बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
गौरव प्रकाशन वाशिम, (प्रतिनिधी) – बंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका निभावली. देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात या समाजाचे काम केले. समाजाने खुप संत दिले. या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली. बंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचिन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन, किसान सन्मान संमेलन तथा विविध विकास कामांचे लोकार्पण, लाभाचे वितरण झाले. त्यावेळी प्रधानमंत्री बोलत होते. यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंग चौहान, मत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खा.अनुप धोत्रे, आ.चंद्रशेखर बावनकुळे, आ.निलय नाईक, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक, आ.लखन मलिक, आ.वसंत खंडेलवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदी उपस्थित होते.
बंजारा समाजाच्या विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. उद्गाटनानंतर समाजातील काही लोकांना भेटलो. संग्रहालयामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांनी या संग्रहालयाला भेट द्यावी, असे आवाहन करतो. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या संग्रहालयाच्या विकासासाठी प्रयत्न केले, त्यामुळे त्यांचे कौतुक करतो. संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचिन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रधानमंत्री म्हणाले.
बंजारा समाजातील महापुरुषांनी देशाला खूप मोठे योगदान दिले. राजा लकी सिंग, संत सेवालाल महाराज, स्वामी हाती राम, संत रामराव बापू महाराजांसह अनेक संत, महंतांनी समाजाला निर्णायक नेतृत्व दिले व उत्तम मार्गदर्शन केले. केंद्र शासन या समाजाच्या विकासासाठी कार्य करीत आहे. राज्य शासनाने संत सेवालाल तांडा समृद्धी अभियान राबवून या समाजाला सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले, असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले.
नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. केंद्राच्या योजनेसोबतच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेतून निधी देत असल्याने येथील शेतकऱ्यांना दुप्पट लाभ होत आहे. केंद्र सरकारचा प्रत्येक निर्णय विकसित भारताच्या दिशेने कार्यरत आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्यादृष्टीने विविध पावले उचलण्यात येत आहेत. आज शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांचे व योजनांचे लोकार्पण झाले हे या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.
महाराष्ट्र सरकारने ५० हजार करोड रुपयांच्या वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांतील १० लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार मदत करत आहे. अमरावती येथील नुकतेच टेक्सटाईल पार्कचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले. राज्य शासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नारी शक्तीला सशक्त करणारी योजना असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.