स्त्रीसुलभ भावनेचा सहजोद्गार : पडसावल्या
किती सहजपणे आपणच आपल्या सावलीच्या प्रेमात पडतो नाही का ! या सावल्या आपल्या आयुष्यात कधी ठळक तर कधी फिकट होत जातात. सावल्यांच्या जगात घुटमळताना मनात कोवळ्या भावनांचा गर्भ कधी पोसला जातो कळतच नाही. बाई आपला परकर-पोलकं ते पदरापर्यंतचा प्रवास स्वतःच्या सावलीतूनच शोधत पुढं पुढं चालत जाते. मागे भूतकाळाच्या अनेक सावल्या तिला लांबलेल्या तर कधी आखूड झालेल्या दिसतात. अनेकदा काळाच्या ओघात तीच कुठंतरी सावलीसारखी कधीतरी गुडुप होते. ह्याच भावनांचा पदर ती कमरेला खोचून अनेक गाठी पोटात रूतवून जगण्याची कळ सोसते. बाईला आपल्या आयुष्यातील मर्म स्वतःला उकलत जातात आणि सावली लुप्त होऊन कडकडीत उन्हं सोसण्याची ती तयारी करते. आपल्या माहेराची मायेची सावली मागे सोडून उन्हाचे चटके सहन करताना तिला मायबापच आठवतात. कठीण प्रसंगी तिला माय धरणी तर बाप छत्र धरणारं आभाळ वाटत असतो. माहेरच्या सुखाच्या सावलीत वाढलेली लेक तिच्या सासरी मात्र जबाबदारीच्या ओझ्यासोबत संसाराचे दाहक चटके सोसत जगते. बाईच्या या सोसण्याच्या, जगण्याच्या कवयित्री आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळी करून मनातल्या भावना शब्दबद्ध करते.
ती म्हणते,
‘बाई रांगोळी अंगणी, कोणी रेखली सांडली
कधी कडी कुलुपात, कधी वेशीला टांगली’
किंवा बापाचं आपल्या आयुष्यातील महत्व सांगताना ती म्हणते,
‘वट वृक्षाच्या छायेला, काय नाव आता देऊ
बाप अफाट आभाळ, कसे कवेमध्ये घेऊ
त्याच्या वेदनेचे गाणे, कोण्या सुरामधी गाऊ
कष्ट सोसलेले पाय, कुठं विसाव्याला नेऊ’
मुलीचं आपल्या बापावरचं अतोनात प्रेम व्यक्त करणाऱ्या या हळव्या भावना मानवी मनाला भुरळ घालतात. कवयित्रीच्या “पडसावल्या” या काव्यसंग्रहाबद्दल खूप आत्मियतेची भावना निर्माण होते. या काव्यसंग्रहातील सर्व कविता या प्रतिकात्मक रूपानं प्रत्येक बाईच्या मनातल्या भावना आहेत. अंतःकरणातील बऱ्यावाईट भावनांचा निचरा शब्दांतून व्यक्त करणारी ही कविता बाईच्या आतलं साचणं मोकळं करत जाते. ही कविता इतकी उत्कट आहे की ती प्रत्येक स्त्री मनाला आपलीशी वाटते. कवयित्री अष्टोळी रचनेत आपली कविता मांडताना आशयाचं आणि भाषेचं स्वतःचं एक नवं अस्तित्व सिद्ध करते. हे खूप महत्त्वाचं आहे. तिचं हे मांडणं खूपच प्रभावी आहे. बाईपणाचं जगणं विविध प्रकारच्या अनुभूतीतून स्वयंभू वृत्तीनं मांडणारी ही कवयित्री म्हणूनच मला खूप जवळची आणि हृदयातली वाटते. बाईपणा भोगताना बाईच्या जगण्याचा पैस आणि अनुभवविश्व ती आपल्या कवेत घेता घेता लिलया शब्दबद्ध करते हे तिचं कसब कौतुकास्पद आहे.
‘पोर झाली उपवर, धडधड उरामधी
भिरभिरत्या नजरा, खिळतात दारामधी
टिचलेल्या बांगड्यांची, खळखळ हातामधी
हुरहुर तगमग, काळजाच्या जात्यामधी’
बाई म्हणून जगताना कवयित्रीला आलेला दाहक अनुभव ती आपल्या भावस्पर्शी शब्दांत व्यक्त करते. “पडसावल्या” या कविता संग्रहात एकूण सहा भाग आहेत. काव्यसंग्रहाचे शिर्षक तर उत्तम आहेच परंतु, हा कवितासंग्रह नभांगण, लेकीबाळी, वसुंधरा, बाई माणूस, पिंपळपान, आयुष्याच्या नोंदी अशा एकूण सहा भागात विभागलेला आहे.
नभांगणाच्या चांदण्यात न्हाऊन निघता निघता लेकीबाळींच्या रूणझुण पावलांचा ठसा हृदयात उमटतो.
