मम्मीची मजा
ऑफिसवाल्या मम्मीची
एकदा झाली मजा |
घाई घाई कामाची
झाली गोड सजा ||धृ||
ट्रिंगट्रिंग ट्रिंगट्रिंग ट्रिंगट्रिंग ट्रिंगट्रिंग
घड्याळ वाजले
मम्मीच्या आधी तिचे
बाळच उठले
टॅहा टॅहा टॅहा टॅहा
रडत बसले
बाळाच्या नादात तिचे
ऑफिस सुटले ||१||
भरभर भरभर भरभर भरभर
पोळ्या शेकल्या
भेंडीच्या भाजीसवे
पानात सजल्या
चटपट चटपट चटपट चटपट
आमरस चाटले
धप्पकन बाळ तिचे
रसात पडले ||२||
लगबग लगबग लगबग लगबग
कामे आटोपली
किल्ली-फाईल घेऊन ती
गाडीत बसली
चुटूक पुटूक चुटूक पुटूक
पापी घेतली
बाळाच्या मिठीत ती
ड्युटीच विसरली ||३||
–सौ सिद्धी विनायक जाधव