घरंदाज हुंदक्यांचे आर्त स्वर – वंशावळीच्या प्राचीन सरीतून
घरंदाज हुंदक्यांचे आर्त स्वर - वंशावळीच्या प्राचीन सरीतूनबाईपणाचा हिरवा गर्भ ठेवणाऱ्या ओसाड पुरुषी माळरानाला अन् काळाच्या पाठीवर अख्खा जन्म सहनशीलतेने सारवून – लिंपून जगण्याचा पापुद्रा धरून आलेल्या बाई कुळाला… अशा गर्भित अर्थाने अर्पण केलेली “वंशावळीच्या प्राचीन सरीतून…” ही नांदगाव जि नाशिक येथील कवयित्री प्रतिभा खैरनार यांची साहित्य काव्य कलाकृती नुकतीच वाचनात आली. स्त्री जीवनाची वास्तवता मांडणारी ही कलाकृती साहित्य जगतात स्त्रीवादी लेखनातील मैलाचा दगड ठरावी इतकी दर्जेदार निर्मिती झाली आहे. या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर स्त्रीचा अर्धा पदराने झाकलेला चेहरा, माथ्यावर चोचीत गवताच्या काड्या घेऊन बसलेली चिमणी, हा संदर्भ पाहूनच स्त्रीच्या शालीनतेचे, सोशिकतेचे, सहनशीलतेचे, कुटुंबवत्सलपणाचे, स्त्रीसंस्कृतीचे दर्शन घडते. महाराष्ट्राचे प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी साकारलेल्या मुक्त...
