उन्हाळ्याचे दिवस.धगधगत्या अन कडक उन्हामुळे लोक दुपारच्या वेळेत थंड गारव्यात विसावा घेत होते.अशातच मी जयंत च्या घरी गेलो. जयंत घरी एकटाच विचारमग्न होता.मी तिथे आलो आहे याबाबतीत त्याला पुसटशीही कल्पना आली नाही.तो अगदी विचार प्रवाहात वाहून गेला होता. कडक उन्हाची वेळ असल्याने नुकताच तो शेतातून घरी आला होता.हातपाय न धुता तो ओसरीमध्ये एकटाच बसला होता.त्यांच्या अंगावरून भराभर घाम वाहत होता. तरीही तो विचारमग्नच.अचानक मी त्याची शांतता भंग केली आणि सहज प्रश्न केला की, काय साहेब कशाचा विचार करता?अगदी बेहोश माणूस जसा अचानक शुद्धीवर येतो तसाच जयंत शुद्धीवर आला व स्वतः ला सावरत केविलवाण्या स्वरात म्हणाला,कशाचा विचार करतो,काही नाही केलेल्या कर्माची फळे भोगतोय. त्याच्या अशा बोलण्याने मी अवाक झालो.कर्माची फळे, तुमच्या सारखा खुशाल चेंडू माणूस आणि त्यातही आर्थिक संपन्न तसेच खूप सुखी,समाधानी-आनंदी असलेल्या जयंत च्या बोलण्याने अवाक झालो.मात्र त्यांनी त्यांच्या भूतकाळातील अंगाला शहारे आणणारी कर्माची(कृत्याची) अर्थात कर्मकहाणी त्यांनी माझ्या समोर अगदी शांतपणे पण पश्चातापाच्या स्वरात सांगितली.
जयंतच्या घरचीआर्थिक परिस्थिती तशी जेमतेमच. आई-वडील समवेत पाच भाऊ आणि चार बहिणी असा त्यांचा परिवार. अशा अवस्थेत कुटुंबाचा सांभाळ करताना कुटुंब प्रमुखाची चांगलीच कसरत होत होती. अशातच गावातील एका गर्भश्रीमंत व्यक्तीने जयंतला पुत्र मानून पालनपोषणाची व भविष्याची जबाबदारी स्वीकारली. जयंतचे भावी जीवन सुख समृद्धीत जावे अशी गर्भश्रीमंत अर्थात त्या मालकाची तळमळ होती.मालकाने जयंतला आश्रय देऊन नजीकच्या शहरातील चांगल्या शाळेत दाखल केले.मालकाची तळमळ बघून मालकाप्रती त्याच्या डोळ्यात आनंदाअश्रू तरळले,सोबतच मालक सांगेल ते काम करू लागला.जयंतने अल्पावधीतच दिलखुलास स्वभाव व मेहनतीने मालकाचा विश्वास संपादन केला.मालकाने सुद्धा त्यांच्या कडील गावातील अधिकांश व्यवहार जयंत कडे सोपविला.साहजिकच गरीबी व हलाखीत जीवन जगणारा जयंत क्षणात श्रीमंत झाला. आता पूर्वीपेक्षा त्यांच्या कडे अधिक पैसा खेळू लागला.परिणामतः कालांतराने त्याला वाईट सवयीची लत लागली. जयंत अगदी बालवयातच व्यसनाधीन झाला. जयंत मार्ग चुकत असल्याचे मालकाला किंचितही कल्पना नव्हती. मात्र कालांतराने मालकाला जाणिव होऊ लागली. जयंत आपल्या मर्जीप्रमाणे वागत असला तरी मालक व इतर परिवारातील सदस्य भविष्यात तो सुधारेल या आशेने कुटुंबातील मुलाप्रमाणे त्यांच्याकडे डोळेझाक करून त्यांच्या चुका पोटातच लपवित असे.पण जयंत मध्ये परिवर्तन न होता तो अधिकच बिघडत गेला. परिणामता त्याला मालकाने शहरातून गावाकडे पाठविले आणि शेतीवर लक्ष ठेवणे व शेती करण्ययाचे काम सोपविले.जयंत शहरापेक्षा खेड्यात (गावात) चांगला रमून उत्तम रित्या शेती करू लागला. मालकाने सोपविलेली/सांगितलेली जबाबदारी सुद्धा इमानेइतबारे पार पाडण्यास कसलीही कसर सोडत नव्हता. उत्तरोत्तर वाढत्या उत्पादनामुळे आणि मालक काटेकोरपणे हिशोब घेत नसल्यामुळे जयंतच्या हातात पुन्हा मोठ्या प्रमाणात पैसा खेळू लागला.