Tuesday, October 28

धम्मचक्र प्रवर्तन व आम्ही !

AVvXsEhc80x3xa4Z459T lcAL85TEw ntLb2XF1aEkpVChu2jKWjhGBqByqBKyzkR R7rv0zq0wmCZeF21Uh2VAW5SgPmp2txf2FXbX 3RvgD wHTvgqHnPpfQISuVbouUqDliQwSdbdMt8SKKvfkhJdESwcH3dvnOZIJzAHM1YU4owiN8DKcZzAZ4O8XSSD=s320

    तथागत भगवान बुद्धाद्वारे दिलेले प्रथम प्रवचन हे पाली साहित्यामध्ये ‘धम्मचक्कपवत्तन सुत्त’ या नावाने आम्ही पाहतो. हा उपदेश भगवान बुद्धाने प्रथमत: पंचवर्गीय भिक्खुंना दिला. ‘धम्म’ शब्दाचा अर्थ सत्य, सदाचरण, शिलाचरण असा होतो. मुळात मानव शांतताप्रिय आहे हे बुद्ध जाणून होते. त्यांनी पंचवर्गीय भिंक्खूना प्रथमत: वार्तालाभ करुन काही प्रश्न विचारले की, शुद्ध आचरण करणे, मानवास मानवता प्राप्त करण्यास आवश्यक नाही का? शुद्ध व्यवहाराकरिता शुद्धचित्त होणे गरजेचे नाही का? त्याकरिता पंचशिल हे काया, वाचा, मनाने पाळणे आवश्यक नाही का? यावर पंचवर्गीय भिक्खूंचे उत्तर होकारार्थी आल्यावर त्यांनी त्यांना विशुद्धी मार्गावर प्रवचन दिले. विशुद्धी मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक होय. जो शील, समाधी, प्रज्ञामध्ये विभक्त आहे. ‘शील’ या संकल्पनेला बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये उच्च व महत्वाचे स्थान दिले आहे. व्यक्तीचे व्यक्तीमत्व घडविण्याच्या क्रियेतील ‘शील’ हे पाया होय. (बुद्धांच्या धम्मामध्ये खालील संकल्पना आल्या आहेत जसे, शील संकल्पना, समाधी संकल्पना, प्रज्ञा संकल्पना, निर्वाण संकल्पना) बौद्धधम्मातील निर्वाण संकल्पना हे व्यक्तीच्या विशुद्ध जीवनातील शिखर होय.

    शील हे व्यक्तीचे संरक्षण कवच असे बुद्ध मानीत असत. शील पालन न करणा:या व्यक्तीचे व्यक्तीत्व हे मातीच्या मंडक्याप्रमाणे क्षणभंगूर असते. आम्हाला जर भवसागर पार करावयाचा असेल तर धम्मरूपी नावेतून आम्हास प्रवास करावा लागेल. सदाचरणी होण्याकरिता पंचशील हे परिमाण आम्हाला स्वत:ला लावावे लागेल तरच आम्हाला सुरक्षितता लाभेल. त्याकरिता आम्हास कुणास दंडीत न करणे, चोरी न करणे, कुणाशी खोटे न बोलने, व्यभिचार न करणे, मादक पदार्थांचा त्याग करणे या गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतील. विशुद्धी मार्गाचे पाईक होणे आवश्यक आहे. आपल्या श्रावक संघास भगवान बुद्ध खडा सवाल करित तुम्हास कुणी दंडीत केल्यास आवडत नाही तर ते इतरांना आवडेल का? भिक्खूंना भगवान बुद्धाने विनयपिटकाद्वारे (अर्थांत भिक्खूंची आचारसंहिता) घालून दिलेले नियम जीवनदर्शक ठरलेली दिसतात. बुद्धांचा श्रावक संघ त्या काळात आणि आजदेखील वंदन, सन्मान, आदर करण्यात पात्र ठरलेला आहे. याचे कारण तो विशुद्धी मार्गावर आरूढ आहे. आम्ही देखिल आम्हाला दिलेले नियम, शील पालन केल्यास उच्च प्रतिचे जीवन घडविण्यास समर्थ ठरू. भगवान बुद्धांनी दिलेला अत्त दिप भवो! (स्वावलंबी व्हा) अर्थात स्व प्रयत्नाने स्वत:चा उद्धार करू शकू. त्याकरिता भगवान बुद्धाने सावधानता व जागृततेने जीवन व्यापन करण्यास सांगितले आहे.

    सम्यक समाधी अर्थात कुशल चित्ताची एकाग्रता होय. याकरिता भगवान बुद्धाद्वारा उपदेशित ‘महासतीपठ्ठानसुत्त’ सविस्तर वाचून समजून घेणे आवश्यक आहे. यामध्ये व्यक्ती पृथ्वीसमान आहे असे बुद्ध सांगतात. आप, तेज, वायू, पृथ्वी या चार घटकांपासून पृथ्वी विकसित झाली असून मानवसुद्धा याच चार घटकांपासून बनलेला आहे. मानवामध्ये विशेषत: ही आहे की, त्याला ‘मन’ आहे. ‘मन’ मनन करणारे आहे चिंतन करणारे आहे. बरे वाईटाचे व्यवस्थापन करणारी बुद्धी मानसामध्ये आहे. मग माणसाचा एक दुस:याशी व्यवहार विचारपूर्वक असावा. मानवातील व्यवहारामध्ये पृथ्वीसारखी गंभीरता, जलासारखी निर्मळता असू नये का? या सा:या गोष्टी भगवान बुद्धांनी आपल्या धम्मप्रवचनामध्ये अनेक उदाहरणाशी समजावून सांगितल्या आहे. ते विवेकशील बुद्धीने आम्ही समजून घेतले पाहीजे. या सर्व बाबी उकल होण्याकरिता शीलाचारी होणे, कुशल चित्ताची एकाग्रता साधणे आवश्यक आहे. त्याकरिता आम्हा सर्वांना पाली साहित्याचे अभ्यासक बनावे लागेल. तेव्हाच आमच्यामधील राग, द्वेष, मत्सर दूर होवून त्या ठीकाणी मैत्री, करूणा, मुदीता नांदेल. आम्ही निर्मळ चित्त बनू व भगवान बुद्धांना अभिप्रेत असलेला मानवाचं मानवाशी या बंधुत्वाचे नाते जोपासू शकू. सोबतच डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत शिलाचरणी, ज्ञानपिपासू व्यक्ती निपजून सुजान समाज घडवू हीच खरी डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत धम्मदिक्षेची फलश्रृती असेल. तेव्हाच आम्ही या महामानवांना वंदन करण्यास व एकमेकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देण्यास पात्र ठरू.

    प्रा. डॉ. रेखा पर्वतकर (वानखडे)
    पाली विभागप्रमुख,
    तक्षशिला महाविद्यालय,अमरावती.
    मो. ९७६७४९७९६०


—–

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply