समाजाला जागृत करण्यासाठी वैचारिक मशाली – वाटेवरच्या मशाली
अहमदनगर जिल्ह्याला पौराणिक, ऐतिहासिक आणि साहित्यिक वारसा लाभलेला आहे, अनेक लहानमोठ्या साहित्यिकांनी अहमदनगरचे नाव जगाच्या कान्याकोपऱ्यात नेले आहे. अहमदनगरची साहित्यिक परंपरा जपत लेखिका सुजाता नवनाथ पुरी यांनी स्तंभलेखन करून सामाजिक साहित्याच्या क्षेत्रात एक वेगळेपण जपले आहे. त्यांची विविध विषयावर स्तंभलेखन केलेली “वाटेवरच्या मशाली” ही कलाकृती नुकतीच वाचनात आली. या कलाकृतीचा साहित्यिक अंगाने आपण विचार करायला पाहिजे. या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर काळ्याकुट्ट अंधारात एका पुरुषाच्या हातात पेटती मशाल दाखवली आहे.. बस इतकाच संदर्भ या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर दिसून येतो. मात्र ही कलाकृती वाचली की या संदर्भाचा अर्थ उलगडत जातो.
मशाल हे अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रतिक म्हणून वापरले जाते, जेथे जेथे अन्याय होतो, त्या अन्यायाला जाळून टाकण्याचे काम मशाल करीत असते, लाक्षणिक अर्थाने मशाल म्हणजे तुमच्या मनातील अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची उर्जा, निबिड अंधाऱ्या रात्रीत मार्गक्रमण करीत असतांना पावलांना मार्ग दाखविणारा विचार म्हणजे म्हणजे मशाल.. माणसाच्या आयुष्यात देखील अशा मार्गदर्शक वाटाड्याची गरज असते, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे कोणीतरी असावे लागते. मग ही उर्जा कुठून येते, आपल्या अंगात अशी उर्जा कोण भरते, अशी प्रेरणा कोण देते तर त्या वाटेवरच्या मशाली.
“वाटेवरच्या मशाली” या कथालेखन संग्रहाच्या मुखपृष्ठावर एका पुरुषाचा हात दाखवला आहे.. हा हात कष्टकरी समाजाचे प्रतिक आहे आणि या हातात मशाल दाखवली आहे,याचा अर्थ असा की, जे हात कष्ट करतात , जे हात कुणावरही सहजासहजी उठला जात नाही, ज्या हातात फक्त आणि फक्त समाजाची सेवा करण्याचे बळ असते, त्या हाताला जर काम नसेल, त्या हाताने केलेल्या कामाला जर दाम मिळत नसेल, ज्या हातांनी समाजात चांगले काम केले आहे आणि जर त्या हाताची अवहेलना होत असेल तर असे हात हातात मशाल घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तयार होत असतात. लेखिका सुजाता पुरी यांना हाच अर्थ अभिप्रेत असावा म्हणून त्यांनी अतिशय कल्पकतेने या हातातील मशालीला मुखपृष्ठावर स्थान दिले आहे.
“वाटेवरच्या मशाली” या कथालेखनातून लेखिकेने डोळसपणे समाजात वावरतांना आलेले कडू गोड अनुभव आपल्या शब्दात मांडले आहेत. लहान लहान कथानकातून समाजातील दुर्बल, असहाय घटकावर होणारे अन्याय अधिरेखीत केले आहेत. “झाडावरचं पान जेव्हा पाण्यात पडतं तेव्हा तो त्याचा प्रवास नसतो तर ती असते फरफट” हाच संदर्भ लेखिकेने स्रीच्या बाबतीत विचारात घेतला आहे. आज स्रिया अनेक क्षेत्रात अग्रेसर होत आहेत परंतु त्यांच्यावर दररोज वेगवेगळ्या माध्यमातून अत्याचार होत आहेत, म्हणून लेखिकेने ”स्री आणि आजचा समाज” या स्तंभलेखनात स्री संघटनाची गरज असल्याचे म्हटले आहे. ही एक प्रकारे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हातात मशाल दाखवली आहे असा गर्भित अर्थ इथे अभिप्रेत होतो..
“वाटेवरच्या मशाली” या कथालेखनातून शिक्षणक्षेत्रातील अन्यायाला वाचा फोडली आहे. सत्तेचे केंद्रीकरण होत असल्याने संपत्तीचे देखील केंद्रीकरण होत असताना आपल्याला दिसून येते. आज देशात मोठमोठ्या शिक्षण संस्था उभ्या रहात आहेत, ही बाब समाजाच्या दृष्टीने चांगली असली तरी यातून आर्थिक दुर्बल घटकाच्या मुलांवर अन्याय होतो, त्यांना फी परवडत नाही, त्यामुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाही आणि ज्याच्या जवळ पैसा आहे त्यांची मुले शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर काम करतात अथवा मोठमोठ्या संस्था चालवतात. हा आर्थिक दुर्बल घटकावर अन्यायच आहे. त्यांनाही समाजाच्या प्रवाहात आणले पाहिजे, आर्थिक, शैक्षणिक विषमता दूर झाली पाहिजे आणि म्हणूनच या शैक्षणिक अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हातात मशाल घेतली पाहिजे हा गर्भित अर्थ “शिक्षण व्यवस्थेतील रेड कार्पेट आणि खडकाळ वाटा” या स्तंभलेखातून दिसून येतो.
