बंजारा समाज श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू ?
बंजारा समाज एकेकाळी व्यापारी समाज म्हणून ओळखला जायचा.हळूहळू व्यापर बुडाला.समाज देशोधडीला लागला. पुढे चालून या समाजाच्या कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का बसला व समाजाची पुरती वाट लागली.बंजारा समाज हा आदरातिथ्य पाळणारा समाज.गुन्हेगारी शिक्का बसलेला समाज रानोमाळ भटकू लागला. कुठेही विना परवानगीने यांना थांबता येत नव्हतं. जेवढया दिवसाची परवानगी तेवढे दिवस मुक्काम.जेथे तो थांबत तेथे तो नाचगाणे करत.व परवाना संपला की तीन दगडांची चूल व त्यातील राख निशाना सोडून पुढील गावात चालता व्हायचा.कालांतराने हा समाज गुन्ह्यातून मुक्त झाला.पण, आधुनिक संस्कृतीपासून चार हात दूरच राहीला.निसर्गातील चमत्काराविषयी विचार करत राहीला.निसर्गातील अनाकलनीय गोष्टीविषयी विचार करत करत त्याची उकल करण्याचा प्रयत्न करत राहीला. पण काही गोष्टी समजण्याच्या पलीकडे होत्या.म्हणतात ना जेथे विज्ञान संपते तेथून पुढे धर्म सुरु होतो.जेथे श्रध्दा संपते तेथून पुढे अंधश्रद्धा सुरु होते.त्याकाळी समाजात शिक्षणाचं प्रमाण नव्हतच.याचा अर्थ समाजात शाहणी माणसं नव्हती असं म्हणण्याचं धाडस आपण करू शकत नाही.पण,शिक्षण नसल्यामुळे समाज अंधारातच चाचपडत राहीला. अंधश्रध्देच्या खाईतून दरीतून चालत राहीला.याच संधीचा फायदा समाजातील भोंदू, ढोंगी, चालू, चतूर, चालाख भगत भोप्या जाणता या लोकांनी घेतला.समाजातील भोळ्या भाबडया लोकांना यांनी त्याकाळी व आजही अंधश्रध्देच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.समाजातील भोळ्या भाबड्या समाजाचा फायदा घेवून हे गडगंज बनत आहेत तर त्यांना गरीब,दीन दारिद्रयाच्या खाईत लोटत आहेत.बंजारा समाजात शिक्षणाचा प्रसार व प्रचार झाल्याचं आपणास दिसून येते. समाजातील मुलं मुली उच्च शिक्षण घेताना दिसत आहे.पण, शिकणाऱ्याची टक्केवारी किती?त्यांची परिस्थिती काय?शिकलेली मुलं मुली पुस्तकी ज्ञान मिळवत आहेत.त्यांच्याकडे व्यवहारी ज्ञान आहे का?ते अंध्यश्रध्देचा अहारी गेलेले नाहीत का? तांड्यातील लोकांना ते अंधश्रध्देपासून दूर नेतात का?डोळस श्रध्दा व अंधश्रद्धा यातलं फरक त्यांना समजते?असे कित्येक प्रश्न निर्माण होतात.पुस्तकी ज्ञान घेतलेली.वैद्यकीय शिक्षण घेतलेली, पीएचडीधारकही आपली बुध्दी गहाण ठेवून अंधश्रद्धेच्या आहारी जात आहेत हे समाज उघडया डोळ्यांनी पहात आहे.