मालकाचा विश्वास जोपासत असतानाच कालांतराने पैशाची पाण्यासारखी उधळपट्टी करू लागला.गावातील लोकांना सुद्धा त्यांच्या या अशा वागण्याचा हेवा वाटणे सहाजिकच होते.कारण ज्याला पूर्वी पोटभर अन्न मिळत नव्हते,तो आता पैशात लोळत होता.मालकाला मात्र जयंत करीत असलेल्या अपव्ययची आणि अपहाराची कल्पना असताना सुद्धा पोटच्या मुलाप्रमाणे सर्व काही सहन करीत होते.आज नाही तर उद्या सुधारेलच या अपेक्षेने जयंत सोबत वागत होते.
स्वतःच्या मुलांपेक्षा अधिक व भयानक(लाजिरवाणी) अश्या चूका जयंतच्या हातून घडत असतानाही मालकाने स्वतः च्या मुलाप्रमाणे वागविले. निराश न होता मालकाने अखेरचा उपाय म्हणून जयंतचे लग्न करून देण्याचे ठरविले. मालक आणि जयंत हे दोघेही भिन्न जातीचे असले तरी त्यांनी कधीही जातीचे अंतर दाखविले नाही.याउलट कितीतरी चुका करूनही जयंतची नेहमी समतूतच काढली.तसेच रिती रिवाजाप्रमाणे लग्न करण्याच्या दृष्टीने मुलगी शोधण्याची जबाबदारी मालकाने जयंतच्या वडिलावर सोपविली.त्या अनुषंगाने जयंतच्या वडीलासमवेत सर्वांच्या पसंतीने एका उत्तरा नावाच्या मुलीशी लग्न निश्चित केले. रितीरिवाजाप्रमाणे लग्न ठरविण्यापूर्वी जयंत सोबत सविस्तर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. कारण जयंतचा मूळ स्वभाव मालकांना सुद्धा चांगला ठाऊक होता.जयंतने होकार दिल्याने मालक सुद्धा आपल्या जबाबदारीतून मुक्त होणार या आशेने निश्चित झाला होता.
जयंतने होकार दिला असला तरी त्याच्या मनात सवयी प्रमाणे वेगळ्याच विचारांनी थैमान घातले होते. अल्पावधीतच लग्नाच्या पवित्र बंधनाबाबतही जयंताने मालकाचा भ्रमनिरास केला.यातही त्यांनी गनिमीकावा तयार करून क्रूर, निष्ठुर,निर्दयीपणाच्या प्रवृत्तीचा परिचय दिला. इतकेच नव्हे तर उत्तराच्या आई-वडिलांना भूलथापा देऊन सुद्धा त्यांचा विश्वास संपादन केला होता.त्यांतच उत्तराच्या आई-वडिलांना विविध अडचणी सांगून लग्न समारंभ पुढे ढकलण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला.पोपटावाणी गोड गोड बोलणाऱ्या जयंतच्या भूलथापांना उत्तराचे आई वडील बळी पडले आणि विवाह सोहळा पुढे ढकलण्यास संमती दिली. आपल्या विश्वासाची पावती म्हणून त्याने मुलीऐवजी स्वतःचा साखरपुडा सुद्धा करवून घेतला.लग्न निश्चित झाले असल्याने मुलीकडील मंडळीसुद्धा त्याला त्याच्या कडे येण्या-जाण्याबाबत कसलयाही प्रकारची मनाई करीत नव्हते.सततच्या येण्या-जाण्यामुळे उत्तराच्या घरच्यांना संशय येईल म्हणून त्यांच्या अनुपस्थितीत तो त्यांच्याकडे जाऊ लागला. सततच्या येण्या जाण्यामुळे दोघातही अधीकच जवळीक निर्माण झाली. हा तर स्वार्थीच पण तिने मात्र आपला भावी पती असल्याच्या भावनेने आपले सर्वस्व अर्पण केले होते.भावनेच्या आहारी जाऊन त्यानेही तिच्या जीवनाशी एक प्रकारचा खेळ खेळणे सुरू केले होते.