कवयित्री किती सहजतेनं म्हणते पहा,
‘किती लावतात लळा, वेड्या जीवाला या पोरी
बांधावर लगडल्या, जशा गोड गोड बोरी’
ओठी मधाळ बोलणं, जसे पुरणाचे ताट
रूप पाहता खुलते, रोज सोनेरी पहाट’
अशा मधाळ बोलणाऱ्या पोरी आणि बोरींची ओळख आपल्याला प्रतिभा या कवयित्री करून देतात. त्याचवेळी या गोड गोड बोरीच्या झाडाला तितकेच खरे काटे टोचतात. हे आपण विसरून चालणार नाही. याची जाणिव देखील प्रखर आहे. कवयित्री ग्रामीण कृषी संस्कृतीचे धागेदोरे घेऊन आपल्या कवितेतून व्यक्त होत आहे. निसर्ग हा बाईच्या स्वतंत्र भावनांइतकाच सुलभतेनं त्यांच्या कवितेत वावरत आहे. पाऊस, ऊन, वारा, ऋतू आणि मातीचं हिरवंपण ती तितक्याच उत्कटतेनं व्यक्त करते. मातीच्या रूजण्याचे हिरवेपणाचे ऋतू ती आपल्या कवितेत ठायी ठायी पेरते.
पावसाच्या सरी_ या कवितेत कवयित्री म्हणते,
‘थेंबा थेंबात भिजली, काया सावळी सावळी
बांधावर बहरली, एक करवंद जाळी
चिंब चिंब स्पर्शांतून, अंगभर मोहरला
तुझ्या आठवांनी पुन्हा, कसा जागर मांडला’
अशा अनेक कविता सांगता येतील बैलजोडी, सरिता, ओटी, वड, वनराई, श्रावण, चित्तचोर… ज्या कविता तुम्हाला तुमच्या भावस्पर्शी जगात घेऊन जातील. बाईमाणूस या विभागात बाईच्या वाट्याला आलेली दुखरी बाजू स्पष्टपणे दिसून येते. कवयित्री बाई या कवितेतून म्हणते,
‘हळुवार वेदनेचे, अश्रू हसून पुसते
संसाराच्या दिव्यामधी, बाई झुरून जळते
काट्या कुपाट्यात सारा, जन्म फुलवते बाई
बाई निवडुंग होते, बाई होते रानजाई
घेत मुठीत दुपार बाई होते सांजवाट
कधी रूपवान रात, बाई गुणांची पहाट
बाई रांगोळी अंगणी, कोणी रेखली सांडली
कधी कडी कुलुपात, कधी वेशीला टांगली’
अशी बाई तिला कितीही जपले कितीही झाकले तरी हा समाज तिच्यावर चिखल गाळ उडवतच राहतो. तो काही तिला सुखानं जगू देत नाही. बाई अंधारातलं चांदणं किंवा एकांताचे रान. बाई पंचमीचा देह किंवा मिणमिणता कंदील, बाई चंदनाचं झाड, इथं भरमसाठ साप, बाई कुण्या जन्माचं पाप. बाईचा कुणाला तरी होतो ताप. बाईची रूपं, बाईच्या वाट्याला आलेली दुःख अतिशय अल्प शब्दांत सुंदर रूपकात्मक पद्धतीनं मांडली असून सशक्त आशयाचा गाभा भक्कम विचारांतून मांडण्यात कवयित्री कमालीची यशस्वी झाली आहे. कवयित्री प्रतिभाच्या कविता तिच्या सहज सुलभ भाषेत अत्यंत संवेदनशीलतेनं आल्या आहेत. म्हणूनच या प्रतिभावंत प्रतिभेच्या कविता अतिशय हृदयस्पर्शी आणि नैसर्गिक भावानं वाचकांपर्यंत पोहचल्या आहेत. “पडसावल्या” असं वैशिष्ट्यपूर्ण शिर्षक असलेला हा कवितासंग्रह मराठी साहित्य विश्वात वाचकांना प्रचंड आवडला आहेच. वाचकांचा खूप मोठा प्रतिसाद आजवर या संग्रहाला लाभला आहेच यात शंका नाही. तसेच या संग्रहाला आदरणीय चंद्रकांत पालवे यांची अतिशय समर्पक प्रस्तावना लाभली आहे. ज्ञानसूर्य प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या संग्रहाचं अत्यंत देखणं आणि सुरेख असं मुखपृष्ठ शिव डोईजोडे यांनी रेखाटलं आहे. “पडसावल्या” या काव्यसंग्रहास अनेक मोठमोठ्या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. माझ्या हाती एक वाचक म्हणून हा संग्रह फार उशिरा पडला याची खंत वाटते. कवयित्री प्रतिभा हिचा बाभूळ फूल हा कथासंग्रह देखील अतिशय हृदयस्पर्शी आणि सकस आहे. तोही वाचकांना प्रचंड आवडला आहे. त्यामुळे कवयित्रीस तिच्यातल्या फुलणाऱ्या लेखिकेसह वाचक आणि माझ्या वतीनं दुहेरी अभिनंदनासह आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते. लिहित रहा. खूप खूप छान लिहितेस. असंच पुढचं लेखन बहरू दे. आमचा आनंद असाच द्विगुणित करत रहा. पुनश्च एकदा मनापासून शुभेच्छा!
– प्रा.निर्मला चव्हाण_शेवाळे
______________________
कवयित्री : प्रतिभा खैरनार
काव्यसंग्रह : पडसावल्या
प्रकाशन :ज्ञानसूर्य
मुखपृष्ठ :शिव डोईजोडे
पृष्ठ संख्या : ९३
किंमत : १५०/