अंधश्रध्दाही फक्त गोर बंजारातच आहे असे नाही तर कमी अधिक प्रमाणात ती सर्व समाजात दिसून येते.सुशिक्षित व निरक्षर समाजातही अंधश्रध्दा ठाण मांडून बसलेली आहे. श्रध्देच्या नावाखाली उच्चशिक्षित लोक अंधश्रद्धा बगलेत घेवून फिरत आहेत.त्यांचं अनुकरण समाजातील गरीब भोळी माणसं करताना दिसत आहे.बहुसंख्य बंजारा समाज आजही गावापासून दूर जंगलात वास्तव्यास दिसतो.निसर्ग पूजक असलेल्या या समाजात अनेक वाईट रूढी चालीरीती वास्तव्य करून आहेत.ते जाता जात नाहीत.समाजातील ढोंगी लोक यांना भरीस घालून वाईट चालीरिती,रुढी पाळण्यास भाग पाडत आहेत. आधुनिक जगात,युगात वावरत असलेला बंजारा समाजात अनेक कुप्रथा आहेत.काल परवा मी माझ्या तांडयातला गेलो होतो.मी अद्यापी तांडयाशी नाळ तोडलेली नाही.घरी गेल्याबरोबर एक सूनबाई म्हणाली, “नाना आपल्या घरात कोणची सनी येणार हाय की ? ”
मी म्हणालो,” काय झालं बेटी काय घडलय? ”
ती म्हणाली, “नाना एक हरिण आपल्या घरात सिरली व्हती. ती या दारातून आत आली व त्या दारातून भायेर पडलीया.”
मी म्हणालो,”बेटी हरिण घरात आली तर काय होतय?”
ती थोडं झटक्यात म्हणाली,”काय व्हत्य मंजी घरात हरिण सिरलं तर सनी लागतीया घराला.असं समदे लोक मणूलालेत.आता आपल्याला की नायी सनी येवू ने मणुनशानी बकरं कापावं लागतया.”
मी विचारलो,” ते हरिण कुठं गेलं ? ”
ती म्हणाली,” पळून गेली.पण,दुसऱ्या दिशी पुना आली की.तिच्या मागं कुतरे लागले व्हते.घरात हरिण सिरली की त्याला मारून टाकलाव.त्याचं मुंडकं दारासमोर पुरलावं.आता गेली सनी निगून.”
हे एक सत्य उदाहरण सांगितलोय.असे कित्येक घटना तांडयात घडत असतात.असं काही घडलं तर घरातला कर्ता माणुस भगत भोप्याकडे जातो.घडलेली सर्व घटना तो त्याला सांगतो व भगत ऐकून घेवून त्यावर तोडगा सूचवतो.तोडगा काढतो.
मी प्रत्यक्ष पाहतोय, अनुभव घेतलोय आपल्या समाजात होली (कंबेडी ) घरात शिरली तरी अपशकुण समजले जाते.पंखासहीत पकोरडी (भटेवडी) किंवा तितर घरात आणले तरी अपशकुण होते.घरातील जात्याचं (घटी) एक भाग फुटलं किंवा खलबता (कुंडो) फुटलं तरी घरात काहीतरी घडणार असे घरातील प्रत्येकांच्या मनात येणार मग घरातील प्रत्येक सदस्य अवस्थ होणार.तांडयाच्या जवळ कोल्हेकुई झाली तरी काहीतरी वाईट घटना घडणार असे तांडयातील लोक समजतात.
घरात थोडं काही अपशकुन घडलं तर घरातील माणसं कारभारीला सांगणार,”जे काही घडतंय किंवा घडलय हे चांगलं नाही.जा भगत भोप्याकडे जावून विचारा असं आपल्याच घरात का घडतय किंवा घडलय.”
मग कारभारी किंवा घरातला कर्ता पुरुष त्याच्याकडे जाणार.त्याला पाहून ढोंगी बुवा मनात खुश होतो.त्याचं मानसशास्त्र तो ओळखतो व सुरवात करतो,”का आलात ते मला कळालय.माझं मन मला सांगालय तुझ्या घरात काहीतरी घडलय.घडलय की नायी खरं खरं सांग.”
हा भोळा भाबडा म्हणतोय,”होय महाराज माझ्या घरात असं असं घडलय आजच नाही ही तिसरी चौती येळ हाय बगा.यावर कायी तरी तोडगा काडा बगा.आणिअसं का घडूलालय ते बी सांगा.”
हा ढोंगी भगत थोडा वेळ विचार करण्यात गुंतल्याचं ढोंग करतोय.डोळे बंद करून काहीतरी पुटपुटतोय.आचानक डोळे उघडून समोर पहातोय पुन्हा गंभीर होतोय व सांगतोय,”बाबा संकट लयीच भारी हाय.ते घरात कुणावरतरी हे पडणार हाय.याच्यावर आताच तोडगा काढवं लागल.”
