क्रांतिवीर बिरसा मुंडा
झारखंड या राज्यामध्ये एक म्हण रूढ झाली आहे. उलगुलानला अंत नाही आणि बिरसाला मरण नाही. तीन वर्षांपूर्वी झारखंड राज्यांमध्ये काही शासकीय कामाच्या निमित्ताने बराच प्रवास झाला त्यावेळी ही मी ऐकली होती. आज 15 नोव्हेंबर. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस.
ब्रिटिशांनी भारत कसा जिंकला या प्रश्नाचे उत्तर अतिशय कमी शब्दात द्यायचे असेल तर “तराजू तलवार तक्त” त्यांचा सत्ता प्राप्तीचा प्रवास आहे. या प्रवासात त्यांना भारतातील अनेक क्रांतिकारकांनी विरोध केला. हे क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक वेगवेगळ्या जाती धर्माचे असले तरी सर्वांचे ध्येय एकच होते ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे. खरे तर कोणताही क्रांतिकारक संत यांना जात-पात धर्म भेद नसतो. मात्र ते ज्या जमाती जन्माला आले त्या जमातीचा शिक्का आपण त्यांना मारतो. एक माणूस म्हणून आणि कर्तुत्व संपन्न व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे आगळे वेगळे समाजात स्थान असते.
आपण त्यांची विभागणी आपल्या सोयीनुसार करतो त्यांनी आपल्या आयुष्यात अशी विभागणी कधीही केलेली नाही अर्थात जातीनिहाय चरित्र विभागणी. इतिहासामध्ये अभ्यास करताना जातपात धर्मभेद काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच अभ्यास होऊन त्या माणसाचे कर्तुत्व आपण समजून घेतले पाहिजे. यांचे गुण आपल्यामध्ये कसे येतील याचा विचार केला पाहिजे. ज्यांनी आपल्या मायभूमीच्या संरक्षणासाठी अहोरात्र संघर्ष केला आणि ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध रान पेटवले अशा क्रांतिकारकांच्या मालिकेमध्ये बिरसा मुंडा हे अग्रभागी आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा. तुकाराम रोंगटे यांनी “आदिवासी आयकॉन्स” अशा ग्रंथामध्ये 30 क्रांतीकारकांची माहिती दिली आहे.विद्यमान कालखंडात लोक बिरसा मुंडा यांना भगवान असे संबोधतात. मात्र मला स्वतःला भगवान म्हणावे असे त्यांचे स्वतःचे मत नाही ते आपण चिकटवले आहे.
आदिवासी बांधवांच्या हिताची काळजी घेणारा होतकरू माणूस म्हणून झारखंडमध्ये त्यांना आज सामान्य माणूस भगवान असे संबोधतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इतिहासाने आणि इंग्रजांनी त्यांना लुटारू आणि बंडखोर असे म्हटले आहे. इतिहास हा निरपेक्ष परीपेक्षातून लिहिला गेला पाहिजे. चांगले ते चांगले वाईट ते वाईट असे वस्तुनिष्ठ चरित्र हल्ली वाचणे जरा दुर्मिळ आहे. प्राध्यापक तुकाराम रोंगटे यांनी लिहिलेले बिरसा मुंडा यांचे हे चरित्र छान आहे आपण सर्वांनी ते वाचावे ही विनंती.
आदिवासी बांधवांनी इंग्रजांच्या विरुद्ध जे लढले ते अजूनही खूप संशोधन करून लिहिता येतील आणि सविस्तर मांडणी करता येईल 1857 चे स्वातंत्र्यसमर आपणा सर्वांना ठाऊक आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या या पहिल्या लढाईसाठी आपण अनेक नावे दिली. अभ्यासकांनी व्यक्तिपरत्वे त्याला नावे दिली आहेत. आपण त्यास 1857 चे स्वातंत्र्यसमर हा शब्दप्रयोग करू. वास्तविक 854 आणि 55 मध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध आदिवासी बांधवांनी लढा उभारला होता ही बाब आपल्याला विसरता कामा नये. सिधू कान्हू चांद आणि भैरो या चार आदिवासी संथाळ बंधूंनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले. आगामी कालखंडात आदिवासी बांधवांचे हे उठाव आपल्याला किती त्रासदायक ठरू शकतात याची जाणीव ब्रिटिशांना त्या ठिकाणी झाली.
