“भ्रष्टाचार हाच राजशिष्टाचार – एक अगतिकता ..! “
भूक माणसांना, प्राण्यांना, पक्षांना पृथ्वी तलावावरील सर्वच सजीव जमातीला लागते, अन्न प्राशन केलं की प्रत्येकाची भूक भागते, आत्मा तृप्त होतो, या सगळ्या सजीव प्राण्यांमध्ये माणूसच असा एकमेव प्राणी आहे त्याची कधीच भूक भागली जात नाही, त्याचा आत्मा कधीच तृप्त होत नाही, तृप्तीचा ढेकर त्याला कधीच येत नाही, समाधान मानायलाच तो तयार नाही, मानव जातीत दोन प्रकारचे लोक बघायला मिळतात काहींची भूक भागते, समाधानी राहतात, पण काही आत्मे कधीच तृप्त होत नाही त्यांना नोकरीही असते तर काही स्वतःहा कंत्राटदार, राजकारणी असतात पण ते त्या पैशात ते समाधानी होत नाही.
एखाद्या कामाचा जो ठेकेदार / कंत्राटदार ठेका घेतो तेव्हा त्याला त्यातली जवळपास अर्धी रक्कम सरकारी अधिकारी, प्रशासन, नगरसेवक, सरपंच, आमदार, खासदार, मंत्री यांना वाटावी लागते..!, मंजूर झालेले काम अर्ध्या पैशात कराव लागते मग त्या कामाचा दर्जा कसा असतो याचा अनुभव सामान्य माणूस रोजच घेत आहे, रस्त्यांची तर चाळणी तयार होऊन जाते, पूल उद्घाटन करतानाच कोसळतात, त्यात अनेकांना जीव गमवावा देखील लागतो, आतापर्यंत इमारती, विमानतळाचे छत, पूल पडत होते.. तुटत होते…गळत होते…त्याला आपली सार्वभौमवादी लोकशाहीची संसदही अपवाद नाही तीही इमारत गळते आहे.
रस्त्यात खड्डे पडत होते, इथपर्यंत ठीक होते पण आज जी बातमी ऐकली ती ऐकून मात्र काळजाला जखम झाली, भावनांनाही आवर घालता येईना ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जमीनदोस्त झाला तोही फक्त आणि फक्त आठ महिन्यात ज्याचे उद्घाटन आपल्या देशाचे सर्वांच्च व्यक्ती पंतप्रधान तसेच आपल्या राज्याचे प्रमुख यांच्या हस्ते झाला होता एक वर्ष देखील उभारलेली वास्तू टिकू शकत नाही, कुठे नेऊन ठेवलाय हा देश माझा.!?
खरंतर गड किल्ल्यांचे संरक्षण केले पाहिजे, त्याचे जतन केले पाहिजे तेच खरे आदर्श पाहिजे पण नवीन पिढीला आदर्श म्हणून महापुरुषांचे स्मारक तयार केले जात आहेत हरकत नाही पण त्यातही भ्रष्टाचार केला जात आहे, हीच शिकवण होते का आपल्या महापुरुषांची? रयतेचे राज्य ज्यांनी निर्माण केले त्या छत्रपतींचा पुतळा जमीनदोस्त होताना ज्या वेदना होत आहेत त्या वेदनावर फुंकर देखील मारता येत नाही, आता कुठेतरी हा भ्रष्टाचार थांबायलाच हवा निदान महापुरुषांना तरी भ्रष्टाचार करताना सोडा..! तुम्हाला किती मोठे व्हायचं आहे ? किती पैसा कमवायचा आहे? खरोखर वितभर पोटाला एवढा पैसा लागतो का? का एवढा अट्टाहास आहे ? या जीवाचे आहे त्या पगारात पोट भरत, तर मग असं का..?
