नवबौद्धांना व बहुजनांना नवी दिशा देणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन……!
” विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागलोकांची कर्मभूमी नागपूर मुक्कामी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी रूढीपंरपरेने गुलाम बनविलेल्या आपल्या समाज बांधवांसह तथागत गौतम बुध्दांच्या धम्माची दिक्षा ब्रम्हदेशाचे भन्ते चंद्रमणी यांच्याकडून घेतली. त्या पवित्र महापर्वाला आज ६८ वर्ष पूर्ण होत आहेत.
डॉ.बाबासाहेबांनी जो समाज हजारो वर्ष अतिशय हिन व गलिच्छ जीवन जगत होता,त्या समाजाला डॉ.बाबासाहेबांनी याच भारत भूमीतील शुद्ध व पवित्र ,आचरणास सोपा असा बौद्ध धम्म देवून महान धम्म चक्र परिवर्तन घडवून समाजाचे तसेच धम्माचे पुर्न:जीवन केले व त्यांच्यासाठी धम्माचे विचारपीठ निर्माण केले. या महान घटनेमुळे भारतीयांनाच नव्हे तर संबंध विश्वाला खऱ्या अर्थाने एकमेव परिवर्तनाची जाणीव झाली.ही भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील न मिटणारी सुवर्णअक्षरी नोंद कायम आठवण करून देणारी ठरली.याच महान परिवर्तनवादी घटनेमुळे मनुच्या चातुर्वण व्यवस्थेतील अस्पृश्य समाज आज स्वाभिमानी जीवन जगत आहे. बौद्ध धम्माच्या तेजस्वी प्रकाशात आपल्या प्रगतीच्या वाटा शोधुन तो मार्गक्रम करत आहे.
भारतासारख्या विकसनशील देशात उदयास आलेल्या बौद्ध धम्माला सम्राटअशोकांच्या नंतर स्विकारण्याचे पुण्य नसले तरी इतर महान आणि कर्तबगार राष्ट्रांनी राजाश्रय देवून मान-सन्मान दिला.व त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध केले. बौद्ध धम्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करणाऱ्या राष्ट्रांनंतर या धम्माचे खरे महत्व पटले ते फक्त महामानव बोधिसत्व परमपुज्य डॉ. बाबासाहेबांना आणि म्हणूनच त्यांनी आपल्या दिन-दुबळ्या मनुस्मृतीने लाचार बनविलेल्या समाजाला साधा-सोपा कर्मकांडविरहित सरळ आचरणात आणता येणारा बौद्ध धम्म देवून त्याच्यांत परिवर्तन घडवून आणले.तो दिवस होता अशोक विजयादशमीचा हा दिवस व महामानव, परमपुज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांना हा समाज कधीच विसरू शकणार नाही.कारण आपल्या समाजाला हजारो वर्षाच्या गुलामीतुन मुक्त करण्याच हे काम वाटत तेवढ सोप काम नव्हतं ते काम बाबासाहेबांनी केलं.
अडीच हजार वर्षापूर्वी सारनाथ या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी महानाम, कौडिण्य,अश्वजीत, काश्यप, भद्रिक या पंचवर्गीय भिक्खुनां बौद्ध धम्माची दिक्षा देवून भारतातीलच नव्हे तर जगातील पहिले धम्मचक्र प्रवर्तन घडूनआणले. नंतरच्या काळात काही प्रमाणात लुप्त होत असलेल्या या धम्माला नवसंजीवनी देण्याच मोठ काम चक्रवर्ती सम्राट अशोकांनी केलं.त्यांनी भन्ते उपगुप्तांकडून विजयादशमीच्या दिवशी बुद्धांच्या धम्माची दिक्षा घेतली.दिक्षा घेवून सम्राटाने देशातच नव्हे तर विदेशात या धम्माला पोहचविण्याचे महान कार्य केले.त्यांनी असंख्य स्तुप,लेण्या बांधल्या येवढेच नाही तर त्यांनी आपला तरूण मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्राला बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विदेशात पाठविले.
