मेळघाटातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात– जिल्हाधिकारी सौरभ कटियार
Marathi news गौरव प्रकाशन अमरावती, (प्रतिनिधी): सिमाडोह येथील अपघातानंतर मेळघाटातील अपघाताचा मुद्दा गांभीर्याने समोर आला आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्या लागणार आहे. त्यामुळे शक्य असलेल्या ठिकाणी रस्ता रूंदीकरण, संरक्षण कठडे उभारणे आणि परिवहन मंडळाच्या बसेसच्या फेऱ्या तातडीने वाढवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात सिमाडोह येथील खासगी बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, परिवहन आणि परिवहन महामंडळातर्फे एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. परिवहन महामंडळाच्या बसेसची संख्या आणि वेळेवर बसेस नसल्यामुळे नागरिक खासगी बसेसमधून नाईलाजाने प्रवास करतात. त्यामुळे परिवहन मंडळाने बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात. तसेच प्रवाशांच्या गरजेनुसार बसेसचा वेळ ठरविण्यात यावा. यामुळे खासगी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या नियंत्रणात येईल.
मेळघाटातील रस्ते अरूंद आहेत. तसेच वळणाचे रस्ते असल्यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता वाढत असते. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी फलक लावण्यात यावेत. तसेच रस्ता रूंदीकरण आणि अपघात प्रवण क्षेत्रात संरक्षक कठडे उभारण्यात यावेत. अपघातासाठी खासगी वाहनांचा अतिवेग कारण असल्यामुळे परिवहन विभागाने पोलिसांसोबत वाहनांची तपासणी करण्यात यावी. यात अतिवेगासोबतच मर्यादेपेक्षा जादा प्रवासी असल्यास कारवाई करावी. त्यामुळे खासगी वाहतुकीवर अंकुश लागण्यास मदत होईल.
वन विभागाच्या परवानगी अभावी नवीन रस्त्यांचे कामे करणे शक्य नाही. मात्र खडीकरण करून रस्ते रूंद करणे तातडीने शक्य आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. त्यामुळे भविष्यात याठिकाणी रूंद रस्ते तयार होण्यास मदत होईल. यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश दिले.