महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज
महिलांच्या वाढत्या अत्याचाराचे प्रमाण बघता महिलांच्या संरक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने विशेष महिला धोरण आखून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची गरज आहे. महिलांच्या सुरक्षिततेबद्दल विचार करताना देशातील महागाईचा विचार करण्यासह शालेय शिक्षणव्यवस्था त्यात होणारी मुलींची कुचंबना,ग्रामीण महिला, त्यांचे आरोग्य ,कामगार महिला,बांधकाम मजूर महिला,स्त्रियांचा होणारा मृत्यदर आणि त्यांच्या समस्यांवर वेळीच न मिळालेला तोडगा याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे.
आजची सुशिक्षित स्त्री चूल व मूल या चाकोरीत न अडकता नोकरी आणि व्यवसायासाठी पुरुषांच्या बरोबरीने घराबाहेर पडत आहे. महिलांनी सर्वच क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. तरीही महिलांवरील अत्याचारांविरुद्ध सक्षम कायदा बनत नाही. महिलांवरील अत्याचार बंद का होत नाहीत? आज घराबाहेर पडलेली स्त्री सुरक्षित नाही. नोकरदार म...
