जिल्हा क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न
गौरव प्रकाशन
अमरावती, (प्रतिनिधी): अमरावती जिल्ह्याला क्रीडा संस्कृतीचा जुना वारसा आहे. येथील जगप्रसिध्द हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मागील शंभर वर्षापासून क्रीडा क्षेत्रात काम करीत आहे. हजारो क्रीडा शिक्षक व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू या भूमीत निर्माण झाले आहे. येथील आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केले आहे. जिल्हास्तराप्रमाणे ग्रामीण भागातील मुला-मुलींनाही तालुकास्तरावरच क्रीडा सुविधा मिळाल्यास विद्यार्थी लहान वयापासूनच या क्षेत्राकडे वळतील. व आपसुकच युवा पिढीचे आरोग्यही सुधारेल. तालुकास्तरीय क्रीडा संकुलात आवश्यक सर्व क्रीडा सुविधा पुरविणार असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठासमोरील नवनिर्मित जिल्हा क्रीडा संकुलाचे लोकार्पण व विविध क्रीडा सुविधांचे भुमीपूजन पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवि राणा, जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष जिल्हा क्रीडा संकुल समिती सौरभ कटियार, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाचे विजय संतान, राज्य धर्नुविद्या संघटनेचे अध्यक्ष ॲङ प्रशांत देशपांडे, सचिव अमर राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदी यावेळी उपस्थित होते.