पोळा
माझ्या सर्जाचा राजाचा
सण आला आता पोळा
त्यांना पुरणाच्या पोळ्या
खाऊ घालून ओवाळा
सर्जा राजा माझ्यासाठी
खरे देव मानतो मी
तेच सोबती जीवाचे
येती सदा माझ्या कामी
त्यांच्या कष्टामुळे माझा
कसा बहरला मळा
त्यांना पुरणाच्या पोळ्या
खाऊ घालून ओवाळा
माझ्यासंगे वर्षभर
राब राब राबतात
सदा घरामध्ये तेच
आबादानी आनतात
त्यांना बाशिंगे बांधीन
कंठी घालीन मी माळा
त्यांना पुरणाच्या पोळ्या
खाऊ घालून ओवाळा
छान नक्षीदार झूल
घालुनिया सजवीन
बॅंड लावुनिया त्यांना
गावभर मिरवीन
चला चला माउलींनो
लावा त्यांच्या भाळी टिळा
त्यांना पुरणाच्या पोळ्या
खाऊ घालून ओवाळा
– काशीनाथ महाजन,
नाशिक
फोन ९८६०३४३०१९
ReplyForward |