आलेला व्यक्ती घाबरुन जातो व म्हणतो, ” महाराज सांगा सांगा तुमी जे सांगताव ते म्या करताव.”
भोप्याला आनंद होतो.सर्व जगात काय चालू आहे हे त्याला घरबसल्या समजते या अविर्भात तो म्हणतो,”चिंता करू नगस म्या हाव ना. सारं ठिक होयील.”मग तो हातात एखादी कशाची तरी माळ घेईल किंवा कुंकू हळीदन भरलेला गोल छोटसं रिंगन करेल किंवा हातात एखादी छोटीशी साखळी घेवून (समळ घालेल) त्याचं किंवा त्याच्या घराचं भविष्य सांगेल.त्या घरचा कारभारी पूर्ण त्याच्या नियंत्रणात आलय असं वाटलं की त्याला पाहिजे तेवढे पैसे त्याचाकडून घेवून त्यावर बकरं,कोंबडं किंवा पिवळा भात असं काहीतरी उपाय सांगतो.
तांडयातील लोकांना म्हसोबा धरतो, त्यांना भुतबाधा होते. यांना कधीकधी रानदांडगासोबत कुस्ती खेळावी लागते. अमोशा पौर्णिमेला यांना भूत दिसणारच.तांडयातील तरुण मुले मुली किंवा विवाहीत तरुण तरुणी मेले तर ते निश्चितच भूत होतात.तांडयातील लोकाच्यांच ते मागे लागणार. एखाद्याचं पिच्छा पुरवणार.त्यांच्याकडून हमखास बकरं घेणार.घरातील मृत्यू पावलेले आजीआजोबा,आईबाबा घरच्या माणसांकडून वर्षादोन वर्षाला बकरं मागणारच.नाही दिलं तर हे घरवाल्यांना दोष करणार.त्यांना समाधान मिळू देणार नाहीत.असे कितीतरी वाईट रुढी,परंपरा व अंधश्रध्दा सांगता येतील.प्रत्येक तांडयात कोणीतरी मग ते बाई असेल किंवा गडी तो/ती काळतोंडया असतेच.त्यांचं तोंड पाहिलं की त्या दिवशी कोणतच काम होत नाही.काम करणाऱ्याला काम मिळत नाही.जेवायला मिळत नाही.हातापायाला गोळे येतात.मरणाचं डोकं दुखतय.ताप येतय. समोरुन खाली घागर घेवून कोणी आले तरी अपशकुन होतेच.येवढचं नाही तर एखाद्या कामाला बाहेरगावी किंवा गावात निघाले व समोरून मांजर गेलं तर त्या दिवशी काम होत नाही.मांजर आडवं आलं तर आपल्याला अपशकुन होतो ;पण मांजराला आपण ही आडवे येतोतच ना त्यावेळी मांजरला काही झालं तर आपण अपशकुनी नाही का? असे कित्येक गोष्टी सांगता येतील.हरण,कोल्हा,मुंगूस कामाला जाताना विशेष करुन डावीकडून उजवीकडे गेले तर शुभ समजले जाते पण उजवीकडून डावीकडे गेले तर अशुभ समजले जाते.
रात्रीला घुबड (राजा) घरावर बसून चित्कारलं तर घरधनी भगताला जावून विचारतो,”रात्रीला राजा माझ्या घरावर घुमलाय म्या काय करु?”
तो म्हणतो,”त्याचं तोंड कोणत्या दिशेकडे होतं?”
यावरून शुभ अशुभ ठरवले जाते.कुठे जाताना एखाद्या झाडावर निळकंठ पक्षी(चिबरी)चा आवाज आला की झाड बोललं असं म्हणतात व ते अशुभ समजतात.कामाला जाताना तितर पक्षी ओरडला तर दिशा पहातात.कोणत्या दिशेने आवाज येतो हे पहातात.सगळे दिवस सगळे वार सारखेच ;पण तांडयातले लोक कोणत्या वारी कोणत्या दिशेला जावे किंवा जावू नये हे ठरवितात. शुभ काम कोणत्या दिवशी करावे यांचा विचार करतात.