कितीतरी नैसर्गिक आपत्ती येऊन देखील अकराव्या बाराव्या शतकात बांधलेली बांधकाम आजही आहेत, दीडशे दोनशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी बांधलेले बांधकाम आजही चांगले आहेत, मग आता एक दोन वर्षात बांधलेली बांधकाम का पडताहेत याला जबाबदार कोण ? याला एकच कारण आहे ते म्हणजे त्या वास्तू उभारण्यासाठी जो वेळ लागतो तो दिला जात नाही, घाई केली जाते व दुसरा भ्रष्टाचार..! कोणत्याही कामात जो निधी आहे तो पूर्णपणे वापरला जात नाही एक जी साखळी तयार झाली आहे ती त्यातला अर्धा निधी हडप करते. छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते निदान त्यांचा पुतळा बांधताना त्यांचाच आदर्श घ्यायला काय हरकत आहे ? पण नाही ..! तेथेही पैसा हडप केला गेला असावा व त्यामुळेच निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले असावे म्हणूनच तो पुतळा आठ महिन्यात पडला. आज तो पुतळा फक्त पडलेला नाही तर आपल्या देशात नेमकं काय चालले आहे ? कशा पद्धतीने देश चालवला जात आहे ? इथली राज्यपद्धती कशी आहे ? इथला कारभार कसा आहे ? याची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे, आपल्या भावी पिढीने तरी काय आदर्श घ्यावा ?
मै ना खाऊंगा और न किसी को खाने दूंगा असे म्हणणारे थोर नेतेही जर ह्या परिस्थितीत हतबल झाले असतील तर याला एकच पर्याय आहे तो म्हणजे भ्रष्टाचारालाच राजशिष्टाचार म्हणून मान्यता द्यायला हवी ..! जर एखाद्या कामासाठी शंभर रुपये लागत असतील तर त्या कामाला दीडशे रुपये मंजूर करावे म्हणजे शंभर रुपयात कामही दर्जेदार होईल व वरील पन्नास रुपये जे साखळी पद्धतीत वाटले जातात तेही वाटले जातील भ्रष्टाचार राजशिष्टाचार होईल ..! रस्त्यात खड्डे पडणार नाही, फुल पडणार नाही, इमारती गळणार नाही, पुतळे पडणार नाही.
कधीतरी देश बदलेल..! लोक बदलतील..! असे वाटले होते, पण तसं काहीच होताना दिसत नाही, भावनांना जखमा झाल्यामुळे आज लेखनीही अगतिक झाली आहे, लेखणीलाही तिच्या मनाविरुद्ध लिहावे लागतेय, लेखणीलाही हे मान्य नाहीच, पण भ्रष्टाचार थांवण्याचे नावच घेत नाहीये, तो जीवावर बेततोय, भावनांना रक्तबंभाळ करतोय, मग कुठेतरी अगतिकता येते भ्रष्टाचारालाच राजशिष्टाचार केले तरच कुठेतरी हे थांबेल की काय असेच वाटते आहे…! निदान त्यामुळे तरी डांबरीकरण किमान पाच वर्ष टिकेल कॉंक्रिटीकरण पंधरा वर्ष टिकेल, वास्तु शंबर दोनशे वर्षे टिकेल.! मानवाची अधोगती होतेय की प्रगती होते तेच कळायला मार्ग उरला नाही.
भ्रष्टाचाराला राजशिष्टाचार करा..! असं लिहितानाही हाताचा थरकाप होतोय, पण दुसरे करणार तरी काय ? समाज व्यवस्था जर बदलतच नसेल तर कुठेतरी टोकाचे पाऊल उचलावे लागते, हे लिहिताना लेखणीला आणि लेखकालाही मान्य नाही तरीपण एक अगतिकता झाली आहे, निदान आता तरी हाचि उपदेश नका करू नाश आयुष्याचा, कधीतरी समाजव्यवस्था बदलेल भ्रष्टाचार बंद होईल असं वाटलं होतं कारण असं म्हणतात शिक्षणाने बदल होतो, पण शिकलेले काही लोक जास्तच भ्रष्टाचार करत आहेत भ्रष्टाचारामुळे होणारी महापुरुषांची विटंबना सहन करणे आता शक्य नाही! त्यांचा आदर्श ठेवूनच समाज जगतोय, त्या आदर्श व्यक्तिमत्त्वाची जर विटंबना होताना पाहावी लागते यापेक्षा दुर्दैव तरी कोणते ? ही लेखणी अगतिक होऊन हीच विनवणी करते आहे भ्रष्टाचार करायचा आता तरी बंद करा …. नाहीतर भ्रष्टाचारालाच राजशिष्टाचार म्हणून मान्यता तरी द्या…!
वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ
अध्यक्ष, वृक्षमित्र फाऊंडेशन व
वृक्षमित्र साहित्य परिषद,सिन्नर.
(७०२०३०३७३८