1854 च्या आदिवासींच्या या उठावाची दखल कार मार्क्स यांनी ‘Notes on Indian History’ थॉमसन आणि गॅरेट या लेखकांनी ‘Rise and Fulfillment of British Rule in India’ लिहिलेल्या या ग्रंथात 1855 च्या या उठावाचे सविस्तर वर्णन आले आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी उलिहातू जिल्हा खुंटी राज्य झारखंड येथे झाला. त्यांच्या आईचे नाव करमी तर वडिलांचे नाव सगन मुंडा. बिरसा मुंडा यांना पाच भावंडे होती. बिरसा सर्वात लहान होते. बिरसा यांचा जन्म झाला त्या दिवशी गुरुवार होता. संस्कृत भाषेमध्ये गुरुवार साठी ब्रहस्पती हा शब्द वापरतात. ब्रहस्पती या शब्दावरून त्यांच्या आईने त्यांचे नाव बिरसा असे ठेवले.
आदिवासी बांधव आणि मुले लहानपणी जंगल कडे कपारीत खेळतात तसे बिरसाही खेळत होते. लहानपणी बिरसा यांना बासरी वाजवण्याची सवय लागली बासरीच्या बरोबर ते टूइला नावाचे वाद्य वाजू लागले. बिरसाने शिकावे असे त्यांच्या आईला आणि मावशीला वाटत असे. त्यांच्या मावशीचे नाव जोनी. मिशनरी शाळेमध्ये जयपाल नाग या शिक्षकांनी बिरसाला गणित शिकवले. दरम्यानच्या कालावधीत पुढील एक दोन वर्षात बिरसा आपल्या मावशीच्या हाताखाली वनौषधींची माहिती करून घेऊ लागला. आणि जंगलातील औषधी वनस्पतींचे त्यांना चांगले ज्ञान प्राप्त झाले. आपल्या मावशीच्या गावाजवळील खटंगाज या गावी आयोजित एका आदिवासी महोत्सवांमध्ये बिरसा यांनी टूइला हे वाद्य वाजविले. उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. रात्रभर वाद्य वाजविले त्यामुळे झोप झाली नाही परिणामी सकाळी उशिरा उठल्याने मावशीच्या शेळ्या चारण्यासाठी ते घेऊन जाऊ शकले नाहीत. उशिरा जंगलामध्ये शेळ्या घेऊन गेले आणि एका झाडाखाली झोपी गेले. शेळ्यांनी एका शेताचा फरशा पाडला. शेतमालकाने बिरसाच्या एका बोकडाचा पाय मोडला. बिरसा यांच्या काकाने म्हणजे मावश्याने बिरसा यांना चांगले झोडपून काढले. बिरसा यांनी शांतपणाने पहिल्यांदा बोकडाच्या पायावर वन औषधे लावून त्याचा पाय ठीक केला. त्यानंतर त्यांनी आपल्या मावशीचे घर सोडले आणि बरतोली या गावी बुरा मुंडा यांच्या घरी जाऊन राहिला.
आपण पुढे शिक्षण घेतले पाहिजे. हा विचार बिरसा यांच्या मनात आला. त्यावेळी त्यांची भेट लुकास नावाच्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांशी झाली. तेथून ते बुरुजू या गावी जर्मन ख्रिश्चन मिशनरी मिशनमध्ये गेले. रेवरंड पुट्स किंग यांनी त्यांना शाळेत दाखल करून घेतले. नाईलाजास्तव ख्रिश्चन धर्म स्वीकारणे भाग पडले. पुढील शिक्षणासाठी तेच चांईबासा येथे गेले. त्या ठिकाणी त्यांना अमूल्य नावाच्या एका मित्राची साथ लाभली. एकदा एका ख्रिश्चन मिशनरी फादर नटरट यांनी आदिवासी बांधवांविषयी टीका टिप्पणी केली तेव्हा बिरसा म्हणाले आमच्या आदिवासी जमाती या गुन्हेगार नाहीत. परिणामी त्यांना शाळेमधून बाहेर काढण्यात आले.
आता शिक्षण थांबले आणि नव्या अध्यायाला प्रारंभ झाला.
बिरसा यांनी रामायण महाभारत पुराण बायबल हे सगळे काही वाचून काढले होते. त्यात कोठेही भेदाभेद नाही मग माणसे भेद का करतात हा धर्माने भेदाभेद कोठून आले हा प्रश्न त्यांच्या मनालाही पडला. त्यावेळी बिरसा यांनी एक गोष्ट लक्षात घेतली की जनआंदोलन उभे केल्या शिवाय इंग्रजांच्या विरुद्ध अथवा मिशनरींच्या विरुद्ध काहीही करता येणार नाही.
