कृष्ण जन्माष्टमी
नभि दाटला दाटला
काळा कुट्ट तो अंधार
मेघनीळ बरसतो
धोधो पावसाची धार !!
दिस अष्टमीचा आज
कृष्ण पक्ष श्रावण मास
अशा रोहिणी नक्षत्री
कळा लागल्या मातेस !!
आला यमुनेला पुर
चोहिकडे पाणी पाणी
माता देवकीचे पोटी
जन्म घेई चक्रपाणि !!
मोह मायेचे बंधन
सारे तुटे थटा थटा
वसुदेवाचा नंदन
शोधे गोकुळीच्या वाटा !!
देव मथुरेत जन्मला
गोकूळात विसावला
ऐसा यशोदेचा कान्हा
बाळकृष्ण गं जन्मला !!
मित्राचा तो मित्र खरा
शत्रू कंसाचा जन्मला
हर्ष मावेना गोकूळी
कृष्ण मिळाला राधेला !!
वासुदेव विनवितो
आज भारत भूमिला
वाचविण्या जगं सारे
माते प्रसव कृष्णाला !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
अकोला