आठवणीचा ठेवा ठेलावाली आजी
आठवणीचा ठेवा_ठेलावाली आजी .एक चालते बोलते प्रसुती केंद्र. आर्णी तालुक्यातील तेंडोळी हे माझे दोन हजार वसतीचे छोटेसे गाव.आर्णीपासून अगदी तीन किमी अंतरावर.माझे घराचे डाव्या हाताला एक घर सोडून गंगाराम चाफला जाधव यांचे घर. गंगाराम काका माझे वडिलाचे समवयस्क परंतु माझे वडिलापेक्षा एक दोन वर्षाने लहानच असतील.माझे वडिलाचा जन्म १९२४ चा.म्हणजे शंभर वर्षे झालीत.आता माझे वडिल व गंगाराम काका हयात नाहीत. माझे वडिलाला चिलीम ओढण्याची सवय.
मला जसे समजायला लागले म्हणजे मी १९७२ ला सात वर्षाचा असेल,त्या काळी जूनी माणसे सकाळीच चार पाच वाजता उठून घरा समोर आर करून बसायचे व चिलिम चूटा ओढत बसून चिलमातील गुल दातोणी म्हणून वापरायचे, गंगाराम काकाचे घर जवळच असल्याने ते देखील वडिलांसोबत येवून बसायचे व चिलीम ओढण्याची सोबत करायचे.त्या काळी थंडीचे दिवसात घरात पांघरायला मुबलक साहित्य नसल्याने मी देखील सकाळीच वडिलाबरोबर उठून शेकोटी जवळ शेकत बसायचो . सकाळी सकाळी सहा सात वाजता गंगाराम काकाची आई म्हणजे सोनी चाफला जाधव ही गावातून कोणाचे तरी घरून दायीणीचे काम आटपून आमचे शेकोटी जवळ येवून बसायची.तीला मी दादी (आजी)म्हणायचो.त्या आजीला माझे गावात सर्वजन ठेलावाळ डोकरी व गंगाराम काकाला ठेलावाळो म्हणायचे.त्यांचे खरे नावाने त्यांना फारसे कोणी ओळखायचे नाही परंतु ठेलावाली आजी व ठेलावाळोचे घर पाहुण्यांना गावातील लहान थोर दाखवून देत असत. मला त्यांना ठेलावाळो का म्हणतात ही जाणून घेण्याची उत्सुकता वाढली.तर आई वडिलांनी ती जाणीव करून दिली. माझा जन्मही झालेला नव्हता,गोष्ट जवळपास १९५०चे दरम्यानची असेल,त्या काळी दळणवळणाची साधने नव्हती,रस्ते नव्हते,कोणी मेले,गेले किंवा कोणाचे लग्न असले तर बैलगाडी,छकडे व मोठया घरचे डमणी येण्याजाण्यासाठी वापरायचे.तत्पूर्वी गंगाराम काका व आजी महागाव तालुक्यातील तिवरंग येथे राहायचे.काही कारणास्तव ते तेंडोळी येथे राहण्यासाठी १९५०चे दरम्यान आले,तेव्हा त्यांनी आपले घर वर्हाड ट्रक (ठेला)मधून तेंडोळीला आणले.तेव्हा गाववाल्यांना फार कुतूहल वाटले की ज्याकाळी बैलबंडीने जाणारी माणसे आणि या माणसाने चक्क ठेलानेच घरपसारा आणला.म्हणून गावातील सर्वच जन गंगाराम काकाला ठेलावाळो व आजीला ठेलावाळ डोकरी आजी दादी म्हणायचे.
ठेलावाळ आजी फार मयाळू स्वभावाची,तोंडातील दात लवकर पडल्याने तीचा चेहरा नेहमी हसराच असायचा. त्याकाळी महीला घरगुती कामे,जात्यावर दळण दळणे,घरातील जागा शेणमातीने सारवणे,विहीरीवरून चडून खालीवर वाकूण पाणी ओढणे,आणणे ही महीलांची दिनचर्याच असायची.त्यामुळे गावातील ज्या कोणी महीला गरोदर असायच्या,अंगमेहनतीचे कामामुळे बहूतांश ९५%महीलांची प्रसुती ही घरीच व्हायची.तर त्या महिलांची प्रसुती मग ती बंजारा समाजाची असोत कि गावातील कोणत्याही समाजाची महीला असोत ठेलावाळ आजी शिवाय होत नव्हती,म्णजे एक प्रकारचे चालते बोलते प्रसुती केंद्रच होती ठेलावाळ आजी.जवळपास 1950पासून ते 2004 पर्यंत ठेलावाळ आजीने गावातील कितीतरी मुलामुलींना ,मी,स्वतः व माझे सर्व भावंडासह व गावातील लहान थोरांना हे जग दाखवण्याचे काम ठेलावाळ आजीने केले, म्हणजे या दुनियेत जेव्हा आम्ही प्रवेश केला तेव्हा प्रवेश द्वारावर आमचे स्वागत कोणी केले असेल तर ते ठेलावाळ आजीने,आजी प्रेमळ स्वभावाची,खदखद हासत,बोलत, कोणालाही अपशब्द बोलून तीने दुखवल्याचे मी बघीतले नाही.
जवळपास 105वर्षाचे आयुष्य जगून आजी 2004चे दरम्यान या जगाचा निरोप घेतला, तीची आठवण सतत येत राहते, तीच्या स्मृतीला उजाळा दयायचे झाल्यास ग्रामपंचायत तेंडोळी यांनी गावचे दर्शनी भागात प्रवेश द्वार उभारून त्या प्रवेशद्वारावर “सोनीबाई चाफला जाधव”प्रवेश द्वार असे नामकरण करून ठेलावाळ आजीचे स्मृतीस उजाळा दिल्यास गाव आपले आभारी राहील.तसे पाहिले तर गावचे प्रवेशद्वारावर,स्व.मनिरामजी नाईक,स्व रेखाजी नाईक यांची नावे सुद्धा लिहिण्यास हरकत नाही.परंतु ही दोन्ही नावे राजकीय घराण्यातील असल्याने,राजकारण तेथे विरोध,या भूमिकेतून विरोध होउ शकेल,परंतु ठेलावाळ आजी ही सामान्य कुटुंबातील होती,तीचे राजकारणाशी संबंध नाही. आणि खरे अर्थाने आमचे या दुनियेत पदार्पण झाले तेव्हा आमचे पहीले मुख आमचे आईने नव्हे तर ठेलावाळ आजीने बघीतले व आमचे स्वागत केले म्हणून तीच या प्रवेशद्वारावर नाव कोरण्याची हकदार असावी असे मला वाटते.कदाचित हा माझा स्वविचारही होउ शकतो,ईतरांना तो आवडेलच असेही नाही.परंतु ठेलावाळ आजीची आठवण आली व या लेखातून आठवण उजागर केली,कोणाचेही मन दुखले असल्यास क्षमापात्री.
– वसंत जाधव तेंडोळीकर