जीवन समृद्धीचा विचार करणारी कलाकृती ; संगीत श्रावणाचे
मुंबई येथील प्रसिद्ध कवी तथा गझलकार कमलाकर राउत यांचा “संगीत श्रावणाचे” हा गझलसंग्रह नुकताच वाचनात आला,मानवी मनाच्या विविध कलाविष्काराचे प्रकटन असलेली ही साहित्य कलाकृती वाचकाला भुरळ घाणारी आहे. या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील काही संदर्भाचा अभ्यास केला असता गझलकाराच्या मनातील बऱ्याच विचारांचे दर्शन घडते..
“संगीत श्रावणाचे” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर माणसाच्या चेहऱ्याचे दोन रंगात दोन भाग दाखवले आहेत, माणसाच्या कपाळावरून रेनबो (इंद्रधनुष्य) गेलेले दाखवले आहे, जेथे माणसाचा चेहरा दाखवला आहे त्याच्या डोक्यातून एक मोरपीस बाहेर आलेला दिसत असून मुखपृष्ठाच्या वर आठ पांढऱ्या रंगाचे आठ पक्षी तर काळ्या रंगाचे चार पक्षी दाखवले आहेत. शेजारी पांढऱ्या शुभ्र ढगांचा पूजका दाखवला आहे. “संगीत श्रावणाचे” या शीर्षकातील संगीत या शब्दाच्यावर दिलेला अनुस्वाराचा टिंब सूर्याचे प्रतिक दाखवले असून त्यात ध्वनीचिन्ह दाखवले आहे या संदर्भातून गझलकाराच्या मनाचा अभ्यास करता येईल.
“संगीत श्रावणाचे” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर माणसाच्या चेहऱ्याचे दोन भाग दोन रंगात दाखवले आहेत याचा अर्थ असा की गझलकार जीवनाकडे दोन बाजूने बघतात. नेहमीच विविध प्रश्नांची सरबती घेऊन जगणारे गझलकार कधी कधी अंतर्मुख होऊन प्रश्नांची उकल करून जीवन समृद्ध करण्याचाही विचार करतात म्हणूनच त्यांच्या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर एकाच चेहऱ्याला दोन रंगात साकारले आहे. माणूस नेहमी दोन विचाराने वागत असतो , नेहमी रंग बदलून वागणाऱ्या माणसात आपला कोण आणि परका कोण ? हे ओळखणे अवघड होत असते अशा वेळी खऱ्या चेहऱ्याला ओळखण्यास माणूस पारखा होतो म्हणूनच गझलकार त्यांच्या “शोधतो या माणसाला” या गझलेत म्हणतात की –
“शोधतो या माणसाला सारखा मी,
ओळखीच्या चेहऱ्याला पारखा मी”
“संगीत श्रावणाचे” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर माणसाच्या कपाळावरून रेनबो (इंद्रधनुष्य) गेलेले दाखवले आहे. कपाळावरच्या या इंद्रधनुष्याला मुखपृष्ठकाराने अतिशय कल्पकतेने साकारले आहे. कपाळाचा आणि मानवी जीवनाचा खूप मोठा अर्थ आहे, असे म्हणतात की, माणसाचे नशीब कपाळावर कोरलेले असते कपाळावरील मध्यबिंदूत अंत:चक्षु असतो, हा अंत:चक्षु ज्याप्रमाणे शरीराच्या चेतासंस्था जागृत करीत असतो त्याच प्रमाणे “संगीत श्रावणाचे” या गझलसंग्रहातील सर्व गझला चेतासंस्था जागृत करणाऱ्या आहेत.
