रासेयो उपक्रमशील विद्यार्थी घडविण्याचे माध्यम – प्रा. डॉ. नरेश इंगळे
नितीन पवार
कुऱ्हा (प्रतिनिधी) : भारतातील युवाशक्ती ही अध्ययनासह सामाजिक जाणीवेतून विधायक कार्यातही अग्रेसर असावी या उदात्त हेतूने राष्ट्रीय सेवा योजना अस्तित्वात आली असून आजच्या स्थितीत कर्तव्यतत्पर आणि उपक्रमशील विद्यार्थी घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना खऱ्या अर्थाने सर्वोत्तम माध्यम असल्याचे मत रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.नरेश शं. इंगळे यांनी व्यक्त केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हे मत व्यक्त केले आहे. अध्यक्षस्थानी सुभाष मुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.नरेश इंगळे, प्रा.डॉ.मेघा सावरकर,प्रा. विजय कामडी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सुषमा कावळे,प्रा. संतोष नागपुरे उपस्थित होते.सर्वप्रथम संत गाडगे बाबा आणि श्री संत शंकर बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना कशी झाली व रासेयोच्या माध्यमातून कोण-कोणते उपक्रम राबविले जातात आणि यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जातो याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गटप्रमुख कु.वैष्णवी बुराडे,सूत्रसंचालन कु. राणी गडकरी तर उपस्थितांचे आभार कु.पायल शिवरकर हिने मानलेत.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्वयंसेवक स्वयंसेविका प्रामुख्याने उपस्थित होते.