आपल्या जंगल भूमीला ते म्हणाले
सर्वांना सुखी करीन l
होय मी भगवान होईल l
जल जंगल जमीनl
हे सर्व आमचं आहे l
धरतीचा आबा आहे मी l
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आदिवासी बांधवांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जंगल हक्क वन कायदे आणले आणि आदिवासी माणूस संतापला. इसवी सन 1809 मध्ये कंपनीने जमीनदार पोलिसांचे नियुक्ती केली आणि आदिवासींची पारंपरिक न्यायव्यवस्था धोक्यात आली शेती व्यवस्था संपुष्टात आली. त्याच्याविरोधी बिरसा मुंडा यांनी आपण ब्रिटिशांना कोणतेही सहकार्य करायचे नाही अशी चळवळ उभारली. बिरसा मुंडा यांनी लढवय्या न्याय हक्कासाठी मोठा लढा उभारुन जे महान कार्य केले त्याला तोड नाही. त्यामुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा किताब जनतेनेच बहाल केला. इंग्रजी शिक्षणामुळे त्यांच्यावर आधुनिक विचारांचा प्रभाव पडला. परंतु त्यांना भारतीय संस्कृतीचा मनस्वी अभिमान होता व तो त्यांनी निरंतर जपला. नैतिक आचरणाची शुद्धता व एकेश्वरवादाचा त्यांनी पुरस्कार केला.
ब्रिटिशांनी १८७८-७९ मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारावर बाधा येण्यास सुरुवात झाली. आदिवासींना यामुळे बेघर व्हावे लागले. आदिवासींनी उदरनिर्वाहासाठी काही फळ, कंदमूळ, लाकुड्फाटे अथवा जनावरांसाठी चारा तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली आणि आदिवासी यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. हे रोखण्याकरीता आदिवासींनी न्यायालयात याचिका दाखल केली व आदिवासींचे वनाधिकार पुनर्स्थापित करण्याची मागणी केली. परंतु सरकारने ती फेटाळल्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला.
१८९४ मध्ये बिहार राज्यात भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळामध्ये उपासमारी व महामारीने अनेक लोक मृत पावले. त्यावेळी त्यांनी गरीब आदिवासी समाजाची निःस्वार्थी अंतःकरणाने सेवा केली. ब्रिटीश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करुन दुष्काळावर मात करण्याकरिता त्यांनी जनआंदोलन केले. हे आंदोलन जहागीरदार व जमीनदार यांच्या शोषणाविरुद्ध होते. त्यामुळे सामाजिक संतुलन बिघडून अशांतता निर्माण होत असल्यामुळे ब्रिटिशांनी जहागिरदार व जमीनदारांच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
त्याचबरोबर बिरसा यांनी आदिवासी बांधवांमधील अंध श्रद्धा घालविण्याची सुरुवात केली. ज्ञान विज्ञानाची कास धरल्याशिवाय आपली प्रगती नाही यावर त्यांचा भर होता.आयुर्वेदाची त्यांना चांगली माहिती होती. कडुलिंबाची पाने उकळून पेली तर काय होईल आणि पांढऱ्या तुळशीचा रस आल्यामध्ये मिसळून पाजल्यावर कोणते रोग जातात कारल्याचा पाला हळद एकत्र करून का प्यावीत याविषयी ते आपल्या समाजात जनजागृती करीत. बिरसा मुंडा यांचे कार्य इतिहासात ‘बिरसाईत ची हाक’ या नावाने ओळखले जाते. ही हाक आता हिमाचल प्रदेशातील सिमला पर्यंत जाऊन पोहोचली. इंग्रज अधिकारी लाट आणि मेयर्स हे दोघेजण बिरसा यांच्याविषयी अधिक माहिती मिळवू लागले. बिरसा यांना पकडण्यात आले. जर त्यांना सोडून दिले तर आजची आणि परिसरामध्ये ब्रिटिश विरोधी मोठे उठा होतील ही भीती ब्रिटिशांना होती. म्हणून त्यांनी रांची येथील डॉक्टरांच्या माध्यमातून बिरसा यांना वेड लागले आहे असे सिद्ध करावयाचे ठरवले. त्यासाठी मेयर्स या इंग्रजी अधिकाऱ्याने रांचीचे कमिशनर डॉ. रॉजस यांची नियुक्ती केली. मात्र त्यांनी बिरसा यांची बाजू घेतली. कोर्टामध्ये बिरसा यांची बाजू मांडण्यासाठी एक वकील देण्यात आला मात्र मी वकील घेणार नाही स्वतःच बोलेल असे बिरसा म्हणाले. त्यांच्याविरुद्धचा खटला रांची येथून गुप्तपणे खुंटी या गावी नेण्यात आला.