मुंगूसच सकाळी सकाळी तोंड पहाणे शुभ समजले जाते तर एखाद्या विधवा बाईचे तोंड पहाणे अशुभ समजले जाते.नवी नवरी घरी आली व योगायोगाने घरातलं कोणी गचकलं की तिला पांढऱ्या पायाची अपशकुनी ठरवतात;पण तिच्या माहेरचं कुणी गचकलं तर नवरा पांढऱ्या पायाचं ठरत नाही.का? आजही तांड्यातील लोक अंधश्रध्देत बुडालेले आहेत.तांड्यात आजही भानामती,केगामती,करणी करणारे तांड्यात आहेत असा गोड गैरसमज तांड्यातील लोकात आहे.यास तांडयातील भगत,भोप्या खतपाणी घालत असतात.यामुळे तांड्यात भितीचं वातावरण पसरलेलं असते. यामुळे मारामारी,खुन, झगडे,पोलीस केसेस होत राहतात. प्रत्येक तांड्यात एक दोन स्त्री पुरुष करणी,भानामती करतातच अशी चर्चा नेहमीच घडत असते.भगत, भोप्या मिठ मिरची लावून त्यांना सांगत असतो, “तूला करणी केलीया.तो तुझ्या घरातलाच आहे किंवा शेजारी आहे.काळ्या आमोश्याला तुझ्या डोक्यावरचे केस,तुझ्या अंगावरचा कपडा घेवून त्याची बाहुली बनवलीय.त्याला सूया टोचून ठेवल्यात. तो त्या बाहुलीला अमोशा पुनवेला बाहेर काढतो त्याला नाचवतो, रडवतो.त्यानचं तुमच्या घराचा नाश केलेलं आहे.”
काल परवाची गोष्ट आहे.मी माझ्या तांड्याला गेलो होतो. संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले होते.मी फिरण्यास बाहेर उदगीर रोडवरुन चालत होतो.समोरून माझ्या सख्ख्या चूलत भावाचा मुलगा आला.सत्तरी ओलाडलेला,पण धडधाकट.तो मला म्हणाला,” काका आपल्या तांडयातील लोक मला करणी करतो म्हणून नाव ठेवत आहे.सगळे जण माझ्याकडे संशयाने पहातात.आपल्या तांड्यातीत राजाच्या मुलगा भिम्या तर मला ठार करण्यासाठी मोठं दगडं डोक्यात घालण्यासाठी घेवून आला होता.” करणी भानामती ही जादू नाही.हे मानसिक रोग आहेत ;पण तiडयातील लोक अंधश्रध्देत वाहून जात आहेत.जादू आहे का? करणी,भानामती आहे का?हे तर सर्व संशयाचे भूत आहे.हे त्यांना पटवून देणे आवश्यक आहे.
शेवटी प्रत्यक्ष घडलेली आणखी एक घटना सांगतोय.एके दिवशी मी तांड्याला गेलो होतो. भावाची सून आजारी होती.घरातील सगळी मंडळी परेशान होती.सूनबाई काहीतरी बडबडत होती.ती नुकतीच तिच्या माहेरवरुन परत आली होती.तापाने फनफनत होती.घरच्या मंडळीना वाटत होतं की ती माहेरहून येताना तिला भूतानं झपाटलय.कारण माहेरहून येताना तिनं गोडधोड खाऊन आली होती.अंगातून भूत काढणा-या बुवाकडे घरातील एक माणुस गेला व त्याला विचारले.त्याने सगळी माहिती काढून घेवून माहेरच्या भूताने झपाटलय असं सांगितलं व त्याला पळविण्यासाठी शेळीची काळी पाट कापवं लागेल हा उपाय सूचवला.नंतर दुसऱ्या तांडयातील भोप्याला विचारलं तर तो म्हणाला तिने खाल्याकडील शेतात गेल्यावर तेथे विहिरीवर आंघोळ केलीया विहिरीतील आसरान धरलय.त्यासाठी नारळ पिवळा भात द्यावं लागेल.तिसऱ्या तांडयातल्या भगताने सांगितलं ती तांडयामागच्या शेतात गेली होती तिथं जाळलेल्या एका तरुणबाईनं हिला झपाटलय त्यासाठी काळी कोंबडी कापावी लागेल.काहींनी सांगितलं हतराळकडील शेतातलं म्हसोबाने धरलय नारळ पिवळा भात व कोंबडं कापावं लागतं.
