माझी शाळा, माझे शिक्षक व फुसे मास्तरचा लिचोंडा
पूर्व माध्यमिक शाळा पेठ मांगरुळी माझ्या गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत १९६४ साली पहिल्या वर्गात नाव टाकले तो क्षण अजूनही माझ्या स्मरणात आहे.मी आणि माझा चुलतभाऊ कृष्णा एकाच वयाचे होतो.माझे काका श्री गोपाळरावजी कडू आम्हा दोघांनाही शाळेत नाव टाकायला घेऊन गेले होते.कानाला डोक्यावरून हात पुरविण्याचा सोपस्कार पार पडला आणि आम्ही दोघेही भाऊ शाळेत दाखल झालो.त्यावेळी शाळेची एकच ईमारत अस्तित्वात होती.दोन्ही बाजूला दोन खोल्या,पैकी एका खोलीतल्या काही भागात मुख्याध्यापकाची खुली केबीन व बाजूलाच पार्टीशन करुन शिक्षकांना बसण्यासाठी जागा होती.मध्ये एक मोठा हॉल,हॉलमध्येच पार्टीशन करुन दोन वर्ग भरत.पहिली ते चवथीपर्यंतच शिक्षण असल्यामुळे एवढी ईमारत पुरेसी होती.कौलारु ईमारत व आतमधील सागाच्या लाकडी ट्रसेसचे(कैच्या) काम व दर्शनी भागही मनोवेधक होता,शाळेसमोर खेळण्यासाठी विस्तीर्ण पटांगन,त्यात एक मोठे आंब्याचे झाड(होते,आता नाही)शाळेची स्वतःची बांधलेली पक्की विहीर व गुरांकरिता पाण्याचा हौद व पुढे नदी.गावात मंदीर परिसरानंतर हेच एक रमणीय ठिकाण आहे.माध्यमिकला परवानगी मिळाल्यानंतर यथावकाश अतिरिक्त खोल्या वाढविन्यात आल्या.आम्ही मात्र जुन्या ईमारतीमधूनच समोर सरकलो.वाढीव बांधकाम नंतर झाले.
लेखन,टाक व दौतीच्या जमान्यात आम्ही शाळेत दाखल झालो त्यावेळी शाळेत फक्त चवथीपर्यंतच वर्ग होते व आम्ही जेव्हा चवथा वर्ग पास झालो त्याच वर्षी माध्यमिकला परवानगी मिळाल्यामुळे प्रथमच वर्ग ५ ते ७ गावातच शिकण्याची सोय झाली.पूर्व माध्यमिकचा बोर्ड आमचे समोरच लागला.नाहीतर चवथीनंतर पाचवीत जाण्याकरिता मांगरुळीला श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अभिमानजी हायस्कूल मध्ये जावे लागत असे.आमच्या पूर्वीच्या विद्यार्थ्यांनी तेथूनच दहावी पास केली.
मांगरुळीला दहावीपर्यंतच वर्ग आहेत.अकरावी,बारीवीकरिता जरुड किंवा वरुडला जावे लागते.पेठ आणि मांगरुळी ही दोन गावे असून फक्त नदी (शक्ती नदी)व गावठाण आडवे आहे.दोन्ही गावाकरिता स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत.आता नदीवर शेकदरी येथे धरण झाल्यामुळे नदीला पाणी क्वचितच असते.गावात सुंदर असे मारूतीचे व शिवाचे मंदीर असून शिवमंदीराचे पुरातन असे हेमाडपंथी बांधणीचे काम लक्ष वेधून घेते.शिवमंदीराच्या दर्शनी भागातच वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा विराजमान आहे.मंदीर परिसरातच मातामायचा छोटेखानी चबुतरा आहे.लग्नकार्यादी कामाकरिता मंदीर परिसरातच समाजमंदीराचे बांधकाम करण्यात आलेले आहे.नंतरच्या काळात मंदिर परिसरात संत गजानन महाराज व विठ्ठलाचे लहान मंदिरे बांधण्यात आलीत.