आदिवासी बांधवांना ही बातमी समजली आणि खुंटी न्यायालयाच्या आसपास हजारो आदिवासी बांधवांचा जनसमुदाय उभा राहिला. मित्रांनो याला म्हणतात लोकसंग्रह. हा ‘ पाच पंच प्राणापैकी एक आहे. 19 नोव्हेंबर 1895 रोजी त्यांना दोन वर्षाच्या सक्तं मजुरीची शिक्षा झाली. 1897 या वर्षी बिरसा जेलमधून सुटले. आदिवासी बांधवांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यानच्या काळात बिरसा यांचे लग्नही झाले. बिरसा यांनी आता आदिवासी संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी काम सुरू केले. प्रत्येक माणसाला स्वाभिमानाने जगू द्यायला हवे त्याच्या स्वातंत्र्यावर कोणी घाला घालत असेल तर अशा कर्दनकाळाला कायमची मूठ माती देण्यासाठी आदिवासी बांधवांनी एकत्र आले पाहिजे. हा त्यांचा नारा बनला.
बिरसा यांच्या भाषणातील एक ओळ मुद्दाम पुढे देत आहे.
‘आपल्या घराजवळ अथवा अंगणात तुळशीचे रोप लावा. त्याने हवा शुद्ध राहून ताजा ऑक्सिजन मिळाल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.’ गाय ही आपली उपयुक्त पशु आहे तिचा आपल्या जीवन व्यवहारात उपयोग करून घ्या तिला त्रास देऊ नका सर्व प्राणीमात्रावर प्रेम करा कोणत्याही देवतांपुढे पशुपक्ष्यांचा बळी देऊ नका. आदिवासी बांधवांनी आता नाचणे बागडणे सोडून ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील व्हावे. प्रत्येक आदिवासी बांधवाने “सिंगबोंगा” म्हणजे निसर्गशक्तीची पूजा केलीच पाहिजे. ज्यामध्ये जीव जगत यांचा समावेश असलेली स्वयंचलित चैतन्य ऊर्जा आहे. या विचारधारेतून झारखंडमध्ये ‘बिरसा धरम नावाची एक नवी’ संकल्पना जन्माला आली. या विचारांनी युक्त असलेला त्यांचा अनुयायांचा वर्ग आता ‘बिरसाइट्स’ या नावाने ओळखला जाऊ लागला. स्वातंत्र्य चळवळी बरोबरच त्यांनी आता समाज सुधारणा चळवळीस देखील पाठिंबा दिला. आपल्या मायभूमीच्या संरक्षणासाठी स्वातंत्र्य आणि स्वराज्याच्या प्राप्तीसाठी ब्रिटिश सत्तेशी आपण त्रिव्र लढा उभा केला पाहिजे ब्रिटिशांची कुटील रणनीती उधळून लावण्यासाठी त्यांनी काही विचार मांडले.
आपल्या मनाची पूर्ण तयारी करत बिरसा आपल्या घराच्या ओट्यावर उभा राहिला आणि म्हणाले.. इकडे लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो. आपणं ज्या मार्गाने जाणार आहोत तो मार्ग भयंकर खडतर आहे तेव्हा विचार करा मगच ठरवा त्या मार्गाने जायचे की नाही. इथून पुढे शांततेच्या मार्गाने लढाई बंद. कोणी शेतात काम करताना बाजार हाताला जाताना जंगलाची निगा राखताना नाचणे गाणे बागडताना आणि कोणतेही काम करताना सर्व आदिवासी चहुबाजूने एकत्र येतील लढाई करतील आणि त्या लढाईचे नाव असेल “उलगुलान”आदिवासी बांधवांनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे तीर कामठ्याची आणि दगड धोंड्याची सेना उभी केली. या सेनेची नावे काय आहे ते पहा
पुराणक
प्रचारक
नानक.