काही दिवसानंतर उत्तराच्या परिवाराकडून लग्नाचे शुभमुहूर्त काढण्याबाबत जयंत व त्यांच्या कुटुंबावर दबाव येऊ लागला आता आपले पितळ उघडे पडेल या भीतीने पुन्हा भूलथापा देऊन तिच्या आई- वडिलांकडुन चार- पाच हजाराची रक्कम उकळली आणि उत्तराच्या वडिलांच्या कानावर जाण्यापूर्वीच जयंत मुंबई शहराकडे निघून गेला. जयंत गावात नसल्याने मालकाचीही तारांबळ उडाली.कारण जयंतच्या काही मित्रांनी सांगितले की, तो लग्न करण्यास तयार नाही म्हणून!! उत्तराच्या आई-वडिलांना सुगावा लागताच त्यांनी जयंतच्या घराकडे (मालकाकडे )धाव घेतली. प्रकरण अंगलट येणार असून सुद्धा मालकांनी मुलींकडच्या लोकांना समर्थपणे तोंड दिले तसेच गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या मदतीने त्याची समजूत काढली. सोबतच जयतने उत्तराच्या वडिलांकडून घेतलेले पैसे सुद्धा परत केले. लग्न मोडल्याची आणि जयंतने विश्वासघात केल्याची बातमी उत्तराला कळतात तिच्यावर तर आभाळच कोसळले.कारण स्त्री एकदाच कुणावर प्रेम करते. एखाद्या नालायक माणसावर जरी प्रेम केले तरी त्याला अशी स्त्री सर्वस्व अर्पण करते.त्याप्रमाणे उत्तराने सुद्धा जयंतला सर्वस्व अर्पण केले होते. म्हणूनच उत्तराने आई-वडिलांना ठणकावून सांगितले की,”मी लग्न करणार तर जयंत सोबतच”. तिच्या या विचाराने तिचे आईवडील सुद्धा हवालदिल झाले होते/काळजीत पडले होते.
चिंतेत असलेल्या मालकाने जयंतचा शोध सुरू केला असला तरी तो मात्र मजेत होता.जयंत मुंबईवरून रवाना होऊन मालकाच्या मुलीकडे अर्थात सुरत येथे निघून गेला.त्यांनी सुद्धा जयंतला एका नामांकित कंपनीत रोजगार मिळवून दिला.तेथेही त्याने तिसरा पाय काढलाच.म्हणतात ना “जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही” तशीच परिस्थिती जयंतची होती. काही दिवसाने जयंत गावात परतला.त्यानंतर त्याच्या पश्चात घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती मिळाली. आता त्याला खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला होता .कारण ज्या मालकाने मुलाप्रमाणे प्रेम केले,माया दिली त्यांना आणि ज्या मुलीच्या जीवनाशी आपण खेळलो त्या मुलीच्या मनातील निस्वार्थ आणि निस्सीम प्रेमाचा विश्वासघात केल्याचा अखेर त्याला पश्चाताप झाला.अशा स्थितीत पुन्हा विवाह करण्याचे निश्चित केले तरी उत्तरा तयार होईल;पण बाकीचे मात्र दुखावेल.या हेतूने जयंतने उत्तरासाठी स्वतः मुलगा शोधून लग्न लावून देण्याचा निश्चय केला.कारण जयंत आणि उत्तरा यांच्या लग्नसंबंधाची चर्चा सर्वदूर पसरली होती त्यामुळे उत्तराचे लग्न जुळेनाशे झाले होते.त्यातही उत्तराचा इतर कोणासोबतही लग्न करण्याच्या नकारामुळे मोठा अडथळा/पेचप्रसंग निर्माण झाला होता.