महिलेस डोळा मारणे म्हणजे विनयभंगच.!
Marathi News मुंबई : एखाद्या परस्त्रीकडे बघून डोळा मारण्याचा प्रयत्न करत असाल, तर सावधान. कारण आता डोळा मारणे हा विनयभंगाचा गुन्हा असल्याचा निर्णय नुकताच माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने नुकताच दिला आहे. २०२२ मध्ये घडलेल्या एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. २० वर्षीय तरुणाने महिलेचा हात पकडून तिला डोळा मारला होता. हे कृत्य स्त्री मनाला लज्जास्पद असल्याचे न्यायालयाने नमूद केले आणि तरुणास विनयभंगाच्या गुन्ह्याअंतर्गत दोषी ठरवले आहे.
आरोपी भायखळा येथे राहत असून मोहम्मद कैफ मोहम्मद शोहराब फकीर असे त्याचे नाव आहे. डॉकयार्ड रेल्वे स्थानकासमोरील रेल्वे दुकानात तो कामाला होता. तक्रारदार महिलेने त्याच्या दुकानातून काही समानाची खरेदी केली होती. ते सामान पोहोचवण्यासाठी आरोपी महिलेच्या घरी गेला असता त्याने महिलेचा हात पकडून डोळा मारला होता. महिलेने आरडाओरड केल्यावर आरोपी तेथून फरार झाला. महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर भायखळा पोलिसांनी तरुणास अटक केली होती. दोन वर्ष खटला चलल्यानंतर आरोपीला दोषी ठरवण्यात आले आहे.