यू विन पोर्टल मार्फत गरोदर माता व बालकांचे नियमित होणार लसीकरण
यू विन पोर्टल मार्फत गरोदर माता व बालकांचे नियमित होणार लसीकरण
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील गरोदर माता व बालक लसीकरण विना राहू नये तसेच बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता ”यू विन पोर्टल”वर नोंद करून गरोदर माता व बालकांचे लसीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व शहरी आरोग्य केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व बालकांचे लसीकरण वेळेत होण्यासाठी मदत होणार असून यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे यांनी केले आहे.
सदर लस संदर्भातील माहिती देखील या यू विन पोर्टल वर उपलब्ध असल्यामुळे बालकांचे नोंदणी करणे सोईचे होणार आहे. त्याच धर्तीवर आता बालकांच्या विविध प्रकारच्या लसीकरणातही लस मिळाल्यानंतर नोंदीत मोबाईलवर ”यू विन पोर्टल”द्वारे संदेश येईल. लसीकरणाशी संबंधित सर्व तपशिलांची नोंद पोर्टलवर केली जाईल. लाभार्थ्यास कोणत्याही राज्यात अथवा जिल्ह्यात लसीकरणाचा लाभ घेताना कोणतीही अडचण येणार नाही. या पोर्टलच्या माध्यमातून एका क्लिकवर लसीकरणाशी संबंधित माहिती मिळेल. तसेच लसीकरणानंतर प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची व्यवस्था देखील ”यू विन पोर्टल”वर उपलब्ध आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे यांनी दिली.
या प्रणालीसाठी शहरी भागातील लसीकरण केंद्रावर बालकांचे लसीकरण करण्यासाठी जातांना पालकांनी ”यू विन ॲप”वर अथवा पोर्टलवर नोंदणीसाठी मातेचे आधारकार्ड, आधारकार्ड लिंक असलेले मोबाईल नंबर सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे. या प्रणालीद्वारे लसीकरणाच्या तारखा लक्षात ठेवण्याचीही गरज राहणार नाही. मोबाईलवरील मेसेजद्वारे लसीकरणाच्या तारखा समजू शकणार आहेत.
या यू विन पोर्टलवर लाभार्थी स्वतः नोंदणी करून जवळच्या लसीकरण केंद्रामध्ये लस घेऊ शकणार आहेत तसेच लसीकरण कोणत्या तारखेला घ्यावे यासंदर्भातील माहिती देखील पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. तसेच लसीकरण लाभार्थ्यांचे आशा व ए. एन. एम/ एमपीडब्ल्यू सुद्धा पुर्व नोंदणी करू शकणार आहेत. लसीकरणादिवशी ही लसीकरण केंद्रावर नोंदणी करता येणार आहे.
जिल्ह्यातील एकही बालक व गरोदर माता लसीकरण विना राहु नये व बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यू विन अॅप वर नोंद करुन बालकांचे लसीकरण सुरु आहे. या अॅपमध्ये लाभार्थी स्वत: Uwin.mohfw.gov.in ह्यावर नोंदणी करुन जवळच्या लसीकरण केंद्रामध्ये लस घेऊ शकणार आहे. ज्यामुळे लाभार्थ्यात कोणत्याही राज्यात अथवा जिल्ह्यात लसीकरणाचा लाभ घेतांना कोणतीही अडचण येणार नाही. या पोर्टलच्या माध्यमातून एका क्लिकवर लसीकरणासाठी संबंधित माहिती मिळेल.
या यू विन पोर्टलचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे यांनी केले आहे.