अशातच उत्तराची भेट घेऊन क्षमा मागून दुसऱ्या मुलासोबत लग्न करण्याची विनंती जयंतने केली.पण तिने मात्र असा विवाह करण्यास स्पष्ट नकार दिला.अखेर जयंतने आपल्या प्रेमाची शपथ देऊन आणि उत्तराचे लग्न झाल्याशिवाय लग्न न करण्याच्या जयंतच्या निश्चयाने उत्तराने आपले प्रेमाचे बलिदान(कुर्बानी) दिले आणि जयंतच्या मताशी अखेर जड अंतकरणाने संमती दर्शविली.यासोबतच जयंतने सुद्धा योग्य तसेच जयंत पेक्षा आर्थिकदृष्टया सुदृढ आणि सरस कुटुंबात सर्वांच्या संमतीने उत्तराचा विवाह करून दिला.लग्न झाल्यानंतर कालांतराने उत्तरा संसारात रममाण झाली.
जयंतने अखेर उत्तराचे घर बसवून दिले मात्र स्वतःचे घर बसविण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला.कारण जयंतच्या स्वभावाची चर्चा कित्येक दूरदूर पर्यंत पसरली होती.त्यामुळे त्याचे लग्न जुळेनाशे झाले होते.अविरत प्रयत्न व संघर्षानंतर मालकाच्या संमतीने/आशीर्वादाने जयंतचे अखेर लग्न झाले.नव्या उमेदीने संसार थाटला. पत्नी आणि मुला-मुली समवेत सुखाने राहू लागला.मालकाने जयंतचे लग्न करून दिल्यानंतर मालक सुद्धा निश्चित झाला. पण जयंतच्या लग्नानंतर काही वर्षातच मालकाचे सुद्धा निधन झाले.जयंत पोरका झाला.निराधार झाला.कारण जयंतच्या प्रत्येक चुका पोटात घालून स्वतः च्या मुलाप्रमाणे वागणूक देणारा पिता काळाच्या पडद्याआड गेला होता.मालक अस्तित्वात नसल्याने जयंतला स्वतःच्या घराची/कुटुंबाची जवाबदारी पार पाडणे चांगलेच अवघड झाले होते. त्यासाठी त्याला अतोनात संघर्ष करावा लागला. संघर्षाच्या आगीत होरपळत असताना लग्नापूर्वी केलेल्या अनेक चुकीची त्याला जाणीव होऊ लागली.पण वेळ निघून गेली होती.सुखाअवस्थेत वाढलेल्या जयंतला शेती किंवा अन्य कष्टाची कामे करणे कठीण होऊन बसले होते. परंतु जयंतला त्याशिवाय गत्यंतर नव्हते. ज्या गाववासियासमोर जयंत एखाद्या राजकुमारासारखा ऐटीत जीवन जगला त्याच लोकांसमोर काबाडकष्ट करणे त्याला शरमेर्चे वाटू लागले.पण पर्याय नव्हता. म्हणूनच त्याने अखेर गाव सोडण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या गावी स्थायिक झाला.आज मात्र तो सुखी आहे.समाधानी आहे.आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे.त्यासाठी जयंतने अतोनात काबाडकष्ट, अंगमेहनत केली. पर्यायाने त्याच्या संसाराचा चांगलाच जम बसला. आज तो सुखी संपन्न आहे पण भूतकाळातील आठवणी डोळ्या आठ जात नाही. भविष्यकाळाच्या दृष्टीने वर्तमानकाळात जगताना मात्र आजही तो पश्चातापाच्या आगीत होरपळतच आहे…….!
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
मु.भांबोरा ता.तिवसा
जि.अमरावती.
मोबाईल–९९७०९९१४६४
इमेल- nareshingale83@gmail.com
Related Stories
September 3, 2024