त्यांच्या पथकाचे नेते होते एटके गावचे गया मुंडा. या आदिवासी सेनेने डोंबारी बुरु येथे सभा घेऊन ब्रिटिशांच्या मिशनवर आणि पोलीस चौकी यांवर हल्ले केले. छोटा नागपूर आणि रांची जिल्ह्यातील सरवादाग या ठिकाणचे ख्रिश्चन मिशनरी इमारत पूर्ण जाळण्यात आली. 300 आदिवासी सैनिकांनी खुंटी पोलीस ठाणे नष्ट केले. डुंबरी नावाच्या डोंगरावर ब्रिटिशांच्या विरुद्ध मोठी रतनजीत लढाई झाली तो दिवस स्वतः 24 जानेवारी. या दिवशी बिरसा यांचा साथीदार सुनारा याच्या पायात गोळी लागली आणि पाय निकामी झाला. इंग्रज अधिकारी स्ट्रीटफिल्ड याने बिरसा च्या सैनिकांना कडक शिक्षा करण्याची मोहीम आखली. इंग्रजांनी ऑपरेशन बिरसा घडवून आणले. ते गुप्तपणे जंगलामधून प्रवास करत त्यावेळी जंगलाची माहिती असलेल्या आदिवासी मुली त्यांना जेवण पोहोचवत असत. अशाच एका प्रसंगांमध्ये मानि धानी, डोंका गया यापैकी एकाने बिरसा यांचा पत्ता इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितला. त्याविषयीचा प्रसंग असा आहे. मानी यांना सांगून बिरसा जंगलात जवळच्या एका झाडाजवळ झोपी गेले.
ती त्यांच्यासाठी परमीच्या तांदळाचा भात करत होती. संत्रा नावाचे जंगल होते. भाताचा सुगंध पसरला. बिरसा आणि शाली उठले की आपण भात खाऊ असा विचार असतानाच पाचशे रुपयांच्या लोभापाई बिरसाला तेथील लोकांनी पकडून दिले. जमीनदार शशी भूषण राय आणि त्याच्या जमिनीत काम करणारा त्याचा नोकर माझी तामारिया हे त्यात अग्रभागी होते. ते पकडले गेले पहारेकऱ्यांना म्हणाले.पहारेकऱ्यांनो या मातीसाठी एक दिवस मी काय करणार आहे ते तुम्ही बघालच. माझ्या मायभूमीसाठी मी दिक्खूंना जात्यात धान्य भरडून काढावे तसे भरडून काढील अन्न भाजून काढावे तसे भाजून काढेल आणि दुश्मनाना मी छोटा नागपूरच्या 52 परगण्यातून उखडून टाकेल…20 मे 1900 हा दिवस उजाडला तुरुंगामध्ये बिरसा यांनी अन्नत्याग केला. अखेर नऊ जून 19 00 या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी बिरसा यांचे प्राणज्योत मालावली. आदिवासींचा हा ज्वालामुखी अनंतामध्ये विलीन झाला भारत मातेचा हा सुपुत्र तिच्या कुशीत विसावला. आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी बिरसा यांचे निधन कॉलराने झाले असा खोटा रिपोर्ट तयार केला. जेलर अँडरसन याने बिरसा च्या साथीदारांना बिरसा गेल्याची बातमी कळवली. धानी हा बिरसाचा सरसेनापती धाय मोकलून रडू लागला.
इंग्रजी शिपायांनी बिरसा यांची रयत यात्रा काढली शेजारी शिबन आणि धर्मु या मेहतर यांना उभे करण्यात आले. हरमु नदीच्या घाटावर रात्री त्यांना अग्नी देण्यात आला. बिरसा यांनी चेतविलेल्या विचारांनी जे जन आंदोलन उभे राहिले भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्याचे आजही महत्त्वपूर्ण असे योगदान आहे. आपण हा वास्तविक इतिहास समजून घेतला पाहिजे. आज त्यांचा जन्मदिवस असल्याने त्यांच्याविषयी हा छोटासा लेख लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. शुद्धलेखनाची एखादी चूक वगळता बाकी सर्व काही बिरसा यांच्या विषयी लिहिलेल्या साहित्यामधील आहे.
– लहू गायकवाड
नारायणगाव
संदर्भ :
अधिक माहितीसाठी वाचा.
1. राजदीप आगळे ‘बिरसा शिवराय फुले शाहू आंबेडकर रिसर्च’ अँड पब्लिकेशन सेंटर धुळे 2011.
2. वसंत कनाके ‘स्वातंत्र्यलढ्याचा नायक बिरसा मुंडा’ जिजामाता प्रकाशन यवतमाळ 2020.
3. गोविंद गारे ‘स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिकारक’ श्री विद्या प्रकाशन पुणे 2004.
4. राजेश धनजकर ‘आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा’ परभणी 2020.
5. तुकाराम रोंगटे ‘आदिवासी आयकॉन्स’ संस्कृती प्रकाशन पुणे 2011.
6. तुकाराम रोंगटे ‘क्रांतिवीर बिरसा मुंडा’ सनय प्रकाशन नारायणगाव 2022.