मी पहिल्या वर्गात गेलो तेव्हा शाळेचे हेडमास्तर श्री दारोकर भाऊसाहेब होते.त्यावेळेस मराठी शाळेत शिक्षकांना भाऊसाहेब म्हणण्याची प्रथा होती.आम्हाला पहिला वर्ग शिकविण्याकरिता श्री भाऊरावजी फुसे नावाचे मास्तर होते.शाळेचा पहिला वहिला दिवस अविस्मरणीयच असतो,ती आपल्या आयुष्याची व भविष्याची नविन सुरुवात असते.प्रार्थना वगैरे आटोपल्यावर वर्ग भरला आणि सुरु झाले चेंडू दांडू एक…. तेंव्हापासून आजतागायत चेंडू दांडू एक सुरुच आहे,माणूस हा जीवनभर विद्यार्थ्याच्या भूमिकेतच असावा असे माझे मत आहे.जीवनातल्या शाळेत त्याला शिकण्याचे अनेक मार्ग मग आपणहूनच गवसतात.
श्री फुसे भाऊसाहेब भरभक्कम देहयष्टीचा माणूस होता.धोतर व सदरा परिधान करायचे.त्यावेळेस शाळेत मास्तरांचा फार दरारा राहात असे.तेव्हा पाढे पाठ करून घ्यायची पद्धत होती.पाढे म्हणतांना कोणी चुकले तर हे फुसे भाऊसाहेब कमरेच्या अन पोटाच्या मध्यभागी असा लिचोंडा काढत की लिचोंडा घेतलेल्या पोट्टयाची उंची आपोआपच एक फूट वाढत असे.लिचोंडा घेतला कि शरीर वरवर जात असे.ते पाहताना व हासतांनाची मजा काही औरच होती. हे फुसे भाऊसाहेब आम्हाला पहिलीपर्यंतच होते पण त्यांचा लिचोंडा घेणे काही सुटले नाही.शाळेत वावरताना कोणी इच्चकपणा केला का ह्या फुसेमास्तरच्या लिचोंड्याचा प्रसाद त्याला भेटलाच म्हणून समजा.मलाही दोन तीन वेळा लिचोंड्याचा लाभ मिळालेला आहे.बरं चिमटाही असा जबरदस्त राहे कि तिथली आग दोन तीन दिवस तरी शमत नसे.
दुसरीमध्ये आम्हाला स्वत: हेडमास्तर असलेले श्री दारोकार भाऊसाहेबांनीच शिकविले,अतिशय प्रेमळ, समतोल असे व्यक्तीमत्व,कधी रागावणे नाही, कधी चिडणे नाही.दुसरा वर्गही आनंदाने पार पडला.निवृत्तीनंतर ते अमरावतीला राठीनगरमध्ये रहात,मीही तेव्हा योगायोगाने अमरावतीलाच नोकरीत असल्यामुळे त्यांचेकडे जाऊन आशीर्वाद घेऊन यायचो,त्या गोष्टीला वीस वर्ष झालीत.आता मात्र ते हयात नाहीत.
माझ्या आयुष्यातील शिक्षणाची खरी सुरुवात तिसरी पासूनच झाली असे म्हणायला काही हरकत नाही.आम्हाला तिसर्या वर्गात शिकवायला एक नविन मास्तर आले त्यांचे नाव सुद्धा फुसेच होते,पण हे श्री मनोहरराव उकंडराव फुसे.अभ्यासाच्या वहीत ते म.उ.फुसे अशी स्पष्ट अक्षरात सही करीत त्यामुळे व ते सलग वर्ग ३ ते ७ आमचे वर्गशिक्षक असल्याने त्यांचे नांव अजूनही मुखोदगत आहे.सडपातळ देहयष्टीचे,सावळा वर्ण,चेहऱ्यावर रुबाब.पांढराशुभ्र पायजामा व शर्ट असा पेहराव,पाहताक्षणीच विद्यार्थ्यांत जरब बसावी असा.त्यांनी तिसरी ते सातवीपर्यंत सलग पाच वर्षे सर्व विषय अगदी आवडीने व मनातून शिकविले.अपवाद फक्त पाचव्या वर्गाचा,पाचवीमध्ये इंग्रजी हा एकमेव विषय श्री विनायकराव देशमुख भाऊसाहेबांनी आम्हाला शिकविला.मध्येमध्ये इतरही शिक्षक ते सुटीवर असले की पिरेड घेत असत.
