संघर्षातून मिळविलेले आर्थिक, समाजिक, कौटुंबिक स्थैर्य म्हणजे – हेलपाटा
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आणि सध्या ग्रामसेवक पदावर कोकणात कार्यरत असणारे लेखक तानाजी धरणे यांची ‘हेलपाटा’ ही कादंबरी नुकतीच वाचनात आली. कादंबरीच्या शीर्षकावरून आणि मुखपृष्ठावरून लेखकाच्या जीवनशैलीचा, परिस्थितीचा अंदाज येतो. आपल्या समाजाचे, ज्या मातीत राबलो, कष्ट उपसले, ज्या मातीचा वास अंगाला लागला त्या मातीला, त्या कष्टाला ही कादंबरी समर्पित केली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पिढ्यानपिढ्या पायपीट करून टीचभर पोटाची खळगी भरणाऱ्या समाजाचे वास्तव चित्रण हेलपाटा या कादंबरीतून दिसून येते.
कोणतीही कलाकृती वाचण्याआधी त्या कलाकृतीचे मुखपृष्ठ वाचणे महत्वाचे असते. मुखपृष्ठचित्रकाराने आपला जीव ओतून या कलाकृतीला एक ओळख करून दिलेली असते. हेलपाटा या कादंबरीचे देखील मुखपृष्ठ अतिशय अर्थपूर्ण असेच आहे. या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर एका वृद्धाचा आश्वासक चेहरा दाखवला आहे, डोक्यावर फेटा, झुपकेदार मिशा, डोळे आकाशाकडे लागलेले, समोर टेकडीच्या मागे विस्तीर्ण क्षितीज पसरलेले, टेकडीवरून एक स्री आणि एक पुरुष खाली उतरत असतांना दाखवले आहे तर त्यांच्या सोबत एक गाय दाखवली आहे, त्यांच्या पाठीमागे एकच झाड तेही निष्पर्ण उभे आहे असे चित्र आपल्याला डोळ्यासमोर उभे केले आहे. या मुखपृष्ठावरील संदर्भांचा लेखकाच्या जीवनाशी काही वास्तविक संबंध आहे का? याचा अभ्यास करणार आहोत.
हेलपाटा या कादंबरीच्या मुखपृष्ठावर एका वृद्धाचा आश्वासक चेहरा दाखवला आहे.. अतिशय बोलका आणि गर्भित अर्थ सांगणारा हा चेहरा.. पिढ्यानपिढ्या भटकंती करून जीवन जगणारा समाज, एका वेशीच्या आत कधीच न राहिलेल्या या समाजात कधीतरी मुख्य प्रवाहात घेतले जाईल, गावकुसाच्या बाहेर कुणाच्या शेतात, कुणाच्या माळरानावर आपली दोन चार पालं ठोकून तेच घर आणि तेच अंगण.. ही परिस्थिती कधी बदलेल ही आश्वासक नजर खूप काही सांगून जाते. गेल्या काही दशकातील ही वस्तुस्थिती लेखकाने भोगली आहे हे कादंबरी वाचल्यावर कळते. आज बऱ्याच प्रमाणात ही परिस्थिती बदलली असली तरी काही ठिकाणी जैसे थे आपल्याला दिसून येते. एका सालगडी बापाच्या डोळ्यातील हे भाव लेखकाने अतिशय अर्थपूर्ण रेखाटले आहे. माझ्या वाट्याला आज हे दिवस आले आहेत ते दिवस माझ्या लेकराच्या वाट्याला नको म्हणून हा बाप पायपीट करत राहिला.. मैलोन् मैल उजाड झालेल्या माळरानावर …. या माळरानावरच्या निष्पर्ण वृक्षासारखे निस्तेज झालेले डोळे हीच आशा घेऊन पुन्हा पुन्हा पान्ह्वत होते. ते पाणी डोळ्याच्या कडा ओल्या करत पाझरायचे खोल अंतर्मनाच्या डोहात. हा गर्भित अर्थ मला यातून जाणवला आहे.
हेलपाटा ही कादंबरी प्रतिकात्मक स्वरुपाची असून कादंबरीतील पात्र कष्टकरी समाजाचे नेतृत्व करणारे आहे. लेखकाने जातीविरहित सामाजिक समता आणि बंधुता स्थापित करून फक्त कौटुंबिक आणि आर्थिक व्यवस्थेचे दर्शन घडवले आहे. लहानपणापासून खूप हाल सहन केले त्यातून शिक्षण घेतले. लहानपणी असतांना लेखकाला घालायला चांगले कपडे देखील मिळत नव्हते..”कपड्यांवरून जरी माणसाचं व्यक्तिमत्व ठरत असलं तरी आपण आपला साधेपणा जपला पाहिजे हे मला तेव्हाही वाटायचं व आजही वाटते. माणसाचा पेहराव त्यांची पात्रता ठरवू शकत नाही या मताशी मी आजही ठाम आहे माणसांचे मोठेपण त्याचे आचार विचार वागणे बोलणे यातून व्यक्त होते असे मला वाटते” या विचारावरून लेखकाच्या बौद्धिक सौंदर्याची ओळख होते” माणसानं नेहमी सामान्य रहावे हा गर्भित अर्थ लेखकाने येथे अभिप्रेत केला आहे असे मला वाटते.