२० व्या शतकाच्या पूर्वाधात डॉ.बाबासाहेबांनी हिच परिवर्तनाची परंपरा कायम ठेवत व अथक अभ्यासातुन नाशिक जिल्हयातील येवला या ठिकाणी….१३ ऑक्टोबर १९३५ साली धर्मांतराची घोषणा केली.धर्मांतराचे ठिकाण हे नागपूर निवडले…नागपूर शहराची निवड यासाठी केली की,ती नागलोकांची पवित्र भूमी होती.याच लोकांनी देशामध्ये सर्वप्रथम सर्वत्र बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केला आणि हा धम्म जोपासला…नागलोकांचे अहिंसेवर खूप प्रेम होते.माणसां-माणसांमध्ये भेद निर्माण करणारी दरी त्यांनी दूर केली.म्हणूनच डॉ. बाबासाहेबांनी कोणत्याही विरोधाला न जुमानता १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमीला भंते महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून आपल्या लाखो बांधवांसह बौद्ध सद् धम्माची दिक्षा यामुळेच या भूमीत घेतली व हजारो वर्षाची चालत आलेली विषमतेची दरी दूर केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म या साठी स्विकारला कारण या धम्मामध्ये जातीप्रथेला स्थान नाही तो माणसाला माणूस म्हणून अग्रस्थान देतो. कोणत्याही प्रकारची विषमता या धम्माला मान्य नाही. तो जगण्यास व आचरणास साधा, सरळ, सोपा विशेष म्हणजे कर्मकांडावर विश्वास नसणारा विज्ञानवादी असा हा धम्म संपूर्ण नवबौद्धांना व बहुजनांना नवी दिशा देणारा ठरू शकतो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात..” मी भारत बौद्धमय करीन ” हे त्यांच स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण त्यांनी दिक्षा भूमीवर दिलेले पंचशिल व २२ प्रतिज्ञेचे मनापासून पालन करू.त्यात कुठलाही कंटाळा किंवा निरूत्साह दाखवला नाही तरच खऱ्या अर्थाने तथागतांच्या व डॉ.बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण होईल. नाही तर मग आजही आपला बहुतेक समाज हिंदू धर्मातील कर्मकांड सण- उत्सव साजरे करून बाबासाहेबांच्या विषयी असलेला लबाड पणा प्रकट करत आहे हे सिद्द होते. अता हे कुठेतरी थांबलेच पाहिजे . आपल्याला बाबासाहेबांमुळे खूप काही मिळाले.
एक विचार करा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपूर मुक्कामी दिक्षा दिली.व दि.६ डिसेंबर १९५६ साली त्यांचे महापरिनिर्वाण होते.किती दिवसांचा फरक आहे एक महिना आठ दिवसांचा हिच घटना अगोदर घडली असती तर आपण कुठे असतो याचा विचार करा आपली जी काही प्रगती झाली ती केवळ बाबासाहेबांनी आपल्या पुर्वजांना दिलेल्या धम्म दिक्षे मुळेच हे विसरू नका…..!” बौद्ध धम्म संबंध मानवजातीच्या कल्याणाचा धम्म आहे त्याची जोपासना करा यातच सर्वांचे हित आहे हे लक्षात घ्या…….!” येवढच म्हणेन हा धम्म चक्र प्रवर्तनाचा सोहळा अखंड चालू राहो…..कारण यामुळे नवबौद्धांना आणि बहुजनांना नवी दिशा मिळणार आहे…….”देशातील तसेच विदेशातील…….. तमाम आंबेडकरवाद्यांना ६८ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या पंचरंगी व निळ्या आभाळ भरून हार्दिक-हार्दिक हार्दिक शुभेच्छा…….”!
“सर्वांच मंगल होवो ….”!
– वसंत जोगदंड
छ.संभाजीनगर (औरंगाबाद.)
मो.नं.९१५८३६७९५०