श्री मनोहरराव फुसे भाऊसाहेब आम्हा विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त खेळ व इतरही शालेय उपक्रमामध्ये हिरीरीने भाग घ्यायला लावायचे.हे पाच वर्षे आम्ही अगदी आनंदाने शिकलो. आम्ही चवथी किंवा पाचवीत असतांनाच त्यांचे लग्न झाले होते.जरुड ते पेठ मांगरुळी हे पाच किलोमीटरचे अंतर ते कधी पायी तर कधीं सायकलने यायचे,ऊन पाऊस किंवा थंडीमध्येही अगदी वेळेवर शाळेत हजर.कडक शिस्त,शिकविण्यामध्ये कधी कुचराई केलेली मला आठवत नाही. गृहपाठ करून आणला नाही तर हे मास्तर मात्र रुळाने तळहातावर अन तेही बोटावर मारायचे पण आम्हा विद्यार्थ्यांवर प्रेमही तेवढेच करायचे,त्यांची कडक शिस्तच आम्हाला सातवीपर्यंत घेऊन गेली.त्या शिस्तीचा भविष्यात फायदाच झाला.१९७९ साली मी नोकरीवर लागल्यानंतर जरुडला त्यांचेकडे तीन-चारदा गेलो असेल.गावला जायचे असले कि जरुडला उतरल्यावर वरुड ते पेठ मांगरुळीला जायचा बसचा थांबा त्यांचे घराजवळच होता त्यामुळे एसटी बसला वेळ असला की मी त्यांचे घरी आवर्जून जात होतो.त्यांचा एक विद्यार्थी इंजिनिअर झाला याचे त्यांना फार कौतुक होते.त्यांचे कौतुकाने मी भारावून जात असे.गेलो की ते माझ्या वडीलांबद्दल आवर्जून चौकशी करत.माझ्या वडीलांबद्दल त्यांना नितांत आदर होता.माझ्या इतरही वर्गमीत्राबद्दल चर्चा व्हायची.जे वर्गमित्र चर्चेत होते त्यांची माहिती खाली देत आहो.
आमचे वर्गात सर्वात हुशार मुलगा शाम नावाचा माझा मित्र होता, शामसुंदर रामलालजी बरधे,त्याने सातवीपर्यंत कधी पहिला नंबर सोडला नाही.सातवीमध्ये बोर्डाची परीक्षा होती,बोर्डाच्या परिक्षेत काही नापास,काही वरपास तर ह्या पठ्ठा एकटाच पास झाला होता.माह्या नंबर वरपासात लागला होता.पहिल्या वर्गापासूनच मी आणि अशोक वानखेडे दुसरा वर्ग वगळता आलटून पालटून कधी दुसर्या तर कधी तिसर्या नंबरवर राहत असे.फक्त दुसर्या वर्गात कुसुम नथ्थूजी कडू नावाची,नात्याने माझी आत्या लागत होती,ती पहिली आली होती,परंतु हुशार असूनही घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिला शिक्षण अर्धवट सोडावे लागले,तिची आई त्यावेळी हयात नव्हती ह्याचाही परिणाम तिच्या शिक्षणावर झाला असेल.नशीब एकेकाचं.स्वप्नामधील गावात तिची वाट कधी गेलीच नाही.शेवटी ‘दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा.पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा’ हेच सत्य आहे. वर्गात इतर मुलीही होत्या परंतु त्यावेळी मुलींसोबत वर्गात किंवा गावातही बोलणे होत नसे,त्यामुळे मैत्रीन वगैरे अशा गोष्टीपासून चार हात दूरच राहावे लागत होते.ती हुरहुर कायमचीच राहिली.