हेलपाटा या कादंबरीच्या मुखपृष्ठावर समोर टेकडीच्या मागे विस्तीर्ण क्षितीज पसरलेले, टेकडीवरून एक स्री आणि एक पुरुष खाली उतरत असतांना दाखवले आहे. मुखपृष्ठचित्रकाराने अतिशय अर्थपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे केले आहे. भटकंती करून आयुष्य जगणाराच्या वाट्याला फक्त आणि फक्त वेदनाचं राहतात , या वेदना जणू काही मानवी जीवनाचा हेलपाटा आहे की काय असे विचार कधी कधी मनात येत असतात. समोर टेकडीच्या मागे जे विस्तीर्ण क्षितीज पसरलेले दिसत आहे ते लेखकाच्या आयुष्यातील आव्हानांचे क्षितीज आहे .ज्या टेकडीवरून दोन व्यक्ती उतरत आहेत ती टेकडी खडकाळ आणि खाचखळग्यांची आहे , कोणताही हिरवेपणा दिसत नाही म्हणजे लेखकाच्या आयुष्यात लहानपणी अतिशय दारिद्र्य होते, कुठेही सुखाचा लवलेश (हिरवेपणा) नव्हता, लेखकाच्या आईबापाने अनवाणी पावलांनी अनेक माळरान झिजवले, दुसऱ्याच्या घरी सालाने सालगडी म्हणून राबले हा खडकाळपणा, आणि खाचखळगे त्यांच्या राबण्याचे प्रतिक आहे तर निष्पर्ण झाड म्हणजे लेखकाच्या आयुष्यातील रखरखीतपणा आहे. लेखकाच्या लहानपणी खिलारी गायीने खूप साथ दिली.. तिला एक कालवड झाली , कालवड जेवढे दुध पिऊन उरायचे तेव्हढ्या दुधाचा रतीब लावला होता त्या दुधाच्या मिळणाऱ्या पैशातून रोजची टीचभर पोटाची भूक भागवली जात होती. यातून माणसाने आयुष्यात समाधानी रहावे हा मोलाचा संदेश दिला आहे. खिलारीने लेखकाच्या जीवनात जगण्याची नवी उमेद दिली होती, कुटुंबाचा एक अविभाज्य भाग म्हणून खिलारीकडे लेखक बघतात म्हणून त्या गायीला लेखकाने मुखपृष्ठावर स्थान दिले आहे.
एकंदरीत हेलपाटा या कादंबरीत लेखकाने स्वतः भोगलेले जीवन आणि त्यातून घेतलेले शिक्षण आणि पुढे ग्रामसेवक पदापर्यंत मारलेली मजल हा प्रवास दाखवला आहे. कलाकृतीचे लेखन ग्रामीण सामाजिक , आर्थिक व कौटुंबिक व्यवस्थेला धरून आणि त्यातील पात्र वास्तवातले असल्याने कादंबरी अधिक मनाला भावते. सोलापूरचे मुखपृष्ठचित्रकार शिरीष घाटे यांनी आपल्या कल्पकतेने या कादंबरीतील नायकाच्या बापाला आश्वासक नजरेने दाखवून कलाकृतीला एक ओळख दिली आहे. तर पी.आर.ग्रुप ऑफ पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेने ही कलाकृती प्रकाशित करून ग्रामीण साहित्यात एक वेगळेपण जपले आहे. आणि म्हणूनच ही कादंबरी सर्वश्रुत झाली आहे आणि म्हणूनच या कादंबरीचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पीएचडी संशोधन अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. तसेच या कादंबरीला राज्यस्तरीय जवळपास दहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन पुढे येणाऱ्या , शैक्षणिक कर्तृत्व उज्ज्वल करून दाखविणाऱ्या तमाम होतकरू मुलांना ही कादंबरी मार्गदर्शक आहे. संघर्षातून आर्थिक, समाजिक, कौटुंबिक स्थैर्य मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न या कादंबरीतून वाचायला मिळतात. प्रत्येकाने वाचावी आणि संग्रही ठेवावी अशी कलाकृती आहे. लेखक तानाजी धरणे यांनी नोकरी सांभाळून सातत्याने लेखन करून आपल्या लेखनीला समाजात स्थान मिळवून दिले यानिमित्ताने लेखकाला पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा. तूर्तास इतकेच..
मुखपृष्ठ परीक्षक
– प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क ७७७३९२५००० ( तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृतीचा परिचय
कलाकृतीचे नाव- हेलपाटा
साहित्य प्रकार – कादंबरी
लेखक – तानाजी धरणे – संपर्क : 9975370912
प्रकाशन- पी.आर.ग्रुप ऑफ पब्लिकेशन
मुखपृष्ठ सजावट- शिरीष घाटे