हल्ली समाज माध्यमावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही, पैसा आणि प्रसिद्धीच्या गर्तेत समाजातील तरुणाई अडकत चालली आहे. दूरचित्रवाणी, भ्रमणध्वनीवरील फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या समाज माध्यमांवर झळकणाऱ्या चलचित्रातून लहान मुलांनी काय बोध घ्यावा हा चिंतेचा विषय बनला आहे. अगदी दोन वर्षाच्या मुलांपासून तर ८० वर्षाच्या वयोवृद्धांपर्यंतची सर्व मंडळी या चलचित्रांची बळी ठरत आहे. यावर नियंत्रण नसणे, सेन्सार बोर्ड याला मान्यता कशी देतात हा संशोधनाचा विषय आहे, पण अशा विकृत, घाणेरड्या चलचित्रामुळे समाजातील चांगल्या स्रीचे पावित्र्य हनन होतांना दिसत आहे हा एक प्रकारे घरंदाज स्रीयांवर अन्यायच आहे. कुणी कसे कपडे वापरावे, किती अंग प्रदर्शन करावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मात्र समाज माध्यमांवर याला काही बंधने घातली आहेत ती तरी पाळावीत. याला कुठेतरी आळा घातला पाहिजे, यावर आवाज उठवून असले घाणेरडे प्रकार बंद व्हायला हवेत म्हणून लेखिकेने “समाज माध्यमे आणि स्रीयांवरील अत्याचार” या स्तंभलेखांतून एक प्रकारे अन्यायाविरुद्ध मशाल हातात घेतल्याचे “वाटेवरच्या मशाली” या मुखपृष्ठावर अधोरेखित केले आहे
“वाटेवरच्या मशाली” या स्तंभलेखातून लेखिकेने समाजातील अनेक विषयावरील अन्यायाला आपल्या शब्दातून मांडले आहे. या संग्रहातील शिक्षक आणि आजचा समाज, कोरोनाच्या झुंडी शिक्षणाला दांडी, आपली लोकशाही, तारुण्याच्या वाटेवर, स्री काल, आज व उद्या, माणसं अशी का वागतात, नैराश्याच्या पलीकडे, पुरस्काराचे धनी, पुरस्काराचे राजकारण, अंधार झाला फार, विज्ञान आणि अध्यात्म या कथा वाचकाला विचार करायला लावतात. लेखिकेने या स्तंभलेखातून केलेली मांडणी हा एक प्रयोग म्हणावा लागेल. या संग्रहातील प्रत्येक लेखातून अन्यायाविरुद्ध हातात मशाल घेऊन लढले पाहिजे हा संदेश अधोरेखित केला आहे. पावलागणिक प्रत्येकाला काही ना काही अन्याय अत्याचाराचा फटका बसतोच, म्हणून प्रत्येक वाटेवर अशा वैचारिक आशयाच्या मशाली प्रत्येकाने हातात घेऊन समाजाला जागृत करण्यासाठी वाटेवरच्या मशाली झाले पाहिजे या गर्भित अर्थाने लेखिकेने “वाटेवरच्या मशाली” कलाकृतीच्या मुखपृष्ठावर एका माणसाच्या हातात मशाल घेतलेली दाखवली आहे असे मला वाटते.
“वाटेवरच्या मशाली” या स्तंभलेखनातून लेखिका सुजाता नवनाथ पुरी यांनी समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या लेखातून उर्जा दिली असून या लेखांना एकाच चित्रात सर्वसमावेशक अर्थाने घेऊन श्रीरामपूरचे प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार रवी भागवत यांनी अतिशय कल्पकतेने सजवले आहे. लेखक, प्रकाशक घनशाम पाटील यांनी प्रस्तावना देवून लेखिकेच्या लेखनप्रवासास शुभेच्छा दिल्या आहेत तर दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक मा करण नवले यांनी तर दर आठवड्याला हे लेख त्यांच्या राष्ट्र सह्याद्री या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून लेखिकेच्या लेखांना वाचकांत लोकप्रियता मिळवून दिली आहे. लेखिकेच्या लेखांना एक आयाम दिला आहे तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बेलापूर शाखेचे कार्याध्यक्ष मा सलीमखान पठाण यांनी लेखिकेच्या लेखणीचे कौतुक करून पाठराखण केली आहे. अनेक वाचकांनी कलाकृतीचे कौतुक केले आहे. लेखिका सुजाता पुरी यांना पुढील साहित्य कलाकृती निर्मितीस हार्दिक शुभेच्छा…
तूर्तास इतकेच ………
मुखपृष्ठ परीक्षण :
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृती – वाटेवरच्या मशाली
साहित्य प्रकार – स्तंभ लेखसंग्रह
लेखिका – सुजता नवनाथ पुरी, अहमदनगर
लेखिकेचा संपर्क – ७९७२९ २४५२३
मुखपृष्ठचित्रकार – रवी भागवत, श्रीरामपूर
प्रकाशक- घनशाम पाटील