सातवी नंतर मी गावातील शाळा सोडून नागपूरला शिकायला गेलो,त्यानंतर माझ्या या मित्रांच्या आयुष्यातील घटना, स्थित्यंतरे मी जवळून अनुभवली नसल्यामुळे इथे वर्णन करता येत नाही. अशोक वानखडे एम.कॉम एम. फिल होऊन शिवाजी संस्थेतून प्राध्यापक म्हणून रिटायर झाला.तर शाम कुठे मागे पडला होता हे समजले नाही,हुशार असूनही तो मागे पडलेला हे काही मनाला पटत नाही,त्याने आमच्यापेक्षाही उच्च पदावर असायला हवे होते.शेवटी नियतीच्या मनात जे असते तेच होते.तो एस टी च्या बँकेमधून कॅशीयर वा तत्सम पदावरुन रिटायर झाला.भास्कर वानखेडे नावाचा मित्र होता,तो कधी नंबराच्या रेसमध्ये नव्हता पण त्याने योग्य नियोजनाने एम कॉम करून एस टी मध्ये कॅशियर ची नोकरी करून रिटायर झाला.आता तो बर्यापैकी शेती करुन स्थिरस्थावर आहे.अशोकच्या घरी परंपरागत जमीनदारी असल्यामुळे तो पहिलेच स्थिरस्थावर आहे.
अरुण भांडारकर युको बँकेतून मॅनेजर म्हणून रिटायर झाला.तो ही आता हयात नाही.माझा चुलतभाऊ कृष्णा सां.बां विभागातून क्लार्क म्हणून रिटायर झाला.अशोक ढोरे,किसना माने,लक्ष्मण हेलोडे,रामदास खोपे ही चर्चेत येणारी नावे.अशोक ढोरे जलसंपदा विभागात वाहनचालक होता तर किसना माने नागपूरला एका खाजगी महाविद्यालयात शिपाई होता,हे दोघेही निवृत्तीपूर्वीच देवाघरी गेले.श्याम बरधेनेही एक्झिट घेतली.संख्या एक एक करुन कमी होत आहे.याला थांबविणे आपल्या हातात नाही.
लक्ष्मण हेलोडे शेतीतच रमला तर रामदास खोपे आपल्या परंपरागत कुंभार व्यवसायात व शेतीत रमला.मी दहावीनंतर शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेऊन स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका घेऊन अभियंता झालो.वर्गातील इतर मित्रमंडळी कोणी शेतीमध्ये तर कोणी व्यवसायात रममाण झाले.गावातच मॅट्रिक झाल्यावर मुलींनी पुढे शिक्षण घेतल्याचे ऐकिवात नाही. कुसुमसह इतरही मुली लग्न होऊन आपापल्या संसारात रममाण झाल्या.कोणाचेही वाईट झाल्याचे ऐकिवात नाही.
माझ्या पूर्व माध्यमिकच्या शालेय जडणघडणीमध्ये पहिलीत लिचोंडा घेतलेल्या श्री भाऊरावजी फुसे,श्री दारोकर भाऊसाहेब श्री विनायकराव देशमुख,श्री हरिभाऊ वानखडे (श्री दारोकार भाऊसाहेबांची बदली झाल्यावर हेडमास्तर म्हणून रुजू झालेले ),तिनखेडे भाऊसाहेब ,श्री मोकलकर भाऊसाहेब व श्री मनोहरराव फुसे ह्या सर्व भाऊसाहेबांचा अमूल्य असा वाटा आहे,त्यातल्या त्यात श्री मनोहरराव फुसे भाऊसाहेबांचा तर सिंहांचा वाटा आहे.आता यातील कोणीही हयात नाही हे शल्य आहेच.आम्हा विद्यार्थ्यांना घडविण्याकरिता त्यांनी आपले विद्यादानाचे पवित्र कार्य अगदी प्रामाणिकपणे व चोख पार पाडले ह्याचा आम्हाला फार अभिमान आहे.त्या सर्वांचेच ऋण या जन्मावर आहे, त्यातून उतराई होणे जसे केवळ अशक्य आहे तसेच श्री भाऊरावजी फुसे मास्तरांचा चांगला पिरगाळून घेतलेला ‘लिचोंडा’ ही विसरणे नामुमकीन आहे.
आठवीपासून मी नागपूरच्या नवयुग विद्यालय हनुमाननगर (आताचे पं.बच्छराज विद्यालय)येथे प्रवेश घेतला व एस.एस.सी तिथूनच केले.
– आबासाहेब कडू,
पेठ मांगरुळी
ह.मु.अमरावती
(९५११८४५८३७)
ReplyForward |