजच्या काळातील अनमोल असा ग्रंथ आहे.माणूस केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ जीवन जगण्यासाठी सहाय्यभूत ठरला आहे. आजच्या या ग्राम जयंतीच्या दिवशी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना

” देशात समता नांदवा| ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा ||”

या उपदेशाचा अंगीकार करून विनम्र अभिवादन!!!!


अविनाश अशोक गंजीवाले
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजगाव
पंचायत समिती तिवसा

Leave a comment