“संगीत श्रावणाचे” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर पांढऱ्या रंगाचे आठ पक्षी तर काळ्या रंगाचे चार पक्षी दाखवले आहेत. अतिशय समर्पक संदर्भ या कलाकृतीसाठी मुखपृष्ठकाराने सजवले आहेत. पांढऱ्या रंगाचे आठ पक्षी सुखी आणि समाधानी जीवनासाठी अष्टांगमार्गाचे प्रतिक आहेत. अष्टांग मार्ग म्हणजे काया आणि मन यांना शुद्ध आचरण करण्यासाठी केलेला संकल्प होय. जर माणसाने आठ मार्गाचे अवलंबन , अनुकरण केले तर त्याला शांती लाभत असते. आठ मार्ग म्हणजे दूरदृष्टी, दृढनिश्चय, मवाळ भाषा, प्रेरक कर्म, उदरभरण, योग, स्मृती आणि शेवटी ध्यान अशा आठ मार्गाचा अवलंब करून मानवी मन आकाशात भरारी घेऊ शकते असा संदेश या आठ पाखरांच्या उडण्यातून मला जाणवला आहेत तर चार काळ्या रंगाचे पक्षी हे मानवी जीवनाचे हानिकारक कर्म आहेत जे निषेधाचे प्रतिक काळ्या रंगाने दाखवले आहे हे चार हानिकारक कर्म म्हणजे – मन , हव्यास, माया, क्रोध असे चार हानिकारक कर्म आहेत त्यातील मन हे सर्व दुःखाचे मूळ आहे, *मन चिंती ते वैरी ना चिंती* म्हणून मनाचे कर्म मानवाला हानिकारक आहे, एखाद्या गोष्टीचा अति हव्यास करणे हे देखील सुखी जीवनाला हानिकारक कर्म आहे, हव्यास करून संपत्ती गोळा करणे , माया जमवणे देखील एक हानिकारक कर्म आहे संपत्तीच्या हव्यासापोटी माणूस आपले संतुलन बिघडवून घेऊ शकतो आणि शेवटचा क्रोध म्हणजे मानवी मनाने हव्यासापोटी संपत्ती कमावण्यासाठी प्रयत्न केले आणि ती संपत्ती जर मिळाली नाही तर माणूस क्रोधी होतो, म्हणून हे चार पक्षी काळ्या रंगात दाखवले आहेत असा गर्भित अर्थ मला यातून जाणवला आहे आणि म्हणूनच हे काळे पक्षी इतर आठ पक्षांपासून दूर दाखवले आहे. माणसानेदेखील मनातील हे चार दुष्कर्म बाजूला ठेवले पाहिजे असा संकेत या मुखपृष्ठावरील पक्षातून दाखवला गेला आहे असा अर्थ मला इथे अभिप्रेत होतो.
“संगीत श्रावणाचे” या कलाकृतीच्या शीर्षकातील संगीत या शब्दाच्यावर दिलेला अनुस्वाराचा टिंब सूर्याचे प्रतिक दाखवले असून त्यात ध्वनीचिन्ह दाखवले आहे. यातून असा अर्थ अभिप्रेत होतो की, ज्याप्रमाणे सूर्य आपल्या प्रकाशाने आसमंत उजळून टाकत असतो त्याप्रमाणे मानवी जीवनात संगीत आपले मन उजळून टाकत असते. श्रावण महिन्यात ऊन सावलीचा खेळ चालतो, कधी उन्हात पाउस पडतो जणू काही धरतीच्या तबल्यावर ठेका धरून संगीताच्या तालावर नाच होतो, निसर्गातील वृक्ष वेली, झाडे, बहरून जातात तसे संगीतामुळे मानवी मन बहरून येत असते. निसर्गाकडून खूप काही घेण्यासारखे आहे हा निसर्गाचा मोहकपणा गझलकाराला येथे भावला आहे म्हणून मुखपृष्ठावर संगीत शब्दावर अनुस्वार सूर्याचे प्रतिक दाखवले आहे.
“संगीत श्रावणाचे” या गझलसंग्रहातील सर्व गझल गझलकाराच्या भावजीवनाभोवती पिंगा घालतांना दिसतात म्हणूनच “माझ्या रित्या मनाला” या गझलेत ते म्हणतात की – “माझ्या रित्या मनाला आधार आठवांचा, मी पाहिला इथेही बाजार आठवांचा. तर दुसऱ्या “रिक्त झोळी” या गझलेत ते म्हणतात की – रिक्त झोळी सोबतीला ओळखीचे उंबरे, उघड्या त्यांच्या घरांची पाहिली मी लक्तरे. या बरोबरच संग्रहातील – ते गीत वेदनांचे, जीवनाला पेलतांना, आता कुठे जरासे, प्रहार झेलुनी मी, हा कुणाचा कोप नाही , येथे युगायुगांचा, अशा गझल मनाला चांगली अनुभूती देतात.
“संगीत श्रावणाचे” या गझलसंग्रहात एकूण १३० गझलांचा समावेश असून विविध वृत्तात या गझला गुंफल्या आहेत. माहीम, मुंबई येथील ग्रंथाली प्रकाशन यांनी या गझलसंग्रहाचे प्रकाशन केले असून प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार प्रकाश पाटील यांनी या कलाकृतीच्या मुखपृष्ठाला सजवून नवी ओळख दिली आहे. गझलकार कमलाकर राउत यांना पुढील साहित्य कलाकृती निर्मितीसाठी खूप खूप शुभेच्छा…
परीक्षण – प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० ( तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृतीचा परिचय :
कलाकृती- संगीत श्रावणाचे
साहित्य प्रकार- गझलसंग्रह
गझलकार – कमलाकर राऊत, मुंबई
गझलकाराचा संपर्क- ९८६९३ ४६२८९
मुखपृष्ठचित्रकार – प्रकाश पाटील
प्रकाशक- ग्रंथाली प्रकाशन, मुंबई