शेवटी एक पांढरेशुभ्र पॅन्ट व शर्ट घातलेला बुवा आला मी त्याला विचारलो,”आपण कोण ? काय करता ?”
तो कॉलर टाईट करत म्हणाला,” मी जि प शाळेत प्रा.शिक्षक आहे.”
येथे एका बाईला बरं वाटत नाही म्हणून तिच्या मामाने मला येथे आणलय.कसाही भूत असू देत मी त्याला पळवितो. चिंता करू नका काळी पाट बाऱ्हाळीच्या शिवारात नेवून कापा भूत समाधानी होवून निघून जाईल.”
यासाठी प्रत्येकाने रक्कम घेतली होती. पण दादा म्हणत होते कोणी काहीही घेतले नाही. घरातील सर्वांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी तिला नांदेडला मानसोपचार केंद्रात दाखविलं. डॉक्टरानी योग्य सल्ला दिला.उपचार केले.आता ती ठणठणीत आहे.
आपण कितीही बढाया मारत राहू. विज्ञानचं युग म्हणू.आपण अधुनिक जगात राहतो असे समजत आहोत ;पण तांडयात आजही अनेक कुप्रथा,रुढी,अंधश्रद्धा ठाण मांडून बसलेल्या आहेत. तांडयातील माणुस कितीही शिकलेला असो.काही अपवाद सोडता बाकीचे किमान तीन बकरे कापणारच.काही माणसांची आर्थिक कुवत नसताना बाकी काढून सण साजरा करतात. काही रुढी परंपराच्या मूळा इतक्या खोल रुतलेल्या आहेत की त्यांच्यावर वार करणारच थकून जात आहे. सगळया सुशिक्षित व्यक्तीनी तांडयातील लोकांना शिक्षणाचं, विज्ञानाचं महत्व पटवून देवून त्यांना अंधश्रध्देतून बाहेर काढण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करायाला पाहिजे.तसं व्हायला पाहिजे.
आपण सगळ्यांनी मनापासून प्रयत्न केलो तर निश्चितच तांडयामधील वाईट गोष्टी प्रथा अंधश्रद्धा कमी होईल अशी मला खात्री वाटते.
शेवटी तांडा श्रध्दाळू की अंधश्रद्धाळू हा प्रश्न सर्वांना पडला असेल.आपपापल्या परिने विचार करुन ऊत्तर देण्याचा प्रयत्न करु या.यवढं खरं आहे की तांडयात आजही अंधश्रद्धाच, कुप्रथाचं घर वास्तव्यास आहे.ते घर येथून जाण्यास तयार नाही.त्यांला हकलून लावण्यासाठी फारसे कोणी प्रयत्न करताना दिसत नाही.त्यामुळे येथे अनेक वाईट सवयी आहेत.येथे दारू, गांजा, तंबाखु यांच्या अहारी गेलेली लहान मुलंही आपण पहातो.यांना यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षण दिलेच पाहिजेत. शिक्षणाचं महत्व सगळ्यांना पटलचं पाहिजे.
समाजातील समाजसेवक,राजकारणी,विचारवंत साहित्यिक,शिक्षक,भजणी मंडळी यांनी प्रयत्न केले पाहिजेत.कुप्रथा,रुढीला मुठमाती देणे सहज शक्य नाही ; पण अवघड ही नाही.त्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज आहे.
– राठोड मोतीराम रुपसिंग.
विष्णुपूरी, नांदेड – ६ .
९९२२६५२४०७ .